‘होम मिनिस्टर’साठी पतिराजांची ‘फिल्डिंग’

By admin | Published: December 23, 2016 11:03 PM2016-12-23T23:03:23+5:302016-12-23T23:03:23+5:30

काँग्रेस-शिवसेनेत सरळ लढत होणार : महिलासाठी राखीव असूनही इच्छुकांची संख्या मोठी; सर्वच इच्छुक मातब्बर

'Fielding' for 'Home Minister' | ‘होम मिनिस्टर’साठी पतिराजांची ‘फिल्डिंग’

‘होम मिनिस्टर’साठी पतिराजांची ‘फिल्डिंग’

Next

प्रकाश पाटील-- कोपार्डे --पूर्वीचा कोपार्डे व आताचा शिंगणापूर मतदारसंघ महिला खुला प्रवर्गासाठी राखीव असूनही इच्छुकांची मोठी संख्या आहे. या मतदारसंघामध्ये येणारे पंचायत समिती शिंगणापूर गण इतर मागास पुरुष व वाकरे गण इतर मागास प्रवर्गासाठी राखीव असला तरी इच्छुकांनी आपली उमेदवारी नेत्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी भेटीगाठी सुरू केल्या आहेत. येथे काँग्रेस पक्षाकडे इच्छुक उमेदवारांची संख्या मोठी असून, याहीवेळी काँग्रेस व शिवसेना यांच्यातच सरळ लढतीचे चित्र आहे.
करवीर मतदारसंघाचा गाभा म्हणून शिंगणापूर (कोपार्डे) मतदारसंघ ओळखला जातो. सर्वसाधारण ४० हजार लोकसंख्येचा हा मतदारसंघ काँग्रेसचा बालेकिल्लाच राहिला आहे. या मतदारसंघावर असलेल्या काँग्रेसच्या वर्चस्वाला २०१२च्या निवडणुकीत सुरुंग लागला. यावेळी हा मतदारसंघ इतर मागाससाठी राखीव झाला. शिंगणापूर मतदारसंघ हा भौगोलिकदृष्ट्या दोन भागांत विभागला गेला आहे. भोगावती नदीच्या पूर्वेला शिंगणापूर, हणमंतवाडी (आता या मतदारसंघात हे गाव नाही) बालिंगा व पाडळी ही मोठ्या मतदारसंख्येची गावे असतानाही या ठिकाणी काँग्रेस व राष्ट्रवादीच्या उमेदवारीमुळे मतविभागणी झाली आणि शिवसेनेने आपला गठ्ठा मतदान विभागणार नाही यावर लक्ष केंद्रित केले. काँग्रेसचे उमेदवार सुरेश रांगोळकर यांना त्यांच्या गावातच शिवसेनेचे उमेदवार विलास पाटील यांच्यापेक्षा कमी मतदान मिळाले, तर नदीच्या पश्चिमेला असणाऱ्या वाकरे, कुडित्रे, कोपार्डे, आडूर, कळंबे, भामटे, चिंचवडे या गावांनी गेल्या दहा वर्षांत आपल्या गावांतील उमेदवार निवडला गेला नाही ही भावनिक लाट निर्माण झाली आणि विलास पाटील यांना भरभरून मतदान केल्याने साडेतीन हजार इतक्या मताधिक्याने विजय मिळाला व प्रथमच काँग्रेसच्या बालेकिल्ल्याला खिंडार पडले. मतदारसंघ सर्वसाधारण महिलासाठी राखीव झाला असून, काँग्रेसकडे उमेदवारांची रांग असून, शिवसेनेकडे अगदी हाताच्या बोटावर इच्छुक उमेदवार आहेत. काँग्रेसकडे मातब्बर उमेदवार आहेत. इच्छुकांनी आ. सतेज पाटील, पी. एन. पाटील यांच्या गाठीभेटी घेऊन फिल्डिंग लावण्यास सुरुवात केली आहे. यात पाडळी खुर्द येथील डॉ. के. एन. पाटील यांनी पत्नी गीतांजली पाटील, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य डी. आर. पाटील यांनी स्नुषा अ‍ॅड. रूपाली संग्राम पाटील (शिंगणापूर), यशवंत बँकेचे संस्थापक शंकरराव पाटील यांनी स्नुषा रसिका अमर पाटील (शिंगणापूर), ‘कुडित्रे’चे माजी सरपंच बाळ पाटील यांनी पत्नी योगिता पाटील यांच्यासाठी तसेच रूपाली बोंद्रे यांनी उमेदवारीची मागणी केली आहे. शिवसेनेकडून विद्यमान सदस्य विलास पाटील हे पत्नी कल्पना पाटील यांच्या, तर कुंभी-कासारी कारखान्याचे संचालक अनिल पाटील हे पत्नी शीतल पाटील (वाकरे) यांच्या उमेदवारीसाठी आग्रही आहेत. शारदा वसंत पाटील (वाकरे) व कुडित्रेच्या वैष्णवी पाटील शिवसेनेतून, तर ‘स्वाभिमानी’कडून रूपाली बाजीराव देवाळकर इच्छुक आहेत.


काँग्रेसमध्ये बंडखोरी?
वाकरे पंचायत समिती गणासाठी भामटेचे माजी सरपंच सरदार पाटील शिवसेनेकडून, तर काँग्रेसकडून भगवान परीट, संजय कुंभार (वाकरे), महादेव तोडकर (वाकरे) इच्छुक आहेत. शिंगणापूर गणातून काँग्रेसकडून नागदेववाडीचे माजी सरपंच मंगेश गुरव पाटील, विश्वास कामिरे, विश्वास निगडे, बालिंगेचे उपसरपंच अजय भवड व अतुल बोंद्रे इच्छुक आहेत. सेनेतून मोहन पाटील (पाडळी खुर्द) यांची उमेदवारी निश्चित मानली जाते.

वैचारिक युती महत्त्वाची
काँग्रेसला हा आपला बालेकिल्ला पुन्हा मिळवायचा असेल, तर या मतदारसंघात सतेज पाटील आणि पी. एन. पाटील यांनी वैचारिक मतभेद विसरून एकत्र येण्याची गरज असल्याचे काँग्रेस कार्यकर्त्यांतून बोलले जात आहे. अन्यथा, या फुटीचा फायदा उठवीत मागील निवडणुकीत हा काँग्रेसचा बालेकिल्ला समजला जाणारा मतदारसंघ शिवसेनेने आपल्या ताब्यात घेतला.
या मतदारसंघात विधानसभा व कुंभी-कासारी कारखाना निवडणुकीत काही गावात शिवसेनेच्या मतात घट झाल्याचे चित्र आहे. ज्या गावात मतदानात घट झाली आहे तेथे शिवसेनेच्या उमेदवारांना जिवाचे रान करावे लागणार आहे.

शिवसेनेची ताकद
विद्यमान जि. प. सदस्य व ‘कुंभी-कासारी’चे संचालक विलास पाटील, ‘कुंभी’चे संचालक अनिल पाटील, वाय. एम. कांबळे, अ‍ॅड. बाजीराव शेलार, आनंदराव पाटील, कुंभी बँकेचे संचालक प्रकाश देसाई, बळवंत पाटील, कुंभी-कासारी सह. साखर कारखाना, कुंभी बँक.

काँग्रेसची ताकद
यशवंत बँक
एकमेव काँग्रेसकडे असून, बँकेचे संचालक व्ही. आर. पाटील, एकनाथ पाटील, भगवंत पाटील, बी. बी. पाटील, एम. एम. पाटील, उत्तम पवार हे यामध्ये या मतदारसंघात प्रतिनिधित्व करतात.


जिल्हा परिषद (इतर मागास पुरुष)
विलास पाटील (शिवसेना)१०,७९०
सुरेश रांगोळकर (काँग्रेस)७५५१
मोहन पाटील (राष्ट्रवादी)४४२०
आर. जी. कुंभार (जनसुराज्य)६६४
वाकरे पंचायत समिती (महिला खुला प्रवर्ग)
छाया माने (शिवसेना)६१९०
कमल पाटील (काँग्रेस)४७१३
नीता पाटील (राष्ट्रवादी)५००
संगीता पोवार - (अपक्ष)९६१
शिंगणापूर पंचायत समिती
(महिला मागास प्रवर्ग)
दीपा आवळे (शिवसेना)४२४८
गोकर्णी कांबळे (काँग्रेस)३९७४
दीपाली धनवडे (राष्ट्रवादी)२१३३
यशोदा चौगले (अपक्ष)६२१
२०१४ विधानसभा निवडणुकीतील
गावनिहाय मतदान पुढीलप्रमाणे
शिंगणापूर - ४७००, नागदेववाडी - ३४००, बालिंगा - ३९००, पाडळी खुर्द - ४४००, वाकरे - ४६००, कुडित्रे - ३७००, कोपार्डे - ३४००, आडूर - १३४९, कळंबे - ११७२, भामटे - १९००, चिंचवडे - ९५०

Web Title: 'Fielding' for 'Home Minister'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.