इचलकरंजीत माघारीसाठी ‘फिल्डिंग’
By admin | Published: November 4, 2016 12:13 AM2016-11-04T00:13:36+5:302016-11-04T00:13:36+5:30
माघारीनंतरच रंगत येणार : सामाजिक प्रश्नांची जाण असलेले चांगले उमेदवार निवडून देण्याचे आवाहन
अतुल आंबी ल्ल इचलकरंजी
नगरपालिका निवडणुकीचा छाननीपर्यंतचा पहिला टप्पा पार झाला असून, माघारीनंतरच मुख्य लढतीला रंग चढणार आहे. सध्या अनेक उमेदवारांकडून विरोधी उभारलेल्या उमेदवाराला माघारीसाठी ‘फिल्डिंग’ लावण्याचे कामकाज युद्धपातळीवर सुरू झाले आहे. तर दुसऱ्या बाजूला काही सामाजिक संघटनांकडून स्वच्छ, चारित्र्यवान, सामाजिक प्रश्नांची जाण असलेलाच उमेदवार निवडून देण्यासाठी नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे.
नगरपालिकेच्या मागील पाच वर्षांच्या कार्यकालात नगरपालिकेची ज्या उद्देशाने स्थापना करण्यात आली, त्या मुख्य उद्देशाचे पालन झाले नसल्याचे स्पष्टपणे दिसते. रस्ते, पाणी, आरोग्य, दिवाबत्ती या प्रमुख प्रश्नांकडे दुर्लक्ष झाल्याने जनतेतून वेळोवेळी उमटणाऱ्या तीव्र भावनांना सामोरे जावे लागले आहे. मात्र, ढिम्म प्रशासन व निर्ढावलेले प्रतिनिधी यांच्याकडून आवश्यक असणाऱ्या गरजा पूर्ण झाल्या नाहीत. याबाबत वेळोवेळी अनेक वृत्तपत्रांमध्ये जनतेची आंदोलने, मागण्या प्रसिद्ध करण्यात आल्या. मात्र, त्याकडेही प्रशासन व लोकप्रतिनिधींनी दुर्लक्षच केले. यावरून पाच वर्षांतील कामकाजाची पद्धत समजून येते.
मूलभूत गरजा व सोयीसुविधांसाठी अनेक भागांतून नागरिक व सामाजिक कार्यकर्त्यांनी मोर्चे काढले. उपोषणे, तीव्र आंदोलने केली. मात्र, निर्ढावलेल्यांना याचा काहीच फरक पडला नाही. त्यामुळे या निवडणुकीत जनतेने अशा कुचकामी लोकप्रतिनिधींना धडा शिकविण्यासाठी चांगल्या, जनहिताची कामे करणाऱ्यालाच निवडून द्यावे, असे आवाहन केले जात आहे. जनतेने त्याला प्रतिसाद दिल्यास चांगले लोकप्रतिनिधी निवडले जातील. त्यामुळे आगामी पाच वर्षांत जनहिताची आवश्यक कामे मार्गी लागतील. तसेच किमान मोर्चे, आंदोलने व वृत्तपत्रांमधून होणाऱ्या मागण्यांकडे लक्ष दिले जाईल, असेही आवाहन केले जात आहे. मागील पाच वर्षांत ‘सबका साथ सबका विकास’ असा नारा देत सत्तेत भेळ मिसळ झाल्याने नागरी कामांचा बोजवारा उडाला. सत्तेच्या सारिपाटात मुख्य उद्देश बाजूला पडला. त्यामुळे निकृष्ट रस्ते, वारंवार खुदाई, पुन्हा निकृष्ट रस्ते यांमुळे अनेक अपघात झाले. त्यामध्ये काही तरुणांना जीव गमवावा लागला. पिण्याच्या पाण्यासाठी काही भागात दोन दिवसांतून, तर काही ठिकाणी आठ दिवसांतून एकवेळ पाणीपुरवठा अशी गंभीर परिस्थिती राहिली. त्यात सन २०१२ साली काविळीची साथ पसरली. त्यामध्ये ४० जण मृत्युमुखी पडले, तर हजारो नागरिकांना लागण झाली. सन २०१५ मध्ये टॅँकरने पाणीपुरवठा करावा लागला. आरोग्याच्या बाबतीतही आयजीएम रुग्णालयाची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत गेली. तेथे किरकोळ मलमपट्टी व औषध, गोळ्या याशिवाय कोणतेच उपचार, शस्त्रक्रिया उपलब्ध नाहीत. शहरातील कामगार वर्गाची संख्या लक्षात घेता नगरपालिकेने आयजीएम रुग्णालयाची सेवा चांगल्या पद्धतीने सुरू ठेवणे क्रमप्राप्त होते. या सर्व बाबींकडे गांभीर्याने पाहण्याची वेळ आली असून, जनतेतून याबाबत उठाव होणे आवश्यक बनले आहे.
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गावगुंडांची हद्दपारी कधी?
निवडणूक कार्यकालात सर्वसामान्य उमेदवाराला व नागरिकांना भयमुक्त निवडणूक प्रक्रियेला सामोरे जाण्यासाठी आवश्यक उपाययोजना प्रशासनाकडून केल्या जातात. यामध्ये प्रामुख्याने गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या गावगुंडांना हद्दपार केले जाते. निवडणुकीचा छाननीपर्यंतचा पहिला टप्पा पार झाला आहे. मात्र, अद्यापही गावगुंडांच्या हद्दपारीची कारवाई करण्यात आलेली नाही. त्यामुळे पोलिस दलाच्या कामकाजाबाबत नाराजी व्यक्त होत आहे.