महापौरपदासाठी इच्छुकांची ‘फिल्डिंग’
By admin | Published: November 3, 2016 12:43 AM2016-11-03T00:43:32+5:302016-11-03T00:43:32+5:30
महानगरपालिका : माधवी गवंडी, हसीना फरास, अनुराधा खेडकर इच्छुक ; विरोधी आघाडीही लढणार
कोल्हापूर : महानगरपालिकेत अश्विनी रामाणे यांची महापौरपदाची मुदत १५ नोव्हेंबरला संपत असल्याने या पदासाठी इच्छुक असणाऱ्या राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी नेत्यांना प्रसन्न करण्यासाठी हालचाली वेगवान केल्या आहेत. या पदासाठी माधवी प्रकाश गवंडी, अनुराधा सचिन खेडकर आणि हसीना बाबू फरास या तीन नगरसेविका इच्छुक असून त्यांनी हे पद मिळविण्यासाठी नेत्यांकडे जोरदार ‘फिल्डिंग’ लावली आहे. येत्या आठवड्यात याबाबत महत्त्वपूर्ण घडामोडी होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
महानगरपालिकेत गेल्याच वर्षी नवीन सभागृह अस्तित्वात आल्यानंतर काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सत्तेवर आली; पण विरोधी बाकावर बसलेल्या भाजप-ताराराणी आघाडीही चिकाटीने लढून सत्तेच्या नजीक पोहोचली होती; पण पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना महापौर निवडणुकीत चमत्कार घडविता आला नाही. सध्या महापालिकेत काँग्रेस २९, राष्ट्रवादी काँग्रेस १५, भाजप १४, ताराराणी आघाडी १९ तर शिवसेना ४ असे संख्याबळ आहे.
काँग्रेस आणि राष्ट्रवादीने आघाडी करत जागावाटप करताना पदे वाटपाचा फॉर्म्युला ठरविला. पहिल्या वर्षी महापौरपदावर काँग्रेसच्या अश्विनी रामाणे तर उपमहापौरपदावर राष्ट्रवादीच्या शमा मुल्ला विराजमान झाल्या. या पदाची मुदत १५ नोव्हेंबरला संपत आहे. पुढील महापौरपद हे राष्ट्रवादीच्या कोट्यात असल्याने त्यासाठी माधवी गवंडी, अनुराधा खेडकर, हसीना फरास या तीन नगरसेविका इच्छुक आहेत. या तिघांनी या पदासाठी हालचाली वेगवान केल्या आहेत. गेल्या पाच वर्षांत आदिल फरास यांना स्थायी समिती सभापतिपद तर सचिन खेडकर यांना उपमहापौरपद देण्यात आले होते. त्यामुळे यंदा महापौरपदासाठी माधवी गवंडी ह्या प्रमुख दावेदार मानल्या जात आहेत. त्या पद्धतीने गवंडी यांनी नेत्यांकडे याबाबत आपले गाऱ्हाणे मांडले आहे. (प्रतिनिधी)
पदासाठी चाचपणी : उपमहापौर, स्थायी सभापतीसाठीही तयारी
राष्ट्रवादीला महापौरपद मिळणार असल्याने आता उपमहापौरपद आणि स्थायी सभापती ही दोन्हीही पदे काँग्रेसकडे राहणार.संजय मोहिते स्थायी सभापतिपदासाठी इच्छुक असले तरीही ते उपमहापौरपदासाठी चाचपणी करत आहेत.
फेबु्रवारीत होणाऱ्या स्थायी सभापतिपदासाठी मोहितेसह राहुल माने, संदीप नेजदार, भूपाल शेटे, दिलीप पवार हेही इच्छुक आहेत; पण कारकिर्दीत ज्यांनी कोणतीही पदे उपभोगली नाहीत त्यांची वर्णी सभापतिपदासाठी लागण्याची शक्यता आहे. त्यामध्ये नेजदार आणि माने यांची नावे अग्रभागी चर्चली जात आहेत.
महापौर हे ठरल्या वेळेनुसार आपल्या पदाचा राजीनामा निश्चित देतील तसेच संख्याबळानुसार काँग्रेसला पदे वाढवून मिळण्याबाबत पुढील आठवड्यात आमदार हसन मुश्रीफ यांच्यासोबत बैठक घेऊ.
- सतेज पाटील, आमदार
नेते आमदार सतेज पाटील यांचा आदेश आल्यानंतर आम्ही त्वरित राजीनामा देऊ; पण महापालिकेतील दोन्ही आघाडीतील सत्तासंघर्ष पाहता नगरपालिका निवडणुकीनंतर नेते या महापौरपदाच्या बदलांबाबत हालचाली करतील.
- अश्विनी रामाणे, महापौर
महापौर-उपमहापौरपदाची निवडणूक भाजप-ताराराणी आघाडी लढविणार आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीला ही निवडणूक बिनविरोध करू देणार नाही, तसेच आमचे नेते पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचे धोरण आहे.
- विजयराव सूर्यवंशी, भाजप, गटनेते
महापौर-उपमहापौरपदाची निवडणूक आम्ही बिनविरोध होऊ देणार नाही. राज्यात भाजप-सेना युती असल्यामुळे त्याचा परिणाम महापालिका निवडणुकीसाठी होईल. शिवसेना महापौर निवडणुकीत मदत करेल.
- सत्यजित कदम,
ताराराणी आघाडी, गटनेते