शाहूपुरीत तरुणावर प्राणघातक हल्ला
By admin | Published: August 22, 2016 12:44 AM2016-08-22T00:44:28+5:302016-08-22T00:44:28+5:30
‘सावकाश जा’ म्हटल्याचे कारण
कोल्हापूर : तोल जाऊन अंगावर पडत असल्यामुळे सावकाश जा, असे म्हटल्याच्या कारणावरून जाब विचारत संग्राम मोहनराव घोडके (वय ३०, रा. शाहूपुरी ७ वी गल्ली) याच्यावर अज्ञात तरुणांनी रविवारी रात्री प्राणघातक शस्त्रांनी हल्ला केला. यामध्ये संग्राम घोडके गंभीर जखमी झाला असून, त्याला नातेवाईक व मित्रांनी सीपीआर रुग्णालयात दाखल केले.
जखमी घोडके हा रविवारी रात्री शाहूपुरी दुसऱ्या गल्लीतील एका हॉटेलच्या दारातील पानपट्टीसमोर उभा होता. त्यावेळी हॉटेलमधून एक तरुण बाहेर आला. यावेळी तो तोल जाऊन घोडके याच्या अंगावर पडत होता. यामुळे घोडके याने त्याला शिस्तीत व सावकाश जा, असे म्हटले. या कारणावरून त्या तरुणाने घोडकेबरोबर वादावादी केली. तसेच त्याच्या अंगावर धावून गेला. त्यानंतर त्याने घोडके याला अन्य एका साथीदाराकडे नेले. त्यातीलच एका साथीदाराने घोडकेवर फरशीने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. यात घोडके ऐवजी त्यांच्यातीलच एका साथीदाराला ही फरशी लागली. त्यामुळे हा हल्ला घोडके यानेच केला, असा गैरसमज झाल्यामुळे अज्ञाताने आणखी साथीदारांना फोन करून बोलावून घेतले.
त्यानंतर त्याच्या साथीदारांनी तेथे येऊन घोडके याच्या पाठीवर व हातावर प्राणघातक शस्त्रांनी हल्ला चढविला. यामध्ये वार झाल्याने संग्राम रक्तबंबाळ झाला. यानंतर हल्लेखोर तेथून पसार झाले. ही घटना संग्रामच्या नातेवाईक व मित्रांना समजताच त्यांनी तेथे धाव घेत त्याला सीपीआर रुग्णालयात दाखल केले. सीपीआर परिसरात नातेवाइकांनी गर्दी केल्यामुळे तणाव निर्माण झाला होता. हल्लेखोरांपैकी एकाला ओळखत असल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. शाहूपुरी पोलिसांनी घटनास्थळी व सीपीआर रुग्णालयात येऊन जखमीकडे चौकशी केली. रात्री उशिरापर्यंत गुन्ह्णाची नोंद करण्याचे काम सुरू होते. (प्रतिनिधी)