पंचगंगा प्रदूषणमुक्त होईपर्यंत लढा -धैर्यशील माने यांचा निर्धार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2018 12:29 AM2018-06-09T00:29:16+5:302018-06-09T00:30:03+5:30
कोल्हापूर जिल्ह्याची वरदायिनी असलेल्या पंचगंगा नदीत कोल्हापूरपासून इचलकरंजीपर्यंत शहरातील सांडपाणी व औद्योगिकीरणाचे पाणी थेट नदीत सोडल्याने नदी प्रदूषण गंभीर बनले आहे.
कुरुंदवाड : कोल्हापूर जिल्ह्याची वरदायिनी असलेल्या पंचगंगा नदीत कोल्हापूरपासून इचलकरंजीपर्यंत शहरातील सांडपाणी व औद्योगिकीरणाचे पाणी थेट नदीत सोडल्याने नदी प्रदूषण गंभीर बनले आहे. लोकप्रतिनिधी, अधिकारी व प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे पंचगंगा गटारगंगा बनली आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळ हे प्रदूषण नियंत्रणाचे काम करीत नसून, तडजोडीचे काम करीत आहे. त्याचे पाप पंचगंगाकाठच्या नागरिकांना भोगावे लागत असून, नदी प्रदूषणमुक्त होईपर्यंत लढा सुरूच राहील, असा इशारा जिल्हा परिषदेचे सदस्य धैर्यशील माने यांनी केले.
पंचगंगा नदी प्रदूषण विरोधी कृती समितीच्यावतीने येथील नगरपालिका चौकात एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करण्यात आले. यावेळी माने बोलत होते. प्रारंभ समितीचे पदाधिकारी व पंचगंगाकाठच्या नागरिकांनी तेरवाड (ता. शिरोळ) बंधाऱ्यावर नदीपात्रात उतरून जलपर्णी घेऊन व मानवी विळखा घालून नदी प्रदूषण करणाºया घटकांचा व प्रशासनाचा निषेध कला. त्यानंतर येथील पालिका चौकात एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करण्यात आले.
यावेळी नगराध्यक्ष जयराम पाटील, दादासो पाटील, प्रा. चंद्रकांत मोरे, रामभाऊ मोहिते, उपनगराध्यक्ष अक्षय आलासे, आप्पासोबंडगर, विलास कांबळे, सतीशभंडारे, आदींनी आंदोलन यशस्वी होईपर्यंत लढा सुरूच ठेवण्याचा निर्धार केला.यावेळी कुरुंदवाड अर्बन बँकेचे अध्यक्ष अरुण आलासे, साधना मंडळाचे जयपाल बलवान, दीपक पोमाजे, सुनील कुरुंदवाडे, कृष्णा लोकरे, दीपक गायकवाड, अभिजित पाटील, मधुकर सासणे, विश्वास बालिघाटे, किरण आलासे यांच्यासह नागरिक आंदोलनात सहभागी झाले होते.
माणगाव बंद उद्या
रुकडी माणगाव : पंचगंगा बचाव कृती समितीने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत माणगाव (ता. हातकणंगले) येथे उद्या, रविवारी गावबंद व जागृती फेरीसह साखळी उपोषण करण्याचे येथील महादेव मंदिरात झालेला सर्वपक्षीय बैठकीत जाहीर करण्यात आले. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी सरपंच अश्विनी पाटील होत्या.
पंचगंगा प्रदूषण मुक्तीसाठी रुकडी येथे पंचगंगा बचाव कृती समितीच्या वतीने दि. १ जूनपासून पुकारण्यात आलेल्या साखळी उपोषणाची दाहकता वाढत असून, हातकणगंले व शिरोळ तालुक्यांत या साखळी उपोषणाला वाढता पाठिंबा मिळत आहे. या उपोषणामध्ये माणगाववाडीचे ग्रामस्थही सहभागी होणार असल्याची माहिती झाकीर भालदार यांनी दिली.
पंचगंगा नदी प्रदूषण विरोधी कृती समितीच्यावतीने तेरवाड येथील पंचगंगा नदीला मानवी विळखा घालताना जिल्हा परिषदेचे सदस्य धैर्यशील माने, विश्वास बालिघाटे, दादासो पाटील, प्रा. चंद्रकांत मोरे, विलास कांबळे यांच्यासह कृती समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.