पंधरा दिवसानंतर नागरीकांनी अनुभवला गारवा, फॅनी चक्रीवादळाचा परिणाम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 2, 2019 03:56 PM2019-05-02T15:56:26+5:302019-05-02T16:00:51+5:30
बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या फॅनी चक्रीवादळाच्या तीव्रतेने किनारपट्टीवरील जनजीवन हादरले असताना कोल्हापुरात मात्र कमालीचा गारवा जाणवत असून गार वाऱ्यामुळे उन्हाच्या झळांची तीव्रता कमी झाली आहे. तीन दिवसापुर्वी ४२ अंश सेल्सीअसच्या पुढे गेलेले तापमान अचानक ३५अंश सेल्सीअसपर्यंत खाली आले आहे. दोन दिवसात तापमान ७ अंश सेल्सीअसनी घट झाल्याने नागरीकांना मोठा दिलासा मिळाला आहे. पुढील आठवडाभर असेच कमी तापमान राहणार आहे.
कोल्हापूर: बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या फॅनी चक्रीवादळाच्या तीव्रतेने किनारपट्टीवरील जनजीवन हादरले असताना कोल्हापुरात मात्र कमालीचा गारवा जाणवत असून गार वाऱ्यामुळे उन्हाच्या झळांची तीव्रता कमी झाली आहे.
तीन दिवसापुर्वी ४२ अंश सेल्सीअसच्या पुढे गेलेले तापमान अचानक ३५अंश सेल्सीअसपर्यंत खाली आले आहे. दोन दिवसात तापमान ७ अंश सेल्सीअसनी घट झाल्याने नागरीकांना मोठा दिलासा मिळाला आहे. पुढील आठवडाभर असेच कमी तापमान राहणार आहे.
उष्णतेच्या लाटेमुळे गेल्या पंधरा दिवसापासून कोल्हापूर कमालीचे तापले होते. एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यातच तापमानाचा पारा ४0 अंशाच्या पुढे गेला होता. गेल्या दहा वर्षातील सर्वाधिक उष्ण महिना म्हणून एप्रिलची नोंद झाली.
तप्त झळांनी जनजीवन पूर्णपणे होरपळून गेले होते. मागील आठवडाभर तर तापमान ४३ अंशाकडे वेगाने झेपावू लागल्याने दुपारी घराबाहेर पडणेही मुश्लिक झाले होते.
तीव्र झळांनी जीव कासावीस होत असतानाच बुधवारपासून अचानक वातावरणात बदल जाणवू लागला. सकाळबरोबर दुपारीही गार वारे वाहत असल्याने उन्हाची तीव्रता जाणवत नाही. उन्हाची प्रखरताही कमी झाली आहे.
रात्रीचे तापमानही २२ अंश सेल्सीअसपर्यंत कमी झाल्याने पहाटे थंडी जाणवत आहे. गेल्या महिन्याभरात अत्यूच्च तापमानाचा आणि असह्य उन्हाच्या झळा सोसलेल्या कोल्हापुरकरांना दोन दिवसापासून आल्हादायक वातावरणाचा सुखद अनुभव येत आहे.