पंधरा मिनिटांत अनेक संसार उघड्यावर!

By admin | Published: May 5, 2017 12:22 AM2017-05-05T00:22:50+5:302017-05-05T00:22:50+5:30

वादळी वाऱ्याचा तडाखा : वाघेरी, मेरवेवाडीत घरांची पडझड; झाडे कोसळली, वीजखांबही जमीनदोस्त; शेतीचे नुकसान

In fifteen minutes, many worlds open! | पंधरा मिनिटांत अनेक संसार उघड्यावर!

पंधरा मिनिटांत अनेक संसार उघड्यावर!

Next

कऱ्हाड/ओगलेवाडी : वादळी वाऱ्यासह बुधवारी रात्री झालेल्या जोरदार पावसामुळे कऱ्हाड तालुक्यातील अनेक गावांत घरांचे नुकसान झाले. काही ठिकाणी घराचे छत उडाले. तर काही ठिकाणी घर तसेच वाहनावर झाड मोडून पडले. काही गावांमध्ये वीजपुरवठा रात्री उशिरापर्यंत खंडित होता. तसेच रस्त्यावर झाडे मोडून पडल्याने वाहतूकही काहीकाळ विस्कळीत झाली होती.
कऱ्हाड तालुक्यातील वाघेरी आणि मेरवेवाडी परिसरात बुधवारी रात्री वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. पावसापेक्षा वाऱ्याचा वेग प्रचंड असल्याने या परिसरात मोठे नुकसान झाले. संजय शिवराम गायकवाड यांच्या घरावरील कौले, राजाराम कोंडिबा गायकवाड यांचे पत्र्याचे शेड, सुदाम कोंडिबा गायकवाड, हणमंत गणपत पवार, अरुण बाबूराव पवार या सर्वांच्या घरावरील कौले, रशिद जाफर मुल्ला, रफीक उमर पटेल, इब्राहिम खाजीमियाँ पटेल, निजाम मुल्ला, अल्लाउद्दीन मुसांडे, इम्रान चांद पटेल, राहुल नेताजी गायकवाड, बापू ज्ञानू पाटोळे, पोपट गोपाळ पाटोळे, अशोक कोळी, प्रकाश बापू साळुंखे, कासिम गुलाबहुसेन पटेल, लक्ष्मण गोविंद माळी, दादामियाँ पटेल, युसूफ शमशुद्दीन पटेल, बाबूराव धोंडी गुरव, हुसेन धोंडी पटेल, मधुकर दत्तात्रय पाटोळे, बरकत मुल्ला, हासिम सुलतान पटेल, महादेव संपत पवार, संगीता सुखदेव साळुंखे, भीमराव अण्णा पवार, लिलाताई भीमराव तुपे यांच्या घरावरील पत्रे आणि कौले उडून गेल्याने मोठे नुकसान झाले आहे.
घरावरील छतच उडून गेल्यामुळे घरात साठवलेले धान्य तसेच संसारोपयोगी साहित्य भिजले आहे. वर्षभरासाठी साठवलेले धान्य भिजल्याने वर्षभर खायचे काय, असा प्रश्न संबंधित कुटुंबासमोर उभा आहे. सुमारे पन्नास ते साठ क्विंटल ज्वारी, गहू, शेंगा तसेच कडधान्य
पावसात भिजले आहे. त्याचबरोबर इलेक्ट्रॉनिक साहित्यही भिजले आहे. विजेच्या तारा, खांब कोसळले
आहेत. आंबा पिकाचेही मोठे नुकसान झाले आहे. या पावसामुळे वाघेरी आणि मेरवेवाडीतील अनेक कुटुंबांना बेघर होण्याची वेळ आली आहे. प्रशासनाने या नुकसानीचा तातडीने पंचनामा करून त्वरित नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी होत आहे. (प्रतिनिधी)


अनेकांना निवारा शोधण्याची वेळ
पहिल्याच पावसात घराचे छप्पर उडून गेल्याने अनेकांना राहण्यासाठी तात्पुरते घर शोधावे लागत आहे. गुरुवारी काहीजणांनी घराच्या डागडुजीचे काम हाती घेतले होते. तर काहीजणांनी प्लास्टिक कागद वापरून निवारा तयार करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. काही घरांवरील पत्रा एवढ्या लांबवर जाऊन पडला होता की तो गोळा करतानाही ग्रामस्थांना शिवार तुडवावे लागत होते.


करवडीत वीज खांब कोसळला
शामगाव : बुधवारी रात्री झालेल्या वादळी वाऱ्यामुळे करवडी येथे रस्त्यानजीक असलेला वीज खांब मोडून पडला. या खांबावरील तारा एकमेकांत गुंतल्याने शॉर्टसर्किट होऊन तांत्रिक बिघाड झाला. परिणामी, करवडीसह परिसरातील गावांमधील वीजपुरवठा काहीकाळ खंडित झाला होता. गुरुवारी खांब उभा करून वीजपुरवठा सुरळीत करण्याचे काम सुरू होते.


मलकापूर परिसराला तडाखा
मलकापूर : परिसरात बुधवारी सायंकाळी वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने थैमान घातले. वादळी वाऱ्यात वेलवर्गीय पिकांचे मांडव भुईसपाट झाले. तर भाजीपाला पिकांच्या शेतात पाणी साचल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. मलकापूर, कापील, जखिणवाडी, नांदलापूर, चचेगावसह परिसरात भाजीपाला पिके घेणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या जास्त आहे.
लोकप्रतिनिधींकडून नुकसानीची पाहणी
जिल्हा परिषद सदस्य निवास थोरात यांच्यासह प्रशासकीय अधिकारी व लोकप्रतिनिधींनी परिसरातील गावांची पाहणी केली. तसेच नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याची सूचनाही त्यांच्याकडून देण्यात आली आहे. संबंधित कुटुंबांना तातडीने नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही निवास थोरात यांनी दिली.


चिंचमळ्यात संरक्षक भिंत कोसळली
चिंचमळा येथे कऱ्हाड-पुसेसावळी रस्त्यालगत गारमेंट कंपनी आहे. या कंपनीभोवती संरक्षक भिंत उभारण्यात आली असून, बुधवारच्या वादळी वाऱ्यात वीस फूट भिंत जमीनदोस्त झाली. सुदैवाने यावेळी परिसरात कोणीही नव्हते. त्यामुळे जीवितहानी टळली.

Web Title: In fifteen minutes, many worlds open!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.