अधिकाऱ्यांसह पंधरा पोलिसांची चौकशी
By admin | Published: February 25, 2017 12:25 AM2017-02-25T00:25:02+5:302017-02-25T00:25:02+5:30
‘वारणा’ चोरी प्रकरण : न्यायालयाचा आदेश
कोल्हापूर : वारणानगर (ता. पन्हाळा) येथील वारणा शिक्षण मंडळाच्या शिक्षक कॉलनीतील तीन कोटी रुपयांच्या चोरीप्रकरणी सांगली-कोल्हापूरच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या चार अधिकाऱ्यांसह पंधरा पोलिसांची वरिष्ठ स्तरावर चौकशी सुरू आहे. शुक्रवारी सांगलीतील राष्ट्रपती पदकप्राप्त कॉन्स्टेबलसह तिघांची अप्पर पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा यांनी कसून चौकशी केली. या गुन्ह्यांतील संशयित आरोपी मोहिद्दीन ऊर्फ मैनुद्दीन अबुबकर मुल्ला (रा. जाखले, ता. पन्हाळा) याने पोलिसांच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.
मार्च २०१६ मध्ये सांगली पोलिसांनी मिरजेतील बेथेलहेमनगरमध्ये मैनुद्दीन मुल्ला याच्याकडे तीन कोटींची रक्कम उघडकीस आणली होती. त्यानंतर तपासामध्ये वारणा शिक्षण मंडळाच्या शिक्षक कॉलनी बिल्डिंग नंबर ५ मध्ये चोरी झाल्याचे उघडकीस आले. ही रक्कम कोल्हापुरातील बांधकाम व्यावसायिक व मल्टिडेव्हलपर्सचे मालक झुंजार माधवराव सरनोबत यांची असल्याची त्यांनी कोडोली पोलिसांत फिर्याद दिली. त्यानंतर सांगली पोलिसांनी मैनुद्दीनचा ताबा कोल्हापूर पोलिसांकडे दिला. येथील स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांना कॉलनीतील रूममध्ये आणखी एक कोटी ३१ लाख २९ हजार रुपये मिळून आले.
मैनुद्दीन मुल्ला याच्याकडे कोट्यवधी रुपयांचे घबाड सापडल्यानंतर सांगली-मिरज येथील काही पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मैनुद्दीनला या प्रकरणातून सहीसलामत बाहेर काढण्याचे आमिष दाखवून पैशांवर हात मारल्याची चर्चा त्यावेळी पुढे आली होती. बुलेट खरेदी प्रकरणात मिरज गांधी चौक पोलिस ठाण्याचा कॉन्स्टेबल इरफान नदाफ, त्याचा भाऊ साजिद नदाफ हे कागदोपत्री सापडले. त्यांना खात्यातून काढूनही टाकले; परंतु आणखी काही माहीर रेकॉर्डवर आले नाहीत. कोल्हापूर पोलिसांच्या ताब्यातून सुटल्यानंतर मैनुद्दीनने सांगली येथील वकिलाच्या मदतीने थेट उच्च न्यायालयात सांगली-कोल्हापूरच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या विरोधात याचिका दाखल केली. न्यायालयाने याप्रकरणी वरिष्ठ स्तरावर चौकशी करण्याचे आदेश अप्पर पोलिस अधीक्षक शर्मा यांना दिले. त्यानुसार ही चौकशी सुरू आहे. कायद्यात ४१ (ब) प्रमाणे आरोपीला पोलिस कोठडी देता येत नसताना तुम्ही मागितली कशी, त्याला न्यायालयाने ती कोणत्या मुद्द्यावर दिली. मैनुद्दीनसोबत सौदा करणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांची सखोल चौकशी करून अहवाल पाठविण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. त्यानुसार ही चौकशी सुरू आहे. (प्रतिनिधी)
वारणा चोरी प्रकरणाची व्याप्ती मोठी असून, काही अधिकाऱ्यांसह पोलिसांची चौकशी सुरू आहे.
- सुहेल शर्मा,
अप्पर पोलिस अधीक्षक
मार्च २०१६ मध्ये सांगली पोलिसांनी मैनुद्दीन मुल्ला याच्याकडे तीन कोटींची रक्कम उघडकीस आणली होती.
कोल्हापूर पोलिसांच्या ताब्यातून सुटल्यानंतर मैनुद्दीनने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली