शहरात पंधरा रस्ते, पन्नास चौकांचे रुंदीकरण
By admin | Published: March 9, 2016 12:53 AM2016-03-09T00:53:54+5:302016-03-09T00:53:54+5:30
महापालिकेत जिल्हाधिकाऱ्यांची बैठक : आयलँड होणार छोटे; विद्युत खांबांचे महिन्याभरात स्थलांतर
सांगली : महापालिका हद्दीतील पंधरा रस्ते व पन्नास चौकांच्या रुंदीकरणाचा निर्धार मंगळवारी जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांच्या उपस्थितीत महापालिकेत झालेल्या बैठकीत करण्यात आला. यासंदर्भातील नियोजन महिन्याभरात करण्याचे आदेशही त्यांनी दिले. विद्युत खांब स्थलांतरण, भुयारी विद्युत वाहिनी, आयलँड छोटे करण्यावर बैठकीत चर्चा झाली.
जिल्हाधिकारी गायकवाड यांच्या उपस्थितीत पहिल्यांदाच पालिकेच्या विविध प्रश्नांवर महापालिकेत बैठक झाली. या बैठकीसाठी महापौर हारुण शिकलगार यांनी पुढाकार घेतला होता. या बैठकीला उपमहापौर विजय घाडगे, स्थायी समिती सभापती संतोष पाटील, गटनेते किशोर जामदार, विरोधी पक्षनेते दिग्विजय सूर्यवंशी, स्वाभिमानीचे गटनेते शिवराज बोळाज, आयुक्त अजिज कारचे, काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, वाहतूक शाखेचे निरीक्षक दादासाहेब चुडाप्पा यांच्यासह महापालिका, जीवन प्राधिकरण, वीज व एसटी महामंडळाचे अधिकारी उपस्थित होते.
बैठकीत शहरातील पन्नास चौकांचे रुंदीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला. या चौकातील अतिक्रमणांबाबत मार्किंग करून येत्या दहा ते बारा दिवसात व्हिडीओ चित्रीकरणासह सादरीकरण करण्याची सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी केली.
सांगली, मिरज व कुपवाड या तीन शहरातील पंधरा रस्त्यांच्या रुंदीकरणावर चर्चा झाली. मुख्य बाजारपेठेतील रस्त्याबाबतचा वाद न्यायालयात आहे. त्यावरही तोडगा काढण्यात येईल. स्फूर्ती चौक ते विश्रामबाग, राजवाडा चौक ते रिसाला रोड या रस्त्यांच्या रुंदीकरणाचा निर्णय घेण्यात आला. जिल्हाधिकारी गायकवाड यांनी, ज्यांनी एफएसआय अथवा टीडीआरचा लाभ घेतला आहे, पण त्यांचे बांधकाम रस्त्यावरच आहे, अशांची बांधकामे तातडीने हटविण्याचे आदेश महापालिकेला दिले. शहरातील अनेक चौकात मोठे आयलँड आहेत. त्यामुळे वाहतुकीची कोंडी होते. मोठे आयलँड छोटे करण्याची सूचना गायकवाड यांनी केली.
वीज मंडळाकडे पैसे भरूनही विद्युत खांबांचे स्थलांतरण रखडल्याची तक्रार महापौर शिकलगार यांनी केली. त्यावर गायकवाड यांनी, पंचमुखी मारुती रस्ता व मिरजेतील शिवाजी रोडवरील विद्युत खांबांचे स्थलांतर पंधरा दिवसांत करण्याचे आदेश दिले. शहरातील शंभरफुटी रस्ता व आंबा चौक ते ईदगाह मैदानापर्यंतच्या रस्त्यावर भुयारी विद्युत वाहिनीचा आराखडा तयार करण्यास सांगितले. शहरातील विजेचे खांब तारामुक्त करण्यासाठी वीज वितरणने नियोजन करावे. किमान प्रायोगिक तत्त्वावर एक रस्ता वीजवाहिनीमुक्त करावा, अशी सूचना त्यांनी केली.
ड्रेनेज, पाणीपुरवठा व शेरीनाला योजनेबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी जीवन प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांची खरडपट्टी केली. साऱ्याच योजनांची कामे अर्धवट कशी राहिली? असा सवालही त्यांनी केला. ड्रेनेजच्या मुख्य वाहिनीच्या चाचणीचे काम सुरू आहे. त्यानंतर शंभरफुटी रस्त्याचे डांबरीकरण होऊ शकते. शेरीनाल्याच्या कामात शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पाणी पोहोचविण्यासाठी दोन ते तीन कोटीची गरज आहे. ती तरतूद पालिकेने करावी, अशी मागणीही जीवन प्राधिकरणने केली. पण आयुक्त कारचे यांनी त्याला नकार दिला. महापालिका हद्दीबाहेर निधी कसा खर्च करणार?, असा सवाल त्यांनी केला.
पाणी पुरवठ्याचे ५६ एमएलडी जलशुद्धीकरण केंद्राचे काम ६० टक्के पूर्ण झाले आहे. येत्या पाच ते सहा महिन्यात हे काम पूर्ण होऊ शकते. त्यासाठी पावणेदोन कोटीची आवश्यकता आहे. ७० एमएलडीच्या प्रकल्पासाठी ३०.६८ कोटीची गरज आहे. त्यासाठी वित्त आयोग व इतर शासकीय निधीतून तरतूद केली जात असल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले.
पार्किंग व्यवस्थेवरही बैठकीत चर्चा झाली. विकास आराखड्यात पार्किंगसाठी १३ जागा आरक्षित आहेत. त्यापैकी तीन जागा पालिकेच्या ताब्यात आहेत. त्या ठिकाणी पार्किंगसाठी आवश्यक सुविधा देण्याची सूचना गायकवाड यांनी केली. रस्त्यावरील बाजार हटविण्यासाठी ठिकठिकाणी भाजी मंडई उभारण्याचे आदेशही त्यांनी दिले. पालिकेने तातडीने फेरीवाला धोरणानुसार नो फेरीवाला झोन जाहीर करण्याची सूचनाही त्यांनी केली. (प्रतिनिधी)
या रस्त्यांचा यादीत समावेश
सांगली - आलदर चौक ते स्फूर्ती चौक, राजवाडा चौक ते रिसाला रोड, आनंद चित्रमंदिर ते कुंभार खिंड, पटेल चौक ते कर्नाळ पोलीस चौकी, झुलेलाल चौक ते शंभरफुटी, तानाजी चौक ते कर्नाळ चौकी, बापट बाल ते अमरधाम, फौजदार गल्ली ते शाहू उद्यान, कॉलेज कॉर्नर ते आपटा पोलीस चौकी, सिव्हिल हॉस्पिटल ते शंभरफुटी. मिरज - सावंत कॉर्नर ते पोलीस स्टेशन, आंबेडकर पुतळा ते सांगली रोड, गांधी पुतळा ते बॉम्बे बेकरी, बॉम्बे बेकरी ते कमान वेस, महाराणा प्रताप चौक ते प्रांत आॅफिस, स्टेशन चौक ते लक्ष्मी मार्केट, जिलेबी चौक ते मालगाव रोड, नागोबा कट्टा ते बॉम्बे बेकरी.