पंधरा हजार गरजूंना मिळाला दिलासा : आमदार जाधव यांनी दिले जीवनावश्यक मदतीचे किट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2020 05:29 PM2020-04-24T17:29:53+5:302020-04-24T17:32:47+5:30
पालकमंत्री पाटील यांनी या उपक्रमाला सर्वतोपरी सहकार्य करू, असे सांगितले. पाच किलो तांदूळ आणि पाच किलो गहू अशा वस्तूंचा समावेश असलेले हे जीवनावश्यक किट आहे. जीवनावश्यक वस्तूंचे पॅकिंग व त्यांच्या वितरणाची पूर्ण जबाबदारी दीपक चोरगे व त्यांचे सहकारी सांभाळत आहेत.
कोल्हापूर : काँगे्रसचे आमदार चंद्रकांत जाधव यांच्या वतीने उत्तर विधानसभा मतदारसंघातील गोरगरीब १५ हजार नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात येत आहे. पालकमंत्री सतेज पाटील यांच्या हस्ते शुक्रवारी साहित्य वाटपाला सुरुवात झाली. यावेळी चेंबर आॅफ कॉमर्सचे अध्यक्ष संजय शेटे, चेंबर आॅफ कॉमर्सचे माजी अध्यक्ष आनंद माने, नगरसेवक संभाजी जाधव, सचिन पाटील, स्थायी समितीचे माजी सभापती राजेश लाटकर, उद्योजक उदय दुधाणे यांची प्रमुख उपस्थिती होती.
कोरोणा विषाणूमुळे लॉकडाऊन केल्याने अनेकांचे रोजगार बंद असून, महिना झाले ते घरातच थांबून आहेत. त्यांच्यासमोर उदरनिर्वाह कसा करायचा हा प्रश्न आहे. अशा गोरगरीब जनतेला मदतीचा हात देण्यासाठी आमदार चंद्रकांत जाधव यांनी पुढाकार घेतला आहे. १५ हजार गरजूंना जीवनावश्यक वस्तूंचे किट देण्यात येत आहे. दोन टप्प्यांत देण्यात येणाऱ्या मदतीला पालकमंत्री सतेज पाटील यांच्या हस्ते शुक्रवारी किटसच्या वाटपाने सुरुवात झाली. पालकमंत्री पाटील यांनी या उपक्रमाला सर्वतोपरी सहकार्य करू, असे सांगितले. पाच किलो तांदूळ आणि पाच किलो गहू अशा वस्तूंचा समावेश असलेले हे जीवनावश्यक किट आहे. जीवनावश्यक वस्तूंचे पॅकिंग व त्यांच्या वितरणाची पूर्ण जबाबदारी दीपक चोरगे व त्यांचे सहकारी सांभाळत आहेत. यावेळी संपतराव पाटील, किरण मेथे, संग्राम गायकवाड, किशोर खानविलकर, स्वप्निल साळोखे, दुर्गेश लिंग्रस, कमलकार जगदाळे, संभाजी पोवार उपस्थित होते.
महाविकास आघाडीकडून गरजूंना मदत केली जात आहे. यामधून कोणी वंचित राहत असेल त्यांना लोकप्रतिनिधी, सामाजिक संस्था मदत करीत आहेत. पालकमंत्री सतेज पाटील या संदर्भात सर्वांशी समन्वय ठेवून आहेत. यामध्ये खारीचा वाटा म्हणून शासनाच्या मदतीपासून वंचित राहिलेल्या १५ हजार कुटुंबांना आपणाकडून जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले जात आहे. प्र्रभागनिहाय संबंधित नगरसेवकांकडून यादी घेऊन किटच वाटप घरपोहच केले जाणार आहे.
- चंद्रकांत जाधव, आमदार