पंधराव्या वित्त आयोगाच्या निधीबाबत मार्ग काढणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2021 04:17 AM2021-06-21T04:17:48+5:302021-06-21T04:17:48+5:30
कोल्हापूर : राज्यातील सर्व जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांचा १३३७ कोटी रुपयांचा निधी तांत्रिक कारणामुळे खर्च करता येत नसल्याच्या ...
कोल्हापूर : राज्यातील सर्व जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांचा १३३७ कोटी रुपयांचा निधी तांत्रिक कारणामुळे खर्च करता येत नसल्याच्या रविवारी ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीची दखल ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी घेतली आहे. उद्या, मुंबईत ग्रामविकास विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीत याबाबत मार्ग काढला जाईल, असे त्यांनी सांगितले.
पंधराव्या वित्त आयोगाचा निधी केंद्र सरकारकडून दिला जातो. आधीच्या जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या खर्चाचे सर्व लेख अद्यावत केल्याशिवाय हा निधी वापरता येत नाही आणि दुसरीकडे राज्यातील असे पाच वर्षांचे लेख अद्ययावत करणे बाकी आहे, अशी परिस्थिती निर्माण झाल्याची वस्तुस्थिती ‘लोकमत’ने मांडली. केवळ तांत्रिक अडचणीमुळे गेले काही महिने हा निधी पडून आहे. कोरोना स्थिती आणि पुढील वर्षी होणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुका यामुळे अनेक अडचणी निर्माण झाल्याचे वास्तव चित्र मांडण्यात आले होते.
याची दखल घेत मंत्री मुश्रीफ यांनी रविवारी सकाळीच जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अरुण जाधव यांना बोलावून त्यांच्याशी या विषयावर चर्चा केली आणि लवकरच निर्णय घेत असल्याचे सांगितले.
कोट
केंद्र शासनाच्या काही तांत्रिक अटींमुळे हा निधी खर्च करता येत नसल्याचे ‘लोकमत’च्या बातमीद्वारे मला समजले. याबाबत मी प्राथमिक चर्चा केली आहे. उद्या मुंबईत गेल्यानंतर ग्रामविकास आणि आवश्यकता भासल्यास वित्त विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेऊन यातून मार्ग काढला जाईल.
हसन मुश्रीफ
ग्रामविकास मंत्री