पन्नाशीच्या पुलांचे होणार ‘स्ट्रक्चलर आॅडिट’
By admin | Published: August 8, 2016 12:29 AM2016-08-08T00:29:06+5:302016-08-08T00:29:06+5:30
प्राथमिक पाहणी पूर्ण : पावसाळ्यानंतर होणार सुरुवात; प्रामुख्याने ब्रिटिशकालीन पुलांचा समावेश
प्रवीण देसाई कोल्हापूर
माणसाचे वयोमान जसे वाढत जाते तशा त्याच्या प्रकृतीत तक्रारी वाढतात तसेच काही पुलांचे आहे. त्यामुळे जिल्ह्णातील ५० वर्षांपेक्षा अधिक वयोमान झालेल्या पुलांसह ब्रिटिशकालीन पुलांचे ‘स्ट्रक्चलर आॅडिट’ पावसाळ्यानंतर होणार आहे. त्याची प्राथमिक पाहणी अभियंत्यांच्या पथकाने केली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीतील जिल्ह्णातील ४६ लहान-मोठ्या ब्रिटिशकालीन पुलांसह ५० वर्षे पूर्ण झालेल्या १५०हून अधिक पुलांचा यामध्ये समावेश आहे.
महाड (जि. रायगड) येथील पूल दुर्घटनेत जीवितहानी झाली. त्यामुळे खडबडून झालेल्या राज्य शासनाने विधिमंडळ अधिवेशन सुरू असताना राज्यातील सर्वच पुलांचे ‘स्ट्रक्चलर आॅडिट’ करण्याचे आदेश दिले. त्या पार्श्वभूमीवर दोन दिवसांपूर्वी जिल्हाधिकारी अमित सैनी यांनीही सार्वजनिक बांधकाम विभाग, राष्ट्रीय महामार्ग विभाग व जिल्हा परिषदेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाला पत्र पाठवून हे आॅडिट करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्या अनुषंगाने सार्वजनिक बांधकाम खात्याचे वरिष्ठ अभियंते, माजी तज्ज्ञ अभियंते आदींच्या पथकाने जवळपास सर्वच पुलांची प्राथमिक पाहणी केली आहे. त्यामध्ये पुलाच्या बांधकामाला कुठे तडे गेले आहेत का? कुठे झीज झाली आहे का? बांधकाम कमकुवत होत आहे का? आदींची माहिती घेतली.
पावसाळा सुरू असल्याने स्ट्रक्चलर आॅडिट करता येत नसल्याने ते पावसाळा संपल्यानंतर आॅक्टोबर महिन्यात केले जाणार आहे. जिल्ह्णात सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अखत्यारित ४०४ पूल आहेत. त्यामध्ये ५१ मोठे पूल व ३५३ लहान पुलांचा समावेश आहे. यातील ब्रिटिशकालीन मोठे पूल ४ व लहान ४२ पूल आहेत. या पुलांचे स्ट्रक्चलर आॅडिट होणार आहे. याशिवाय ब्रिटिश भारतातून गेल्यानंतर देश स्वतंत्र झाल्यावर भारत सरकारने बांधलेल्या पुलांनीही नव्वदी ओलांडली असून त्यातील ५० वर्षे पूर्ण झालेल्या १५०हून अधिक पुलांचे आॅडिट केले जाणार आहे.
पन्नाशी पूर्ण केलेले पूल
विभाग पूलाचे नाव बांधकामाचे साल
करवीर बालिंगा १८८५
आजरा व्हिक्टोरिया १८८७
कागल निढोरी १९०३
भुदरगड कूर १९३४
राधानगरी सरवडे १९५०
गडहिंग्लज भडगाव १९६०
चंदगड घटप्रभा १९६५-६६
भुदरगड गारगोटी १९६६
चंदगड ताम्रपर्णी १९६७
आजरा चिकोत्रा १९७०
‘स्ट्रक्चलर आॅडिट’ची प्रक्रिया चालते दहा दिवस
पुलांचे स्ट्रक्चलर आॅडिट करण्याची प्रक्रिया दहा दिवस चालते. त्यामध्ये पुलाच्या बांधकामाचे काही अवशेष काढून त्याची चाचणी घेतली जाते. कॉँक्रीटचीही बारीक पद्धतीने तपासणी केली जाते.
या पुलावरून किती वाहने जाण्याची क्षमता आहे, त्याचबरोबर त्या तुलनेत किती वाहने जातात हे ही पाहिले जाते आदी स्वरुपाची ही प्रक्रिया आहे. या प्रक्रियेत एका पुलासाठी दहा दिवस लागतात.
शिवाजी पुलाचेही स्ट्रक्चलर आॅडिट पावसाळ्यानंतर
पंचगंगा नदीवरील शिवाजी पुलाचे बांधकाम हे सन १८७८ ला पूर्ण झाले असून जिल्ह्णातील तो ‘सर्वांत जुना ब्रिटिशकालीन पूल’ म्हणून ओळखला जात आहे. या पुलाची मालकी आता राष्ट्रीय महामार्ग विभागाकडे असून त्यांच्याकडेच याची देखभाल दुरुस्ती आहे. पावसाचा जोर वाढून मच्छिंद्री झाल्याने हा पूल सध्या वाहतुकीसाठी बंद करण्यात आला असून या पुलाचेही स्ट्रक्चलर आॅडिट पावसाळ्यानंतर होणार आहे.
जिल्हा परिषदेचे एकूण ८३ पूल
जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाच्या अखत्यारित जिल्ह्णात एकूण ८३ पूल असून त्यात १० मोठे व ७३ लहान आहेत. ग्रामविकास विभागाच्या माध्यमातून याची देखभाल-दुरुस्ती पाहिली जाते. त्यातील सर्वच पुलांची पाहणी करण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी दिले आहेत.