माणगावच्या स्मारकासाठी पन्नास लाखांचा निधी
By admin | Published: December 26, 2015 12:21 AM2015-12-26T00:21:50+5:302015-12-26T00:25:04+5:30
बौद्ध धम्म महापरिषद : जयसिंगपूरच्या बौद्धविहारासाठी तत्काळ निधी देणार; राजकुमार बडोले यांची घोषणा
बौद्ध धम्म महापरिषद : जयसिंगपूरच्या बौद्धविहारासाठी तत्काळ निधी देणार; राजकुमार बडोले यांची घोषणा
जयसिंगपूर : डॉ़ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीवर्षानिमित्त शासनाने विकास निधी कार्यक्रम हाती घेतला आहे. दलितवस्तीच्या विकासाबरोबर डॉ़ बाबासाहेबांच्या सर्व स्मारकांना कोणताही निधी कमी पडू दिला जाणार नाही़ माणगाव (ता. हातकणंगले) येथील स्मारकासाठी पंधरा दिवसांत निधी उपलब्ध करून देऊ, तसेच जयसिंगपूर येथील वैशाली बौद्ध विहारासाठी कमी पडलेला निधी शासनाकडून तत्काळ उपलब्ध करु, अशी घोषणा सामाजिक न्यायमंत्री ना़ राजकुमार बडोले यांनी केली़
येथील बाबासाहेब आंबेडकर बौद्ध संस्कार मंडळ, रमाई उपासिका संघ व शिरोळ तालुका बौद्धधर्म प्रचार समितीच्या वतीने, अखिल भारतीय रौप्य महोत्सवी बौद्ध धम्म महापरिषदेत मंत्री बडोले बोलत होते़ अध्यक्षस्थानी प्रा़ डॉ़ खेमधम्मो महाथेरो होते़ स्वागत स्वागताध्यक्ष आ़ उल्हास पाटील यांनी केले. प्रास्ताविक डॉ़ आंबेडकर बौद्ध संस्कार मंडळाचे अध्यक्ष गणपती कांबळे यांनी केले. यावेळी आ़ सुरेश हाळवणकर, आ़ सुजित मिणचेकर, उत्तर प्रदेशचे माजी खासदार बलीहरी बाबू यांची भाषणे झाली.
दत्त कारखान्याचे अध्यक्ष गणपतराव पाटील, दलितमित्र अशोकराव माने, उद्योगपती सुरेशदादा पाटील, बाबा देसाई यांच्यासह विठ्ठल पाटील, मिलींद शिंदे, शैलेश गाडे, रमेश यळगूडकर, अॅड़ संभाजीराजे नाईक, सतीश मलमे, सुनील शेळके, अभिजित आलासकर, रमेश शिंदे, उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश सरवदे, आदी उपस्थित होते़
पू. भदन्त प्राचार्य डॉ़ खेमधम्मो यांच्या अध्यक्षतेखाली कल्याणमित्र डॉ़ एस़ पी़ गायकवाड यांच्याहस्ते परिषदेचे उद्घाटन व धम्मध्वजारोहण झाले़ शिरोळ येथून डॉ़ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरून धम्मज्योत येथील परिषदेस आणली़
भदन्त उपगुप्तजी महाथेरो, भदन्त प्रज्ञाशील महाथेरो, भदन्त यशकाश्यपायन महाथेरो, भदन्त गुणरत्न ज्ञारक्षित, भगन्त संबोधी यांनी आपल्या धम्मदेसनेने उपस्थितांना संबोधित केले़ दुपारच्या सत्रात इंग्लंड येथील डॉ़ बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान खरेदी करून ते लोकार्पण केल्याबद्दल, तर जपान येथे डॉ़ बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्णाकृती पुतळा व इंदू मिलच्या जागेत डॉ़ बाबासाहेबांचे स्मारक उभारण्याचा निर्णय घेतल्याबद्दल राज्य शासनाचे आभार मानण्यात आले़ मंत्री बडोले, आमदार हाळवणकर, आमदार मिणचेकर, आमदारपाटील यांना सन्मानपत्र, सन्माचिन्ह देऊन गौरविण्यात आले़
राजकुमार बडोले : १५ दिवसांत निधी देऊ
मनुष्य राग, द्वेष, मोह, लोभ, मत्सर अशा शत्रूंनी ग्रासलेला आहे़ त्याला शांती फक्त आणि फक्त बौद्ध धम्माच्या आचरणानेच मिळू शकते़
आठ शिलांचे पालन केले तर कोणतेही संकट येणार नाही़
प्रा़ धनंजय कर्णिक, प्रा़ प्रवीण चंदनशीव, सदाशिव कमलापती यांच्याकडून विहारास ५० लाख रुपयांची देणगी.
भगवानबुद्धांच्या करुणेतून मिळालेल्या धम्माचा अंगिकार करून त्यानुसार आचरण करून आपले जीवन पवित्र बनवावे, असा उपदेश या परिषदेचे मुख्य भदन्त प्रा़ डॉ़ खेमधम्मो महाथेरो यांनी दिला़
धम्मलोक या स्मरणिकेचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन झाले.
धम्म महापरिषदेत विविध अकरा ठराव संमत करण्यात आले.