बहुजनांनी शिक्षण व्यवस्था बदलण्यासाठी लढा द्यावा
By admin | Published: October 30, 2016 11:59 PM2016-10-30T23:59:12+5:302016-10-30T23:59:12+5:30
बी. जी. कोळसे-पाटील : शामराव देसाई जीवन आणि कार्य ग्रंथाचे प्रकाशन
कोल्हापूर : सध्याची शिक्षण व्यवस्था अशीच सुरू राहिली, तर त्यामुळे बहुजन समाजाचे मोठे नुकसान होणार आहे. ते टाळण्यासाठी शिक्षण व्यवस्था बदलण्यासाठी बहुजन समाजाने लढा द्यावा, असे प्रतिपादन निवृत्त न्यायमूर्ती बी. जी. कोळसे-पाटील यांनी रविवारी येथे केले.
महाराष्ट्र इतिहास प्रबोधिनीतर्फे ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार संपादित ‘राष्ट्रवीरकार शामराव देसाई : जीवन व कार्य’ या चरित्रग्रंथाच्या प्रकाशन कार्यक्रमात ते बोलत होते. बेळगावमधील ज्योती महाविद्यालयाच्या प्रांगणात झालेल्या कार्यक्रमात अध्यक्षस्थानी इतिहास प्रबोधिनीचे अध्यक्ष अॅड. श्रीपतराव शिंदे, तर ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. पवार, शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे, डॉ. डी. आर. मोरे, महापौर सरिता पाटील, अॅड. राजाभाऊ पाटील प्रमुख उपस्थित होते.
निवृत्त न्यायमूर्ती कोळसे-पाटील म्हणाले, बालवाडी ते पदव्युत्तरपर्यंतचे सर्व शिक्षण मोफत आणि दर्जेदार देण्याची जबाबदारी शासनाची असावयास हवी; पण विद्यमान सरकारने भांडवलशाही अर्थव्यवस्था स्वीकारल्यामुळे संबंधित जबाबदारी झटकली आहे. सध्या जी शिक्षण व्यवस्था आहे, ती अशीच सुरू राहिल्यास त्यामुळे बहुजन समाजाचे मोठे नुकसान नजीकच्या काळामध्ये होणार आहे. ते टाळण्यासाठी बहुजन समाजाने लढा देण्यास सिद्ध व्हावे. सामाजिक, शैक्षणिक व सहकार क्षेत्रांतील कार्याद्वारे देसाई यांनी समाजाला दिशा देण्याचे काम केले. डॉ. पवार म्हणाले, राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी केलेल्या सामाजिक सुधारणांना पुढे नेण्याचे काम शामराव देसाई व त्यांच्या सहकाऱ्यांनी त्या काळामध्ये केले. त्यामुळेच या परिसराचे परिवर्तन होऊ शकले. कुलगुरू डॉ. शिंदे म्हणाले, शामराव देसाई यांचे विचार समाजाला आजही उपयुक्त ठरणारे आहेत. हे विचार स्वीकारणे गरजेचे आहे. प्रमुख उपस्थितांच्या हस्ते ‘राष्ट्रवीरकार शामराव देसाई : जीवन व कार्य’ या चरित्रग्रंथाचे प्रकाशन झाले. यावेळी माजी खासदार निवेदिता माने, दीपक दळवी, पी. जी. मंडोळकर, प्रकाश मरगाळे, आदी उपस्थित होते. इतिहास प्रबोधिनीच्या संचालिका डॉ. मंजुश्री पवार यांनी स्वागत केले. प्राचार्य आनंद मेणसे यांनी सूत्रसंचालन केले. राजाभाऊ पाटील यांनी आभार मानले.
देसाई यांच्या नावाने पुरस्कार
राष्ट्रवीरकार शामराव देसाई यांच्या कार्य आणि विचारांचे स्मरण चिरंतन ठेवण्यासाठी त्यांच्या नावाने परिवर्तन चळवळीत काम करणाऱ्या कार्यकर्त्यास दरवर्षी ५१ हजार रुपयांचा पुरस्कार देण्याची घोषणा ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. पवार यांनी यावेळी केली. ते म्हणाले, हा पुरस्कार कायम सुरू राहण्यासाठी किमान दहा लाख रुपयांचा निधी उभारण्यात यावा. यासाठी कोल्हापूरकरांतर्फे एक लाख रुपये दिले जातील.