हनुमान तलावावर काँग्रेस-शिवसेनेतच लढाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2021 04:20 AM2021-01-02T04:20:49+5:302021-01-02T04:20:49+5:30

हनुमान तलावाची उमेदवारी कोणाला मिळणार, याची उत्सुकता प्र. क्र. ३ हनुमान तलाव (सर्वसाधारण महिला) रमेश पाटील ...

Fight between Congress and Shiv Sena on Hanuman Lake | हनुमान तलावावर काँग्रेस-शिवसेनेतच लढाई

हनुमान तलावावर काँग्रेस-शिवसेनेतच लढाई

Next

हनुमान तलावाची उमेदवारी कोणाला मिळणार, याची उत्सुकता

प्र. क्र. ३ हनुमान तलाव

(सर्वसाधारण महिला)

रमेश पाटील

कसबा बावडा : कसबा बावड्यातील प्रभाग क्रमांक ३ हनुमान तलाव या प्रभागात यंदा काँग्रेस, शिवसेना आणि भाजप-ताराराणी आघाडी असा तिरंगी सामना रंगणार असला, तरी खरी लढाई काँग्रेस आणि शिवसेनेतच होण्याची शक्यता आहे. प्रभाग क्रमांक ३, हनुमान तलाव हा सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षित झाला आहे. त्यामुळे आई, पत्नीला उमेदवारी मिळवून देण्यासाठी सर्वच पक्षांतील कार्यकर्त्यांनी जोर लावला आहे. विशेष या प्रभागात उमेदवारांची संख्या तुलनेत कमी असली, तरी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या या प्रभागातून काँग्रेसकडून उमेदवारी कोणाला मिळते, याची उत्सुकता आहे. मागील दोन निवडणुकीत विद्यमान नगरसेवक डॉ. संदीप नेजदार यांनी या प्रभागाचे नेतृत्व केले. मागील निवडणुकीत नेजदार यांच्या ओबीसी कुणबी जातीच्या दाखल्याचा मुद्दा चांगलाच गाजला होता. विरोधकांनी हरकत घेतल्याने त्यांचे नगरसेवकपद रद्द झाले होते. त्यामुळे पोटनिवडणुकीसाठी अनेकांनी तयारीही सुरू केली होती; मात्र फेरसुनावणीत नेजदार यांचे नगरसेवकपद पुन्हा ग्राह्य धरण्यात आले. आता पुन्हा या निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची तयारी नेजदार यांनी केली होती. मात्र हा प्रभाग सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षित झाल्याने त्यांनी पत्नी डॉ. सरोज किंवा आई लक्ष्मीबाई विलास नेजदार यांच्यापैकी एकाला निवडणुकीत उभे करणार असल्याचे घोषित केले आहे. त्यादृष्टीने त्यांनी तयारीही चालवली आहे.

नेजदार यांच्याविरोधात गत निवडणुकीत शिवसेनेचे राहुल माळी यांनी धनुष्यबाण उचलले होते. यंदा ते आई सरिता धोंडीराम माळी यांना रिंगणात उतरविण्याच्या तयारीत आहेत. गतवेळी शिवसेनेने या प्रभागात चांगली मते घेतली होती. सद्यस्थितीत काँग्रेस व शिवसेना यांच्यात एकमेकांवर आरोप, प्रत्यारोपाच्या फैरी झडत असल्याने या प्रभागात पुन्हा काँग्रेस विरुद्ध शिवसेना अशीच लढत पाहावयास मिळणार आहे. भाजपही या प्रभागातून आपला उमेदवार उभा करण्याची शक्यता आहे. दरम्यान, या प्रभागातून श्रीराम सोसायटीच्या माजी उपाध्यक्षा व विद्यमान संचालिका वनिता विजय बेडेकर व सुलोचना सुरेश पाटील याही काँग्रेसकडून महानगरपालिकेत जाण्यासाठी इच्छुक आहेत.

गत निवडणुकीत प्रमुख उमेदवारांना मिळालेली मते : १) डॉ. संदीप नेजदार (काँग्रेस) २९८३ (विजयी) २) राहुल माळी (शिवसेना) १०१५ ३) पुष्पांजली संकपाळ (स्वाभिमानी) ५६४ ..................................

भागातील सोडवलेले नागरी प्रश्न....

प्रभागातील सर्वात मोठे आणि लक्षात राहणारे काम म्हणजे स्मशानभूमी. राज्यात मॉडेल ठरावी, अशी ही स्मशानभूमी आहे. त्यासाठी अडीच कोटी रुपये खर्च करण्यात आला आहे. प्रभागातील अनेक भागात रस्ते, गटारींची कामे केलेली आहेत. सध्या या प्रभागात फेरफटका मारला असता, काही ठिकाणी कामे सुरू असल्याचे दिसून आले. प्रभागात अनेक भागात पुरेशा दाबाने पाणी येते. प्रभागात मोठ्या दोन झोपडपट्ट्या आहेत. तिथला घरकुलाचा प्रश्न प्रलंबित होता. तो आता मार्गी लागला आहे. बहुतेक झोपडपट्टीधारकांना प्रॉपर्टी कार्ड देण्यात आले आहे.

प्रभागातील शिल्लक नागरी प्रश्न...

या प्रभागातील हनुमान तलाव उद्यानाची दुरवस्था झाली आहे. उद्यानातील अनेक बल्ब फुटले आहेत. खेळाचे साहित्य मोडले आहे. काही ठिकाणी पडझड झाली आहे. तलावात आजूबाजूच्या परिसरातील सांडपाणी मिसळत आहे. त्यामुळे पाणी दूषित झाले आहे. त्याला दुर्गंधीयुक्त वास येतो. याशिवाय प्रभागातील काही भागात कमी दाबाने पाणी येते. अनेक भागाची दैनंदिन स्वच्छता होत नसल्याच्या तक्रारी आहेत. काही रस्त्यांना वर्षानुवर्षे डांबर लागलेले नाही.

कोट : प्रभागात अनेक विकासकामे केली आहेत. अनेक भागात रस्ते, गटारींची कामे केली आहेत. त्यासाठी सुमारे ३ कोटी ५० लाखांहून अधिक रुपये खर्च केले आहेत. सध्याही ८० लाखांची कामे प्रलंबित आहेत. लवकरच ती पूर्ण केली जातील. प्रभागातील झोपडपट्टीधारकांना प्रॉपर्टी कार्ड मिळवून देण्यात यश आले आहे. प्रभागातील १०७ घरकुल योजनेचा प्रश्न सोडवला आहे. प्रभागातील प्रिन्स शिवाजी शाळा येथे १० लाख लिटर क्षमतेच्या पाण्याच्या टाकीचे काम सुरू आहे. डॉ. संदीप नेजदार नगरसेवक प्र. क्र. ३

फोटो: ०१ प्रभाग क्रमांक३

कसबा बावडा हनुमान तलाव प्र. क्र. ३ तीन मधील हनुमान उद्यानाची दुरवस्था झाली आहे. उद्यानातील विद्युत बल्ब पूर्णपणे फुटले असून, तलावात जलपर्णी वाढल्याने तलावाचे पाणी दूषित झाले आहे.

(फोटो -रमेश पाटील,कसबा बावडा )

Web Title: Fight between Congress and Shiv Sena on Hanuman Lake

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.