कोल्हापुरातील कळंबा कारागृहात कैद्यांच्या दोन टोळ्यांमध्ये उडाली धुमश्चक्री; एकजण जखमी
By ऑनलाइन लोकमत | Published: January 3, 2023 11:24 AM2023-01-03T11:24:51+5:302023-01-03T11:25:12+5:30
कारागृहात अचानक कैद्यांचे दोन गट भिडल्याने कर्मचारी आणि अधिकाऱ्यांची तारांबळ उडाली
कोल्हापूर : कळंबा कारागृहात मोक्का अंतर्गत शिक्षा भोगत असलेल्या सातारा जिल्ह्यातील कैद्यांच्या दोन टोळ्यांमध्ये पूर्ववैमनस्यातून धुमश्चक्री उडाली. सोमवारी (दि. २) सकाळी नऊच्या सुमारास घडलेल्या घटनेत मल्लिक ऊर्फ दत्तात्रय रामचंद्र जाधव (रा. सातारा) हा कैदी जखमी झाला. याबाबत कारागृह अधिकारी सतीश दिनकरराव माने (वय ५४, रा. कारागृह अधिकारी निवासस्थान, कळंबा) यांनी जुना राजवाडा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून, पोलिसांनी चार कैद्यांवर गुन्हा दाखल केला.
सलीम ख्वाजासाहेब शेख, रोहन राजेंद्र जाधव, समाधान राजेेंद्र जाधव आणि प्रतीक संजू जाधव (सर्व रा. सातारा) अशी गुन्हा दाखल झालेल्या कैद्यांची नावे आहेत. कैदी मल्लिक ऊर्फ दत्तात्रय जाधव याला मधुमेहाचा त्रास होत असल्याने सोमवारी सकाळी कारागृहातील कर्मचारी त्याला वैद्यकीय तपासणीसाठी कारागृहातील दवाखान्यात घेऊन गेले होते. तपासणी करून परतताना सर्कल क्रमांक सहाच्या समोरील रिकाम्या जागेत चार कैद्यांनी जाधव याला अडवले.
धक्काबुक्की करीत त्याच्यावर विटा आणि दगड भिरकावले. हा प्रकार घडताच कारागृह कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी तातडीने धाव घेऊन कैद्यांना पांगवले. जाधव याच्या गटातील ही काही कैदी धावून आल्याने तणाव वाढला होता. दरम्यान, मारहाणीत दत्तात्रय जाधव जखमी झाला.
कारागृह कर्मचाऱ्यांची उडाली तारांबळ
कारागृहात अचानक कैद्यांचे दोन गट भिडल्याने कर्मचारी आणि अधिकाऱ्यांची तारांबळ उडाली. तातडीने सर्व कर्मचाऱ्यांनी बळाचा वापर करीत कैद्यांना त्यांच्या सर्कलमध्ये घालवले. तसेच दगडफेक आणि मारहाण करणाऱ्या कैद्यांना ताब्यात घेऊन त्यांची स्वतंत्र सर्कलमध्ये रवानगी करण्यात आली. या घटनेमुळे कारागृहातील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
कारागृहाची झडती
कारागृहातील एका सर्कलमध्ये रविवारी (दि. १) सीमकार्ड नसलेला मोबाइल सापडला होता. त्यानंतर सतर्क झालेल्या कारागृह अधिकाऱ्यांनी सोमवारी सर्व सर्कलची झडती घेतली. झडती दरम्यान कर्मचाऱ्यांना अन्य मोबाइल किंवा सीमकार्ड हाती लागले नाही, अशी माहिती प्रभारी कारागृह अधीक्षक पांडुरंग भुसारी यांनी दिली.