Kolhapur: शाहूवाडी-पन्हाळा मतदारसंघात विनय कोरेंचे पुन्हा चांगभलं की सरुडकर वचपा काढणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2024 04:13 PM2024-10-21T16:13:47+5:302024-10-21T16:16:26+5:30

सरदार चौगुले पोर्ले तर्फ ठाणे : विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुकीत सलग दोनवेळा पराभव झालेल्या माजी आमदार सत्यजित पाटील (सरूडकर) ...

Fight between Vinay Kore and Satyajit Patil Sarudkar in Shahuwadi-Panhala Constituency | Kolhapur: शाहूवाडी-पन्हाळा मतदारसंघात विनय कोरेंचे पुन्हा चांगभलं की सरुडकर वचपा काढणार?

Kolhapur: शाहूवाडी-पन्हाळा मतदारसंघात विनय कोरेंचे पुन्हा चांगभलं की सरुडकर वचपा काढणार?

सरदार चौगुले

पोर्ले तर्फ ठाणे : विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुकीत सलग दोनवेळा पराभव झालेल्या माजी आमदार सत्यजित पाटील (सरूडकर) यांनी महाविकास आघाडीतून पुन्हा एकदा जनसुराज्य पक्षाचे विनय कोरे यांचा विरोधात दंड थोपटल्याने शाहूवाडी-पन्हाळा विधानसभेत पारंपरिक लढत होणार असल्याचे चित्र सध्यातरी आहे.

राज्याच्या राजकारणात सध्या महाविकास आघाडी विरुध्द महायुती असे राजकारण असले तरी शाहुवाडी-पन्हाळ्यातील राजकीय स्थिती वेगळी आहे. स्थानिक विरोध म्हणून आघाडीतील उमेदवाराला काँग्रेस नेत्यांचा तर युतीच्या उमेदवाराला अजित पवार गटाच्या नेत्यांचा विरोध असल्याने आघाडीचा धर्म नेत्यांकडून धाब्यावर बसवल्याचे चित्र आहे.

गत निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीने उमेदवारी दिली नसल्याने त्याचा फायदा कोरेंना झाला. लोकसभा निवडणुकीत मतदारसंघातील काँग्रेसच्या नेत्यांनी आघाडी धर्म पाळला नसल्याचा आरोप उध्दवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केला होता. स्वाभिमानी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आपली भूमिका स्षष्ट केली नसली तर मतदारसंघातील एका महिलेसह तीन नेत्यांनी शेट्टी यांच्याकडे उमेदवारीची मागणी केल्याचे समजते. मतदारसंघात निर्णायक मतदान असलेले स्वाभिमानी आणि वंचित आपला उमेदवार देणार की तटस्थ राहून लोकसभेच्या पराभवाचा वचपा काढणार, हा येणारा काळ ठरवेल.

गायकवाड, पाटील कोरेंच्या पाठीशी

काँग्रेस नेते कर्णसिंह गायकवाड आणि अमर पाटील यांचा सत्यजित पाटील यांना विरोध असून, याची कोरेंना मदत होणार आहे. अजित पवार गटाचे बाबासाहेब पाटील (आसुर्लेकर) आणि मानसिंगराव गायकवाड यांचा मुलगा रणवीरसिंह गायकवाड यांचा विनय कोरेंना विरोध, तर सत्यजित पाटील यांना उघड पाठिंबा आहे. त्यामुळे सत्तेच्या राजकारणात कितीही आघाड्या झाल्या तरी मतदारसंघात नेत्यांत बिघाडी असल्याचे चित्र आहे.

कोडोलीचे जयंत पाटील यांच्या भूमिकेकडे लक्ष

कोडोलीचे डॉ. जयंत पाटील यांच्याही उमेदवारीची चर्चा असून पाटील बंडखोरी करणार की पक्षातून हे अजून अस्पष्ट आहे.  याबाबत पाटील यांनी अद्याप उमेदवारीबाबत भाष्य केलेले नाही. किती दिवस दुसऱ्याच्या वळचणीला राहून राजकारण करायचे, असा मुद्दा उपस्थित करत संजयसिह गायकवाड गटाने लढण्याची तयारी केली आहे. माजी जिल्हा परिषद सदस्य योगीराज गायकवाड यांचे नाव बैठकीत पुढे करण्यात आले आहे. 

२०१९ चा निकाल

  • विनय कोरे १,२४,८६८
  • सत्यजित पाटील ९७,००५


सध्याचे मतदार

  • एकूण मतदार ३,०२,७८०
  • पुरुष १,५५,७९५
  • महिला १,४६,९७८
  • इतर ७

Web Title: Fight between Vinay Kore and Satyajit Patil Sarudkar in Shahuwadi-Panhala Constituency

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.