दुष्काळ निवारणासाठी लढा
By admin | Published: April 2, 2016 12:36 AM2016-04-02T00:36:42+5:302016-04-02T00:37:00+5:30
गणपतराव देशमुख : जयसिंगपुरात स्व़ सा़ रे़ पाटील समाजभूषण पुरस्कार प्रदान
जयसिंगपूर : दुष्काळी भागाचे निर्मूलन करण्याची आज मोठी गरज बनली आहे़ नागनाथअण्णा नायकवडी यांच्यासारख्या नेत्याने दुष्काळी भागात खरी चळवळ उभी केली होती़ दुष्काळात जन्माला आलो असलो तरी परिवर्तनाचा लढा अखेरपर्यंत सुरूच ठेवणार आहे़ पाणी ही नैसर्गिक संपत्ती आहे़ दुष्काळी भागालाही पाण्याचा समान वाटा मिळालाच पाहिजे़ सा़ रे़ पाटील यांच्या पुरस्कारातून दुष्काळ निवारणासाठी मला पुन्हा बळ मिळाले आहे, असे उद्गार आमदार गणपतराव देशमुख यांनी व्यक्त केले़
येथील नवा महाराष्ट्र परिवाराच्या वतीने स्व़ डॉ़ सा़ रे़ पाटील यांच्या प्रथम पुण्यतिथीनिमित्त विधानसभेचे ज्येष्ठ आमदार गणपतराव देशमुख यांना यावर्षीचा राज्यस्तरीय स्व़ डॉ़ आप्पासाहेब ऊर्फ सा़ रे़ पाटील समाजभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला़
माजी राज्यपाल राम प्रधान व अमेरिकेतील भारतीय राजदूत ज्ञानेश्वर मुळे यांच्या हस्ते रोख १ लाख १ हजार रुपये व मानपत्र देऊन देशमुख यांचा गौरव करण्यात आला़ प्रारंभी स्व़ सा़ रे़ पाटील व स्व़ एस़ एम़ जोशी यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले़ येथील नगरपालिकेसमोरील विक्रमसिंह क्रीडांगणावर हा कार्यक्रम सोहळा पार पडला़
सत्कारमूर्ती गणपतराव देशमुख म्हणाले, सा़ रे़ पाटील यांच्या नावाने मिळालेला पुरस्कार हा माझा वैयक्तिक नसून तो दुष्काळी भागातील जनतेचा आहे़ सेवादलाच्या माध्यमातून सा़ रे़ पाटील यांनी स्वत:ला घडवून सहकार क्षेत्रात उल्लेखनीय क्रांती केली़ वसंतदादा पाटील, यशवंतराव चव्हाण यांच्याबरोबरच त्यांचेही पश्चिम महाराष्ट्राला आजही प्रेरणा देणारे आहे़
ज्ञानेश्वर मुळे म्हणाले, समाजवादी विचारांची जोपासना
सा़ रे़ पाटील यांनी अखेरपर्यंत केली. सातत्याने चळवळीला वाहून घेणारा नेता म्हणून गणपतराव देशमुख यांचे दुष्काळी भागात दीपस्तंभासारखे काम आहे़ महाराष्ट्राच्या पुरोगामी चळवळीत सा़ रे़ पाटील यांच्यासारखी माणसे आता पुन्हा होणे कठीण आहे. त्यातीलच एक अलौकिक ठसा असलेले गणपतराव देशमुख यांच्या कर्तृत्वाचे बळ पाहून हा पुरस्कार त्यांना दिला आहे़, ही उल्लेखनीय बाब आहे़
यावेळी डॉ़ सुधीर भोंगळे, विजय भोजे, माजी राज्यपाल राम प्रधान यांनी मनोगते व्यक्त केली़ स्वागत व प्रास्ताविक विनोद सिरसाट यांनी केले़ मानपत्र वाचन सर्जेराव पवार यांनी केले़ कार्यक्रमास माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे, दत्त कारखान्याचे अध्यक्ष गणपतराव पाटील, आमदार उल्हास पाटील, नगराध्यक्ष युवराज शहा, सभापती सुवर्णा आपराज, उद्योगपती अशोक कोळेकर, अण्णासाहेब पाटील, सिदगोंडा पाटील, एम़ व्ही़ पाटील, बी़ बी़ शिंदे, दलितमित्र अशोकराव माने, अनिल यादव, राजेंद्र नांद्रेकर, मिलिंद शिंदे, दिलीप पाटील-कोथळीकर, राजेश सानिकोप, संजय पाटील-कोथळीकर, सर्जेराव शिंदे, आप्पासाहेब लठ्ठे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते़