‘कुंभी’च्या मानधनसाठी आज लढत
By admin | Published: January 13, 2017 12:59 AM2017-01-13T00:59:03+5:302017-01-13T00:59:03+5:30
कुंभी-कासारी मानधनधारक कुस्ती स्पर्धा : सचिन जामदार-संग्राम पाटील यांच्यात अंतिम सामना
कोपार्डे : कुंभी-कासारी साखर कारखान्याच्या मानधनधारक कुस्ती स्पर्धेत खुल्या गटात सचिन जामदार (कोपार्डे) व संग्राम पाटील (देवठाणे) यांनी आपआपल्या प्रतिस्पर्धी मल्लांवर विजय मिळवीत अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. आज, शुक्रवारी सर्व गटांतील अंतिम लढती होणार आहेत.
पै. युवराज पाटील कुस्ती संकुलाच्या प्रांगणात उभारण्यात आलेल्या आखाड्यात कुंभी-कासारी मानधनधारक कुस्ती स्पर्धेच्या खुल्या गटातील उपांत्य लढती रोमहर्षक लढतीने पार पडल्या. उपांत्य सामन्यात संग्राम पाटील याने धनाजी पाटीलवर पहिल्या हाफमध्ये दोनवेळा दुहेरी पट काढून ४ गुणांची आघाडी घेतली. दुसऱ्या हाफमध्ये संग्रामने आक्रमक होत पुन्हा डूब डावावर दोन गुण घेऊन धनाजी पाटील याच्यावर आघाडी घेऊन एकतर्फी विजय मिळवीत अंतिम फेरीत प्रवेश केला, तर दुसऱ्या लढतीत पंचांनी सचिन जामदारला विरोधी मल्ल रोहित पाटीलने निष्क्रिय कुस्ती केल्याने पहिला गुण दिला. त्यानंतर जामदारने एकेरी पट काढून एक गुणाची वसुली करीत दोन विरुद्ध ० अशी आघाडी घेतली. दुसऱ्या हाफमध्ये रोहितने दुहेरी पट काढण्याचा केलेला प्रयत्न विफल गेला व सलग आठ गुणांची नोंद करीत जामदारने विजय मिळविला.
८४ किलो वजनगटात सनिकेत राऊत (पडळ) याने स्वप्निल पाटील (महे) याच्यावर विजय मिळविला. दुसऱ्या लढतीत पंडित चाबूक (पासार्डे) याने सोहेब मुल्लाणी (कोगे) याला चितपट केले.
७४ किलो वजन गटात प्रवीण पाटील (चाफोडी) याने परशुराम बंगे याला चितपट केले. स्वप्निल पाटील (वाकरे) याने पृथ्वीराज पाटील याच्यावर सलग १० गुणांची नोंद करीत विजय मिळविला.
५० किलो वजन गटात अनिकेत पाटील (आमशी), अतुल चेचर (पोर्ले), सूरज कांबळे (दोनवडे), भूषण पाटील (खुपिरे) यांनी विरोधी मल्लांवर विजय मिळविला. ६० किलो वजन गटात सुशांत तांबोळकर (पाचाकटेवाडी), संदीप जामदार (कोपार्डे), विजय पाटील (पासार्डे), ऋषीकेश देसाई (भामटे) हे मल्ल विजयी झाले. ५५ किलो वजन गटात शुभम पाटील (आमशी), विकास पाटील (आमशी), दीपक कांबळे (आमशी), विक्रम मोरे (कोगे) यांनी उपांत्य फेरीत प्रवेश केला.
यावेळी कारखान्याचे अध्यक्ष आमदार चंद्रदीप नरके, उपाध्यक्ष किशोर पाटील, सर्व संचालक, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता पी. आर. जाधव उपस्थित होते. पंच म्हणून संभाजी वरुटे, संभाजी पाटील, रंगराव हरणे, बाबा शिरगावकर, संदीप पाटील, विष्णू पाटील, बबन चौगले, रघुनाथ मोरे, बाजीराव पाटील, कृष्णात पाटील, भरत कळंत्रे, शिवाजी पोवाळकर, शिवाजी पाटील, बापू लोखंडे, दादू चौगले, आनंदा खराडे यांनी काम पाहिले, तर निवेदक म्हणून यशवंत पाटील यांनी काम पाहिले . (वार्ताहर)
भोगावती कारखान्याची निवडणूक जाहीर
१२ फेब्रुवारीला मतदान : १३ ला मतमोजणी; राजकीय हालचालींना वेग, आजपासून अर्ज भरण्यास प्रारंभ
भोगावती : शाहूनगर परिते (ता. करवीर) येथील भोगावती सहकारी साखर कारखान्याचा निवडणूक कार्यक्रम अखेर सहकार प्राधिकरणाने गुरुवारी जाहीर केला. यानुसार कारखान्याच्या २१ जागांसाठी १२ फेब्रुवारीला मतदान होणार आहे.
मतमोजणी १३ फेब्रुवारीला होणार आहे. निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया आज, शुक्रवारपासून सुरू होत आहे. कारखान्याची निवडणूक जाहीर झाल्यामुळे राजकीय हालचालींना वेग आला आहे. दरम्यान, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या काळातच ‘भोगावती’ची निवडणूक जाहीर झाल्याने अनेक सभासदांनी नाराजी व्यक्त केली आहे.
उमेदवारांना आजपासून मंगळवार (दि. १७) पर्यंत अर्ज दाखल करता येतील. १८ जानेवारीला अर्जांची छाननी होत असून, २ फेब्रुवारीला उमेदवारी अर्ज मागे
घेण्याची अंतिम तारीख आहे. ३ फेब्रुवारीला चिन्हांचे वाटप करण्यात येणार आहे. मतदान १२ फेब्रुवारीला, तर मतमोजणी १३ फेब्रुवारीला होणार आहे. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून एम. एन. माळी हे काम पाहणार आहेत.
भोगावती साखर कारखाना एकेकाळी संपूर्ण देशात आघाडीवर होता. या कारखान्यावर गेली सहा वर्षे
राष्ट्रवादी, शेकाप आणि जनता दल यांची सत्ता होती. सभासद वाढीच्या मुद्द्यावरून कारखान्यावर प्रशासक नियुक्त करण्यात आले. या घटनेमुळे राष्ट्रवादीच्या संचालकांना पायउतार व्हावे लागले. प्रशासक नियुक्तीचा फटका राष्ट्रवादीला बसला. २३ मार्च २0१६ पासून कारखान्यावर प्रशासक मंडळ कार्यरत आहे. प्रशासकांचा सहा महिने कालखंड झाल्याने निवडणूक घ्यावी, अशी मागणी राष्ट्रवादीकडून वारंवार होऊ लागली होती. यावर सहकार प्राधिकरणाने साखर सहसंचालक सचिन रावळ यांना निवडणुकीसाठीची पक्की मतदार यादी आणि इतर बाबींची पूर्तता करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार सर्व बाबी साखर सहसंचालक आणि कारखाना प्रशासक संभाजीराव निकम यांनी पूर्ण केल्या. या सर्व परिस्थितीचा विचार करून सहकार प्राधिकरणाने भोगावती साखर कारखान्याची निवडणूक घेण्यास हरकत नसल्याने साखर सहसंचालक सचिन रावळ यांनी भोगावती साखर कारखाना निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. (वार्ताहर)
२१ जागांसाठी गटवार पद्धतीने निवडणूक
कारखान्याच्या एकवीस जागांसाठी निवडणूक होत आहे. यामध्ये ऊस उत्पादक सभासदांमधून पंधरा उमेदवार, संस्था प्रतिनिधींमधून एक ,अनुसूचित जाती व जमाती सभासदांमधून एक, महिला सभासद दोन, इतर मागासवर्गीय सभासद एक आणि भटक्या विमुक्त जाती सभासदांमधून एक अशा २१ जागांसाठी मतदान प्रक्रिया पार पाडली जाणार आहे. भोगावती कारखाना निवडणूक यावेळी प्रथमच गटवार पद्धतीने होणार आहे. कौलव, राशिवडे, कसबा तारळे, कुरुकली, सडोली खालसा, हासूर दुमाला अशा सहा गटांतून उमेदवार निवडले जाणार आहेत.
राजकीय पक्षांचे नेते नाराज
जिल्हापरिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या कालावधीतच भोगावती कारखान्याची निवडणूक घोषित करण्यात आल्याने सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांचे तोंडचे पाणी पळाले आहे. नेमके कोणत्या निवडणुकीला तोड द्यायचे, अशी विचित्र स्थिती निर्माण झाली असून, सभासदांनी ‘भोगावती’च्या निवडणूक कार्यक्रमाविषयी नाराजी व्यक्त केली आहे. या निवडणूक कार्यक्रमाविषयी कोणी आक्षेप घेतल्यास पुन्हा निवडणूक लांबणीवर पडते की काय, अशीही चर्चा सुरू झाली आहे. भोगावती साखर कारखाना ऊस उत्पादक सभासद संख्या तीस हजार पाचशे एकवीस सभासद आहेत, तर संस्था प्रतिनिधी सभासद चारशे सहासष्ट आहेत. भोगावतीच्या निवडणुकीच्या बिगुलामुळे सर्वांचीच धांदल उडाली आहे.