सन्मानाने आघाडी करा, नाही तर स्वबळावर लढू, ‘शेकाप’च्या जिल्हा बैठकीत निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2019 01:25 PM2019-07-15T13:25:06+5:302019-07-15T13:27:33+5:30

धर्मांध शक्तींना रोखण्यासाठी आघाडी करण्याशिवाय पर्याय नाही; पण काँग्रेस-राष्ट्रवादीने आघाडी करताना सन्मानाने सोबत घ्यावे. दहापैकी पाच विधानसभा मतदारसंघ लढविण्याची आमची तयारी आहे. आम्ही कुणासमोर माना खाली घालणार नाही, प्रसंगी स्वबळावर लढण्याचीही तयारी आहे, असा निर्धार माजी आमदार संपतराव पवार पाटील यांनी केला. याला उपस्थितांनी हात उंचावून पाठिंबा दर्शविला.

 Fight the honor, otherwise you will fight on your own, the decision in the district meeting of Phekap | सन्मानाने आघाडी करा, नाही तर स्वबळावर लढू, ‘शेकाप’च्या जिल्हा बैठकीत निर्णय

 भारतीय शेतकरी कामगार पक्षातर्फे रविवारी दुपारी विधानसभा निवडणूक पूर्वतयारीसाठी जिल्हा कार्यकारिणीचा मेळावा झाला. यात माजी आमदार संपतबापू पाटील यांनी मार्गदर्शन केले. यावेळी डावीकडून अशोकराव पाटील, भारत पाटील, बाबूराव कदम, केरबा जाधव उपस्थित होते.

googlenewsNext
ठळक मुद्दे सन्मानाने आघाडी करा, नाही तर स्वबळावर लढू, ‘शेकाप’च्या जिल्हा बैठकीत निर्णयविधानसभेच्या पाच जागांवर दावा

कोल्हापूर : धर्मांध शक्तींना रोखण्यासाठी आघाडी करण्याशिवाय पर्याय नाही; पण काँग्रेस-राष्ट्रवादीने आघाडी करताना सन्मानाने सोबत घ्यावे. दहापैकी पाच विधानसभा मतदारसंघ लढविण्याची आमची तयारी आहे. आम्ही कुणासमोर माना खाली घालणार नाही, प्रसंगी स्वबळावर लढण्याचीही तयारी आहे, असा निर्धार माजी आमदार संपतराव पवार पाटील यांनी केला. याला उपस्थितांनी हात उंचावून पाठिंबा दर्शविला.

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर टेंबे रोडवरील शेकापच्या कार्यालयात रविवारी दुपारी जिल्हा कार्यकारिणीचा मेळावा झाला. यात काँग्रेसप्रणित आघाडीत सहभागी होण्यासह स्वतंत्र लढण्याबाबतही चाचपणी करण्यात आली. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य बाबासो देवकर, प्राचार्य टी. एस. पाटील, भारत पाटील, अशोकराव पवार-पाटील, बाबूराव कदम, केरबा पाटील, निवास लाड, बाजार समिती संचालक अमित कांबळे यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी पदाधिकाऱ्यांनी मनोगत व्यक्त केले. बाबासो देवकर म्हणाले, शेकाप सर्वसामान्यांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांवर आंदोलने उभारते, ती यशस्वीही करते; पण निवडणुकीच्या मैदानात मात्र यश मिळत नाही, याचे आत्मपरीक्षण करण्याची वेळ आली आहे. निवडणूक जिंकण्याच्याच दृष्टीने रणनीती आखली गेली पाहिजे. भारत पाटील यांनी शेकाप सध्या जिंकण्याच्या नसल्या तरी पाडण्याची भूमिका चांगली निभावू शकतो, याचे प्रत्यंतर यापूर्वीही आलेले आहे. त्यामुळे आघाडीत शेकापला सन्मान मिळावा, अशी भावना व्यक्त केली. केरबा जाधव, कुमार जाधव, सुभाष सावंत यांनी कार्यकर्ते हीच ‘शेकाप’ची ताकद असल्याने त्यांचा सन्मान राखला जावा, अशी अपेक्षा व्यक्त केली. काँग्रेससोबतचा पूर्वानुभव वाईट असल्याने त्याचाही विचार व्हावा, अशी अपेक्षा व्यक्त केली.

करवीरसाठी आग्रह, शाहूवाडी-पन्हाळा लढण्याची तयारी

पारंपरिक मतदारसंघ म्हणून करवीरवर ‘शेकाप’चाच पहिला हक्क आहे. आघाडीच्या जागावाटप बैठकीत करवीरसाठी आग्रह कायम असणार आहे. शाहूवाडी-पन्हाळा मतदारसंघांत काँग्रेस-राष्ट्रवादीने लढण्यास नकार दिला, तर अग्रहक्काने या जागेवर शेकापचाच विचार व्हावा, तसा उमेदवार आमच्याकडे आहे. तो योग्य वेळी बाहेर काढू, असे भारत पाटील यांनी सांगितले.

बापूंकडे निर्णयाचे सर्वाधिकार

दोन्ही काँग्रेससोबत आघाडी करण्यासह जागावाटपासंदर्भात सर्वाधिकार संपतबापू पवार पाटील यांच्याकडे देण्याचा निर्णय मेळाव्यात झाला. ‘शेकाप’ने दावा केलेल्या पाचपैकी किमान दोन तरी जागा पदरात पाडून घ्याव्यात, असेही ठरले. तीन आॅगस्टपर्यंत हा निर्णय होणार असल्याने तत्पूर्वी तालुकानिहाय बैठका घेऊन सक्षम उमेदवारांचा शोध घेण्याचेही ठरले.

‘शेकाप’ने दावा केलेले मतदारसंघ

कोल्हापूर उत्तर, कोल्हापूर दक्षिण, करवीर, राधानगरी-भुदरगड, शाहूवाडी-पन्हाळा.

 

 

Web Title:  Fight the honor, otherwise you will fight on your own, the decision in the district meeting of Phekap

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.