लढ्यातले ‘एन. डी.’--एक रुपयाचेही व्हौचर नाही...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2018 12:26 AM2018-07-15T00:26:54+5:302018-07-15T00:28:19+5:30
विश्वास पाटील
रयत शिक्षण संस्था आणि एन. डी. पाटील हे एक अतूट नाते. संस्थेच्या कार्याशी त्यांचे जीवन एकरूप झाले आहेच; शिवाय त्यांच्या जगण्यावर कर्मवीर अण्णांचेही मोठे संस्कार आहेत. त्यामुळे गेल्या ५० वर्षांत ते सलग १८ वर्षे संस्थेचे अध्यक्ष होते. आजही ते संस्थेचे गव्हर्निंग कौन्सिल मेंबर आहेत; परंतु साधे रुपयाच्या खर्चाचे व्हौचर त्यांच्या नावे तिथे जमा नाही.
जेष्ठ नेते प्रा. एन. डी. पाटील यांच्या जीवनसंघर्षाचा वेध घेतल्यास त्यामध्ये अत्यंत महत्त्वाचे चार लढे प्रकर्षाने ध्यानात येतात. या चारही लढ्यांवर कुण्या संशोधकाने अभ्यास केला तर पीएच. डी.चा प्रबंध लिहून होईल इतके ते मोलाचे व महत्त्वाचे आहेत. त्यामध्ये सीमाप्रश्न, रायगड जिल्ह्यातील रिलायन्स कंपनीविरोधातील ‘सेझ’चा लढा, टोललढा, खासगीकरण झालेला तासगाव कारखाना पुन्हा सहकारी करण्याचा लढा व वीज बिल कमी करण्यासाठी इरिगेशन फेडरेशनच्या माध्यमातून आजही सुरू असलेला लढा.
सीमाप्रश्नाच्या जन्मापासून एन. डी. सर या संघर्षाशी जोडलेले आहेत. हा प्रश्न त्यांच्या एकट्यामुळेच आज जिवंत आहे, असे म्हटले तरी ते वावगे ठरणार नाही. एन. डी. सर यांनी सीमाभाग ही कायमच आपली रणभूमी मानली. त्यांनी स्वत:च्या ढवळी गावावर जेवढे प्रेम केले नसेल, तेवढे प्रेम त्यांनी सीमाभागातील जनतेवर केले, त्यांना स्फूर्ती दिली, लढाईला बळ दिले. पलिते पेटते ठेवले. या वयातही १ नोव्हेंबरचा ‘काळा दिन’ त्यांनी कधी चुकविलेला नाही. आताही २६ जुलैला सीमाप्रश्नावरील तज्ज्ञ समितीची बैठक आहे. आता शरीर थकले आहे; परंतु गप्प घरात बसतील तर ते एन. डी. सर कसले? या प्रश्नासाठी त्यांना तीन वेळा कारागृहात जावे लागले. विजापूरच्या तुरुंगात ते तीन महिने होते. एखादा लढा चिकाटीने किती वर्षे चालविता येतो, याचे सीमाप्रश्नाचा लढा हे जिवंत उदाहरण आहे.
रायगड जिल्ह्यातील ‘सेझ’चा लढा व कोल्हापुरातील टोल लढे हे राज्य व केंद्र शासनाच्या विरोधातील होते. त्यांच्या जोडीला पोलीस यंत्रणा होती व बलाढ्य आर्थिक ताकद असलेल्या कंपन्याही विरोधात होत्या. तरीही नुसत्या ‘एन. डी.’ या दोन अक्षरांतील नैतिक ताकदच त्यांना पुरून उरली. रायगड जिल्ह्यातील २४ हजार शेतकऱ्यांची ३४ हजार एकर जमीन रिलायन्स कंपनीच्या ‘सेझ’साठी सरकारने अधिग्रहित केली होती. त्याविरोधात सामान्य शेतकºयांचे नेतृत्व एन. डी. सरांनी केले. या लढ्यात त्यांना उल्का महाजन, सुरेखा दळवी यांचेही मोठे सहकार्य लाभले. तब्बल साडेचार वर्षे हा संघर्ष सुरू होता. तो या जमिनींना शेतकºयांची नावे त्यांच्या-त्यांच्या सातबारा पत्रकी लागल्यानंतरच संपला. सुपारीएवढा दगडही न फेकता व सरकारी मालमत्तेची एकही काच न फोडता हा लढा त्यांनी यशस्वी करून दाखविला.
कोल्हापूरच्या टोल आंदोलनातही तसेच झाले. या आंदोलनाला एन.डी., दिवंगत गोविंद पानसरे, सदाशिवराव मंडलिक यांच्यासारख्यांचे नेतृत्व लाभले म्हणूनच तो यशस्वी झाला. ज्याला टोलच द्यावा लागत नाही असा सायकलवाला, रिक्षावाला व सामान्य माणसाला बरोबर घेऊन तब्बल साडेपाच वर्षे हा लढा सुरू राहिला. ‘बांधा, वापरा व हस्तांतरित करा’ या केंद्र सरकारच्या धोरणानुसार झालेला हा प्रकल्प रद्द करून राज्य सरकारला त्याची किंमत देण्यास त्यांनी भाग पाडले. सेझ किंवा टोलचा लढा हे केंद्र व राज्य शासनाच्या धोरणांविरोधातील लढे होते.
जे धोरण सामान्य माणसाच्या हिताच्या आड येते, ते मोडून फेकून देण्याची ताकद जनचळवळीत असते, याचाच धडा या दोन लढ्यांनी देशाला दिला आहे. वीज मंडळाविरोधातील वाढीव वीज बिलांचा लढा आजही सुरू आहे. सांगली जिल्ह्यातील तासगाव साखर कारखाना सध्याचे भाजपचे खासदार संजय पाटील यांना अवघ्या १४ कोटी ५० लाख रुपयांस विकण्यात आला होता. त्याचे पुन्हा ‘सहकारीकरण’ करण्यासाठी एन. डी. सरांनी आंदोलन उभारले आणि ते यशस्वीही केले. एन. डी. पाटील यांच्या लढ्याची काही वैशिष्ट्ये आहेत. एकदा लढ्यात उतरले की त्यातून ते कधीच माघार घेत नाहीत. मागून कोण येते की नाही याचाही विचार ते कधी करीत नाहीत. ‘एन. डी.’ या दोनच शब्दांचा महाराष्ट्राच्या सामाजिक जीवनात एवढा दबदबा आहे की, त्यांना लढ्यासाठी वेगळी माणसे गोळा करण्याची कधीच गरज भासली नाही. एकाच प्रश्नावर चिकाटीने तब्बल ५० वर्षे संघर्ष करणे हे कुण्या येरागबाळ्याचे काम नव्हे.
बोले तैसा चाले...
एन. डी. सर विचाराने पक्के मार्क्सवादी. त्यांचा देव, अध्यात्म यांवर अजिबात विश्वास नाही. कोणतेही कर्मकांड त्यांनी आपल्या व्यक्तिगत अगर कौटुंबिक आयुष्यात केले नाही. आपली विचारसरणी आणि आचार यांत अंतर पडणार नाही, याची काळजी त्यांनी हयातभर घेतली.
व्यासंगी नेता : प्रा. पाटील यांच्या कोल्हापुरातील रुईकर कॉलनीतील घरी केव्हाही गेला तर तुम्हाला दोन गोष्टी प्रामुख्याने दिसतात. एक तर सर प्रश्न घेऊन आलेल्या लोकांशी बोलत बसलेले दिसतात किंवा कोणते तरी पुस्तक वाचत बसलेले तरी दिसतात. आज वयाच्या नव्वदीतही त्यांच्या डोळ्याला चष्मा लागलेला नाही. जास्त वेळ बसता येत नाही; परंतु प्रकृती बरी नाही म्हणून अंगावर चादर ओढून झोपून टाकणे हे त्यांच्या तत्त्वात बसत नाही. ते दुपारी कधीच झोपत नाहीत. वेळ मिळेल तेव्हा वेगवेगळे ग्रंथ आणून वाचत बसलेले दिसतात. एखाद्या प्रश्नावर ते जेव्हा आंदोलन करतात, तेव्हा त्यासंबंधीची इत्थंभूत माहिती त्यांच्याकडे असते. आवश्यक मजकूर हायलाईटरने गडद करून ठेवणे, महत्त्वाची कात्रणे एकत्रित करून स्वत: त्यांचे फोल्डर करून ठेवणे हे त्यांच्या आवडीचे काम आहे. त्यांच्याकडील अशी कात्रणे एकत्रित केली तरी अनेक प्रश्नांचे उत्तम डॉक्युमेंटेशन होईल.
मुक्काम पोस्ट एस. टी. : एन. डी. सर यांचे जीवन म्हणजे साधी राहणी व उच्च विचारसरणी याचा वस्तुपाठच जणू! त्यांची हयात माजी आमदार म्हणून मिळत असलेल्या पेन्शनवर गेली. पुरस्कार म्हणून जी रक्कम मिळाली, तिला त्यांनी कधीच हात लावला नाही. ती त्यांनी रयत संस्थेला देऊन टाकली. त्यांच्या आयुष्यातील मोठा कालखंड हा एस. टी. महामंडळाच्या गाडीतून प्रवास करण्यात गेला. त्यामुळे त्यांची मुले त्यांना गमतीने म्हणायची की, बाबांना पत्र पाठवायचे असल्यास ‘मुक्काम पोस्ट एस. टी.’ एवढे लिहून पाठविले तरी पुरे!
बोले तैसा चाले...
एन. डी. सर विचाराने पक्के मार्क्सवादी. त्यांचा देव, अध्यात्म यांवर अजिबात विश्वास नाही. कोणतेही कर्मकांड त्यांनी आपल्या व्यक्तिगत अगर कौटुंबिक आयुष्यात केले नाही. आपली विचारसरणी आणि आचार यांत अंतर पडणार नाही, याची काळजी त्यांनी हयातभर घेतली.
सरोज ऊर्फ माई आणि एन. डी. सर यांच्या जीवनप्रवासाला ५८ वर्षे झाली. माई सांगतात, ‘आमचे लग्न १७ मे १९६० रोजी झाले; पण आम्ही एवढ्या आयुष्यात कधी चार-दोन चित्रपटही एकत्र पाहिलेले नाहीत. आजारपण वगळता आजपर्यंत एकही रविवार त्यांनी घरी घालविलेला नाही. आयुष्यभर ते मूल्यांना चिकटून राहिले आहेत. ढोंग, लबाडी, स्वार्थीपणा यांच्यापलीकडे त्यांचे आयुष्य. अत्यंत साधी राहणी ही त्यांची जीवननिष्ठा; त्यामुळे पिठले-भाकरी व मटनही ते सारख्याच आनंदाने खातात. त्यांच्यामुळे माझ्याही आयुष्याला वेगळी उंची लाभली, याचा नक्कीच आनंद आहे.’
संसार समाजाचा : प्रा. एन. डी. पाटील यांच्या वाटचालीत त्यांच्या पत्नी सरोज ऊर्फ माई यांचाही वाटा मोलाचा आहे. एन. डी. सर समाजासाठी झगडत राहिले व मार्इंनी संसाराची सारी धुरा स्वत:च्या खांद्यावर सक्षमपणे पेलली. त्यांनी कधीच त्यांना संसाराच्या विवंचना दिल्या नाहीत. स्वत: माई व त्यांच्या दोन्ही मुलांनीही कधीही एन. डी. सरांच्या प्रतिमेला धक्का लागेल असा व्यवहार केला नाही. मार्इंनी कुटुंबाचा संसार नीट चालविला; त्यामुळे एन. डी. सरांना समाजाच्या संसाराकडे लक्ष देता आले.
तीन घटना
एन. डी. सरांसारखा धिप्पाड माणूस व्यक्तिगत जीवनात कधी गदगदून जातो, असे विचारल्यावर सरोज पाटील यांनी सांगितले की, ‘आमच्या दोघांच्या जीवनात आलेल्या तीन घटनांनी ते गदगदून गेले. त्यांतील इस्लामपूरचा गोळीबार, त्यांच्या पायाला आलेले अधूपण आणि नातू सागर याचा अकाली मृत्यू. हयातभर एन. डी. सरांना स्वत:चे कपडे स्वत: धुण्याची सवय होती. असेच मराठवाड्याच्या दौºयावर असताना त्यांनी कपडे धुऊन वाळत घातले व परत बाथरूममध्ये आल्यावर साबणाचे पाणी पडलेले असल्याने त्यांचा पाय घसरला व ते पडले. त्यातून मणक्याला मार बसला व पायाची शस्त्रक्रिया झाली. त्यातून त्यांच्या एका पायाला जन्मभराचे अधूपण आले. आता आपल्याला कार्यकर्त्यांना भेटता येणार नाही, याचे त्यांना दु:ख होई. नातू सागर याच्यावर त्यांचे अत्यंत जिवापाड प्रेम होते; परंतु त्याचे अकाली निधन झाल्यावर दु:खावेगाने हा पहाडासारखा माणूसही गदगदून गेला.’
(संदर्भ : अंधश्रद्धा निर्मूलन समिती वार्तापत्र, जुलै २०१८ चा अंक)