सडण्यापेक्षा रस्त्यावर लढून जगा
By admin | Published: October 10, 2016 12:48 AM2016-10-10T00:48:44+5:302016-10-10T00:48:44+5:30
बी. जी. कोळसे-पाटील : मारुतराव निकम यांचा गौरव
कोल्हापूर : लोकशाही असतानाही मूकपणे घरात सडत राहून मरण्यापेक्षा न्याय्य-हक्क मिळविण्यासाठी रस्त्यावर लढून जगा, असे आवाहन माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे-पाटील यांनी रविवारी येथे केले.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे (भाकप) ज्येष्ठ नेते मारुतराव निकम यांच्या गौरव समारंभात ते बोलत होते. राजर्षी शाहू स्मारक भवन येथे निकम गौरव समितीतर्फे आयोजित या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी महासंघाचे सरचिटणीस नामदेवराव चव्हाण होते.
यावेळी राजकीय विश्लेषक डॉ. अशोक चौसाळकर, माजी आमदार संपतराव पवार-पाटील, ‘गोकुळ’ दूध संघाचे अध्यक्ष विश्वास पाटील, कुंभी-कासारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष किशोर पाटील, अर्बन बँकेचे अध्यक्ष नामदेवराव कांबळे, राजाराम साखर कारखान्याचे मानद संचालक पी. जी. मेढे प्रमुख उपस्थित होते.
निकम यांनी वयाची ८० वर्षे पूर्ण केल्यानिमित्त त्यांचा सपत्निक सत्कार माजी न्यायमूर्ती कोळसे-पाटील यांच्या हस्ते मानपत्र देऊन करण्यात आला. निकम यांच्या आत्मचरित्राचे प्रकाशन यावेळी करण्यात आले.
अध्यक्षीय भाषणात चव्हाण यांनी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या पेन्शनाबाबत संघटना करत असलेल्या प्रयत्नांचा आढावा घेतला. यावेळी माजी न्यायमूर्ती कोळसे-पाटील यांच्यासह डॉ. अशोक चौसाळकर यांचे भाषण झाले. मारुतराव निकम म्हणाले, सर्वसामान्य कामगारांना स्वाभिमानाने जगणे शिकविल्याचे समाधान आहे. ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे भक्कम संघटन केले. त्यातून किमान वेतन मिळविले. पेन्शनचा प्रश्न सुटेपर्यंत लढा दिला जाईल. निकम यांच्या पत्नी मनीषा यांचा सत्कार मीना चव्हाण यांनी केला, तर शब्दांकन करणाऱ्या अनिल चव्हाण, प्रियांका कांबळे यांचाही सत्कार झाला. सुशील लाड यांनी मानपत्र वाचन केले. कार्यक्रमास दत्ता मोरे, बी. एल. बरगे, सम्राट मोरे, वाय. एन. पाटील, शिवाजी पाटील, आनंद सोहनी, सुभाष लाड, रवी कांबळे, उपस्थित होते. नामदेवराव गावडे यांनी स्वागत केले. सतीशचंद्र कांबळे यांनी सूत्रसंचालन केले. बबन पाटील यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)