कोल्हापुरातील भेंडवडेत दोन गटांत मारामारी, शस्त्राचा वापर; राजाराम कारखान्याच्या माजी अध्यक्षांना मारहाण
By ऑनलाइन लोकमत | Published: January 6, 2024 12:04 PM2024-01-06T12:04:21+5:302024-01-06T12:19:44+5:30
पेठवडगाव : भेंडवडे (ता. हातकणंगले) येथे पूर्ववैमनस्यातून दोन गटात मारहाण झाली. यामध्ये काठी आणि शस्त्राचा वापर करण्यात आला. मोपेड ...
पेठवडगाव : भेंडवडे (ता. हातकणंगले) येथे पूर्ववैमनस्यातून दोन गटात मारहाण झाली. यामध्ये काठी आणि शस्त्राचा वापर करण्यात आला. मोपेड पेटविण्यात आली असून मोटरसायकलची तोडफोड करण्यात आली. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत फिर्यादी नोंद झाल्या नव्हत्या. याबाबत भेंडवडे गावात तणावपूर्ण शांतता आहे.
या वादाला ग्रामपंचायत निवडणुकीची पार्श्वभूमीवर आहे. प्रामुख्याने राजाराम साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष सर्जेराव माने व अमोल निकम, बालाजी निकम यांच्यात वर्चस्ववादातून अंतर्गत धुसफूस होत होती.
दरम्यान, गुरुवारी रात्री जाब विचारण्यावरून मारहाण झाल्याची फिर्याद पोलिसांत नोंद झाली होती. याप्रकरणी माने गटाच्या सहा जणांवर गुन्हा नोंद करण्यात आली होती. दरम्यान, या घटनेचे पडसाद आज, शुक्रवारी सकाळी उमटले दोन्ही गट आमनेसामने आल्याने दोन्ही गटांत वाद झाला.
शुक्रवारी झालेल्या मारहाणीत निकम गटाच्या बालाजी निकम व संतोष निकम यांना मारहाण केली आहे. तसेच माने गटाचे प्रमुख व राजाराम साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष सर्जेराव माने यांना मारहाण झाल्याचे समजते. त्यांच्यासह अन्य काही जणांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असल्याचे समजते.
या मारहाणीत काठ्या व शस्त्रांचा वापर झाला, तसेच मोपेड पेटविली असून दुसऱ्या गाडीवर दगड टाकून मोडतोड केली आहे. गावात मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. जयसिंगपूर विभागाच्या उपविभागीय पोलिस अधिकारी रोहिणी साळुंखे यांनी घटनास्थळी भेट देत शांतता राखण्याचे आवाहन केले आहे. याबाबत रात्री उशिरापर्यंत पोलिसात गुन्हा नोंद झाली नव्हती. मात्र रात्री उशिरापर्यंत नोंद घेण्याचे काम सुरू होते. तपास पोलिस निरीक्षक भैरव तळेकर करत आहेत.