उमेदवारी मिळवण्यासाठी काँग्रेसमध्येच लढत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2021 04:21 AM2021-04-06T04:21:44+5:302021-04-06T04:21:44+5:30
प्रभाग क्रमांक २२, विक्रमनगर, विद्यमान नगरसेवक : शोभा कवाळे, आताचे आरक्षण : नागरिकांचा मागास प्रवर्ग कदमवाडी : काँग्रेसचा ...
प्रभाग क्रमांक २२, विक्रमनगर, विद्यमान नगरसेवक : शोभा कवाळे, आताचे आरक्षण : नागरिकांचा मागास प्रवर्ग
कदमवाडी : काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या प्रभाग क्रमांक २२, विक्रमनगर या प्रभागात यंदा महापालिका निवडणुकीत काँग्रेसची उमेदवारी मिळवण्यासाठी रस्सीखेच सुरू आहे. अनेक इच्छुकांनी पक्षाकडे तिकीट मागितले असल्याने उमेदवारी कोणाला द्यायची, असा पेच नेत्यांसमोर उभा ठाकण्याची शक्यता आहे. विक्रमनगर प्रभाग यंदा नागरिकांचा मागास प्रवर्ग या वर्गासाठी आरक्षित झाला आहे. यामुळे अनेक इच्छुकांनी या मतदरसंघात केलेली निवडणूकपूर्व पेरणी वाया गेली आहे. गत निवडणुकीत अनुसूचित जाती महिला या वर्गासाठी आरक्षित असलेल्या या प्रभागात काँग्रेसच्या शोभा कवाळे यांनी बाजी मारली हाेती. त्यांनी भाजप-ताराराणी आघाडीच्या उमेदवाराचा पराभव केला होता. मात्र, विरोधकांनीही चांगली मते घेतल्याने या प्रभागात यंदाही भाजप- ताराराणी आघाडीकडून जोर लावला जाण्याची शक्यता आहे. विक्रमनगर प्रभागात कष्टकरी- कामगार वर्गाची संख्या मोठी आहे. गेले अनेक वर्षे या प्रभागावर काँग्रेसने हुकूमत गाजविल्याने काँग्रेसकडून उमेदवारी मिळवण्यासाठी अनेक जण धडपडत आहेत. सचिन शेंडे, इम्तियाज नायकवडी, विजय गोसावी, विनायक लोखंडे हे इच्छुक काँग्रेसकडून उमेदवारीसाठी चाचपणी करत आहेत. प्रभाग क्रमांक ६४ चे विद्यमान नगरसेवक प्रवीण केसरकर यांचाही या प्रभागात संपर्क असल्याने त्यांनी या प्रभागातून उमेदवारी करावी, अशीही मागणी होऊ लागली आहे. राष्ट्रवादीकडून झहिदा मुजावर, भाजप- ताराराणी आघाडीकडून रशीद बारगीर, शिवसेनेकडून राजेंद्र पाटील, आनंद धुमाळ हे महापालिकेत जाण्यासाठी इच्छुक आहेत.
सोडवलेले नागरी प्रश्न :
ऑक्सिजन पार्क,
रेल्वे रुळ, लोखंडी ब्रीज, रस्ते काँक्रिटीकरण,
प्रभागात अनेक ठिकाणी पाण्याच्या टाक्या,
प्रभागात मंडळासाठी सभागृह उभारणी, संपूर्ण प्रभागात एलईडी.
रखडलेले प्रश्न
: काही ठिकाणी अंतर्गत रस्त्यांचा प्रश्न प्रलंबित असल्याने नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. शासन स्तरावर प्राॅपर्टी कार्ड मिळवून देण्यात आलेली नाहीत.
कोट : गेल्या पाच वर्षांत प्रभागात पालकमंत्र्यांच्या माध्यमातून अनेक विकासकामे करता आली. प्रभागात नागरिकांकडून मिळालेल्या सहकार्यामुळे कामे पूर्ण करू शकले.
-शोभा कवाळे, ग रसेविका
गत निवडणुकीतील प्रमुख उमेदवार.:
शोभा कवाळे १२९५ काँग्रेस (विजयी),
पल्लवी जाधव -९१२, भाजप ताराराणी,
वर्षाराणी लांडगे -१९६, राष्ट्रवादी, चंद्रिका सागर- ६३४ शिवसेना
फोटो : प्रभाग क्रमांक २२
ओळ. विक्रमनगर प्रभागात ६ हजारांहून अधिक झाडे लावून ऑक्सिजन पार्क उभारण्यात आला आहे.
(छाया - दीपक जाधव)