जिल्हा परिषदेत आत सोडण्यासाठी प्रवेशद्वारावर हुज्जत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2021 04:23 AM2021-04-17T04:23:28+5:302021-04-17T04:23:28+5:30
कोल्हापूर : जिल्हा परिषदेत येणास नागरिकांना बंदी घालण्यात आली असली तरी, आत सोडण्यासाठी ...
कोल्हापूर : जिल्हा परिषदेत येणास नागरिकांना बंदी घालण्यात आली असली तरी, आत सोडण्यासाठी प्रवेशद्वारावर सुरक्षा रक्षकांसोबत हुज्जत घालण्याचे प्रकार शुक्रवारीही सुरू होते. अनेक जिल्हा परिषद सदस्यांनीही, अमुक यांना आत सोडा, म्हणून अधिकाऱ्यांना फोन करून भंडावून सोडले.
कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या निर्देशानुसार जिल्हा परिषदेत नागरिकांना येण्यावर बंदी घालण्यात आली आहे. शक्यतो फोनच्या माध्यमातून आवश्यक कामे करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. आत जाण्यासाठीची अन्य सर्व प्रवेशद्वारे बंद करून एकच प्रवेशद्वार सुरू ठेवण्यात आले आहे. आत गेल्यानंतरही नाव लिहून घेऊन, काम विचारून आत सोडले जाते. मुख्य कार्यकारी अधिकारी अजयकुमार माने आणि सामान्य प्रशासन विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा देसाई यांनी आजही प्रवेशद्वारावर आढावा घेतला.
मात्र अनेकजण, लांबून आलोय, आत सोडा, दोन मिनिटांचे काम आहे असे सांगून सुरक्षारक्षकांंशी वाद घालताना दिसत होते. तसेच अनेक जिल्हा परिषद सदस्यांनीही अधिकाऱ्यांना फोन करून, अहो, माझा माणूस बाहेर तासभर थांबलाय, त्याला आत सोडा, अशी विनंती करण्यासाठी अधिकाऱ्यांना फोन लावण्याचा सपाटा सुरू ठेवला होता.