मराठा आरक्षणाचा लढा संभाजीराजेंच्या नेतृत्वाखालीच, राजेंच्या केसाला धक्का लागला तर महाराष्ट्र पेटेल
By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2022 11:58 AM2022-02-22T11:58:52+5:302022-02-22T11:59:26+5:30
कोल्हापुरातील दसरा चौकात शनिवारपासून साखळी उपोषण
कोल्हापूर : समाजातील गटातटांमुळे मराठ्यांचे मोठे नुकसान झाले असून आता सगळे बाजूला ठेवूया, मराठा आरक्षणासाठी खासदार संभाजीराजे यांच्या नेतृत्वाखाली लढ्यासाठी सज्ज राहूया, असा निर्धार बैठकीत करण्यात आला. संभाजीराजे शनिवारपासून आझाद मैदानात उपोषणास बसणार असून ज्यांना मुंबईला जाणे शक्य नाही, त्यांनी दसरा चौकात साखळी उपोषणास सहभागी व्हावे, असा निर्णयही घेण्यात आला.
खासदार संभाजीराजे मराठा आरक्षणासह इतर मागण्यांसाठी उपोषणास बसणार आहेत, त्यांना पाठिंबा देण्यासाठी सोमवारी शाहू स्मारक भवनात बैठक आयाेजित करण्यात आली होती. उपस्थितांनी हात वर करून संभाजीराजेंच्या आंदोलनाला पाठिंबा दिला.
मराठा महासंघाचे नेते वसंतराव मुळीक म्हणाले, संभाजीराजे हे मराठा आरक्षणापासून बाजूला गेलेले नाहीत, आरक्षणाचा मुद्दा न्यायालयीन आहे. त्यासाठी पाठपुरावा करत असतानाच इतर मागण्यांना रेटण्याची गरज आहे. त्यासाठी संभाजीराजेंची भूमिका योग्य आहे. मराठा आरक्षणाचा लढा संभाजीराजे यांच्या नेतृत्वाखालीच लढला जाईल.
फत्तेसिंह सावंत म्हणाले, केंद्र सरकारने मराठा आरक्षणामध्ये योग्य भूमिका घेतली नाही, सर्वच राजकीय पक्ष एकाच माळ्याचे मणी आहेत. संभाजीराजे हेच आमचे नेते आहेत. माजी उपमहापौर दिगंबर फराकटे म्हणाले, मराठा समाजाचा आता संयम संपला आहे. शनिवारी जिल्ह्यात चक्काजाम आंदोलन करूया.
गणी आजरेकर म्हणाले, मराठा आरक्षणाला आमचा नेहमीच पाठिंबा राहिला आहे. धरणे आंदोलन करून सरकारला तीव्रता दाखवूया, दसरा चौकातील आंदोलनाची जबाबदारी आपण पेलू.
अनिल घाटगे म्हणाले, मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारने आश्वासने पाळली नाहीत. कमिटी कशाला हवी, आता संपूर्ण समाज पेटून उठेल. यावेळी संजय पोवार, लाला गायकवाड, राजू सावंत, रूपेश पाटील, जयकुमार शिंदे, कमलाकर जगदाळे, रणजीत आयरेकर, किशोर घाटगे, दिलीप सावंत, किसन भोसले, फिरोज उस्ताद, सचिन वरपे, सुनील सामंत, माणिक मंडलीक आदींनी मनोगत व्यक्त केले.
इंद्रजीत सावंत, बाळ घाटगे, बाबा महाडीक, राजू जाधव, विष्णू जोशीलकर, उमेश रावळ आदी उपस्थित होते.
राजेंच्या केसाला धक्का लागला तर महाराष्ट्र पेटेल
मराठा समाजासाठी संभाजीराजेंनी जीव पणाला लावला आहे. त्यांच्या केसाला धक्का जरी लागला तर महाराष्ट्र पेटून उठेल, असा इशारा प्रसाद जाधव यांनी दिला.