पुरुषांच्या बरोबरीने लढणं म्हणजे स्त्रीवाद
By admin | Published: March 3, 2017 12:42 AM2017-03-03T00:42:31+5:302017-03-03T00:42:31+5:30
प्रतिभा रानडे : शाहू स्मारक भवन येथे सुनीता नरके स्मृृतिदिन कार्यक्रम; ‘नाते स्त्री संस्कृतीचे’ या विषयावर विवेचन
कोल्हापूर : जगात हिंदू संस्कृती हा एकमेव धर्म आहे जेथे मातृदेवतेला आजही महत्त्व आहे. दुसरीकडे त्यांच्यावर अन्याय होतो. नव्या राजकीय संस्कृतीत महिलांना स्थान नाही. आजही बालविवाह होतात, स्त्री भ्रूणहत्या होतात, बलात्कारासारख्या वेदनादायी घटना घडतात, पण मानवमुक्तीसाठी लढणारे लोकचळवळीतून पुढे येत आहेत हे चित्र आशादायक आहे. कारण मात्र पुरुषांच्याविरोधात लढणे म्हणजे स्त्री मुक्ती नाही तर पुरुषांच्या बरोबरीने लढणं म्हणजे स्त्रीवाद, अशी व्याख्या ज्येष्ठ लेखिका प्रतिभा रानडे यांनी मांडली.
शाहू स्मारक भवनात गुरुवारी अरुण नरके फौंडेशनच्यावतीने कै. सुनीता नरके स्मृतिदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात त्यांनी ‘नाते स्त्री संस्कृतीचे’ या विषयावर अभ्यासपूर्ण विवेचन केले.
यावेळी संस्थापक अरुण नरके, अध्यक्ष बाळ पाटणकर, विश्वस्त अजय नरके, दिलीप नरके, खजिनदार रवींद्र ओबेरॉय आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी स्पर्धा परीक्षांमध्ये यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
प्रतिभा रानडे म्हणाल्या, जगातल्या सगळ्या धर्मांनी, पुरुष मानसिकतेने स्त्रियांवर अन्यायच केला आहे. शेतीतून जास्त उत्पन्न मिळू लागल्यावर माझी संपत्ती माझ्याच पुढच्या पिढीला मिळावी म्हणून विवाह संस्था सुरू झाली. वेदकाळात स्त्रिया ज्ञानी होत्या, राज्यकारभार चालवायच्या त्यांचे बालविवाह होत नव्हते, विधवांनासुद्धा यज्ञाचा अधिकार होता, नवरा शोधण्याचा हक्क होता. काळ आणि राजवटी बदलत गेल्या आणि पुरुष प्रधानतेने महिलांच्या जगण्यावर बंधने आली. गौतम बुद्धांनी संस्कृत भाषेत बंदिस्त झालेले ज्ञान आणि साहित्य प्राकृत व पाली भाषेत लिहायला सुरुवात केली ही साहित्यातील सर्वांत मोठी क्रांती होती.
त्या म्हणाल्या, इस्लामिक आक्रमणांच्या काळात स्त्रियांना पळवून नेऊ जाऊ लागले तेव्हा महिलांना लपवून ठेवायला सुरुवात झाली. इस्लामिक महिलांच्या अंगावर बुरखा आणि हिंदू महिलांच्या डोक्यावर पदर आला. बालविवाह सुरू झाले, स्त्रियांची कुचंबणा होऊ लागली.
इंग्रजांच्या राजवटीत मात्र त्यांनी मांडलेले मानवतावादी विचार भारतातील समाजसुधारकांनी आत्मसात केले. आगरकर, महात्मा फुले, रानडे, यांनी महिलांवरील जाचक रूढी-परंपरांना विरोध केला. त्याचीच परिणिती म्हणून महिलांनी रस्त्यावर येऊन स्वातंत्र्य चळवळीत मोलाचे योगदान दिले. रवींद्र ओबेरॉय यांनी प्रास्ताविक केले. महेश हिरेमठ यांनी गायलेल्या पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली. (प्रतिनिधी)
कला-साहित्य स्त्रियांमुळे जिवंत
रानडे म्हणाल्या, महिलांनी आपले भावविश्व आणि जगण्यातली कुचंबणा मिथक कथा, जात्यावरच्या ओवी, अभंग, थेरीगाथांमधून मांडल्या आहेत. संत मुक्ताबाई, बहिणाबाई, वेणाबाई, जनाबाईसारख्या असंख्य महिलांनी स्वत:ची वाट निवडली. दुसरीकडे वास्तु-शिल्प कलांची भरभराट झाली. रांगोळीपासून हस्तकलेपर्यंत अफगाणिस्तान, पाकिस्तानपासून अजिंठा-वेरूळच्या लेण्यांपर्यंतच्या सर्व कलाप्रकारांमध्ये पूर्वीच्या काळातील स्त्रियांचे विश्व अधोरेखित होते. ...म्हणून स्त्रिया आत्महत्या करीत नाही
भारताचा डोलारा शेतीवर आधारलेला असताना शेतकरी सर्वांत जास्त आत्महत्या करतात; पण त्याची पत्नी कधीच आत्महत्या करीत नाही. कारण ती मनाने अधिक कणखर होते. तिला आपल्या कुटुंबाचे, मुलांचे संगोपन करायचे असेल. कितीही वाईट परिस्थिती आली तर त्यावर मात करण्याची धमक स्त्रियांमध्ये असते, अशा शब्दांत रानडे यांनी स्त्रियांमधील आंतरिक शक्ती विशद केली.