मिल्क फेडरेशनच्या काळात बिले मिळताना मारामार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2021 04:26 AM2021-04-23T04:26:36+5:302021-04-23T04:26:36+5:30
विश्र्वास पाटील-लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : करवीर तालुका मिल्क फेडरेशन जे दूध गोळा करीत असे, त्यांच्याकडे प्रक्रिया करण्याची सोय ...
विश्र्वास पाटील-लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : करवीर तालुका मिल्क फेडरेशन जे दूध गोळा करीत असे, त्यांच्याकडे प्रक्रिया करण्याची सोय नसल्याने सरकारी डेअरीला घातले जाई. त्या काळात सरकारी डेअरीकडून शेतकऱ्यांना तीन-तीन महिने बिलेच मिळायची नाहीत. एका चांगल्या संस्थेमार्फत शेतकऱ्यांना जगण्यासाठी एक साधन निर्माण झाले होते; परंतु ते मोडकळीस येईल की काय, अशी स्थिती सुरुवातीच्या टप्प्यातच निर्माण झाली होती. तेथून जी संघाची वाटचाल सुरू झाली ती एकेक टप्पे पार करीत आजच्या शिखरापर्यंत आली आहे. त्यावेळी अन्य जिल्ह्यांत तालुका संघ झाले; परंतु कोल्हापुरात मात्र तालुका संघांची स्थापना होऊ दिली नाही. त्यामुळेही ‘गोकुळ’ भक्कम झाला, हे नोंद घेण्यासारखे आहे.
महाराष्ट्रात आणि देशातही लाखो शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या; परंतु हे संकट कोल्हापूर जिल्ह्याने थोपवले त्याचे सारे श्रेय ‘गोकुळ’चे आहे. हाच अनुभव जिल्ह्याला १९७२-७३ च्या दुष्काळातही आला होता. त्यामुळे ‘गोकुळ’ हा नुसता सहकारी संघ नाही, तर ती इथल्या लाखो शेतकऱ्यांच्या जीवनमरणाशी जोडलेली रक्तवाहिनी आहे. तिच्या जिवावर राजकारण करणाऱ्या सर्वांनीच याचे भान सतत ठेवले पाहिजे. ‘गोकुळ’च्या विकासामध्ये राष्ट्रीय दुग्ध विकास मंडळाचेही (एनडीडीबी) पाठबळ फारच मोलाचे राहिले आहे. वर्गीस कुरियन यांनी १९७७-७८ च्या सुमारास संघाला ३२ कोटी रुपयांचे कर्ज कमी व्याजाने उपलब्ध करून दिले. त्यातून पहिली दूध महापूर योजना सुरू झाली. संघाचे हजारांत संकलन होणारे दूध लाखांचे आकडे ओलांडून पुढे गेले. दूध महापूर दोनमध्येही एवढीच रक्कम या संस्थेने दिली. त्यामुळेच डेअरी प्रकल्प, पशुखाद्य, पावडर प्रकल्प असे टप्पे यशस्वी झाले.
असे होते पहिले संचालक मंडळ
दूध व्यवसायाचा कोल्हापूर जिल्ह्याला लाभ व्हावा यासाठी करवीर तालुका मिल्क फेडरेशनचे रूपांतर कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघात झाल्यावर आनंदराव पाटील-चुयेकर यांच्या नेतृत्वाखाली अनेकजण या चळवळीशी प्रामाणिक राहून काम करीत होते. त्याकाळी संचालक मंडळात उपाध्यक्ष म्हणून रामचंद्र परशराम दरेकर (रा. वाघापूर), गणपती पाटील (टोप), अमृतराव पाटील, सदाशिव आमते (कोथळी), शामराव पाटील, रामू पाटील, राजाराम पाटील, दत्तात्रय यशवंत पाटील, बंडा पाटील, सुरेंद्र चौगुले व हरी गायकवाड यांचा समावेश होता. एस. वाय. पाटील-कणेरीकर हे कार्यकारी संचालक असले तरी त्यांचेही योगदान मोलाचे राहिले. चुयेकर यांना संघात आणण्यातही व पहिले अध्यक्ष करण्यातही त्यांचाच पुढाकार होता. सध्याची गोकुळ शिरगाव औद्योगिक वसाहतीतील जागा संघासाठी मिळावी यासाठीही त्यांनी प्रयत्न केले होते. त्या काळी वाघापूरचे तुकाराम रामचंद्र कुरडे हेदेखील चुयेकरांच्या खांद्याला खांदा लावून सक्रिय होते.
बोंद्रे दादा यांचे पाठबळ
‘गोकुळ’ची उभारणी ज्या काळात झाली, त्यावेळी दिवंगत नेते श्रीपतराव बोंद्रे यांचे जिल्ह्याच्या राजकारणावर प्रचंड वर्चस्व होते. करवीर तालुका मिल्क फेडरेशनची उभारणी करण्यातही त्यांचेच पाठबळ होते. चुयेकर यांना या फेडरेशनवर बोंद्रेदादांनीच संधी दिली. सध्याचा गोकुळ शिरगावमधील डेअरी प्रकल्प आहे, त्याचे भूमिपूजन दिवंगत बोंद्रे यांच्या हस्ते झाले आहे.
दुधाचा महापूर योजना
राष्ट्रीय दुग्ध विकास मंडळाचे (एनडीडीबी) तांत्रिक साहाय्य झाल्याने गोकुळचा या व्यवसायातील पाया भक्कम झाला. या मंडळाचे पहिले पथक १९७८ ला कोल्हापूरला आले. त्यामध्ये व्ही. जी. पाटील, सध्याचे कार्यकारी संचालक डी. एस. घाणेकर, व्ही. पी. गांधी व श्रीवास्तव यांचा सहभाग होता. त्याकाळी संघाच्या ३४ पर्यवेक्षकांची टीम ‘अमूल’मध्ये प्रशिक्षणासाठी गेली होती.
२२०४२०२१-कोल-गोकुळ भूमिपूजन
कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाचा सध्याच्या गोकुळ शिरगाव (ता. करवीर) येथील डेअरी प्रकल्पाचे भूमिपूजन दिवंगत नेते श्रीपतराव बोंद्रे यांच्या हस्ते झाले होते. तत्कालीन अध्यक्ष आनंदराव पाटील-चुयेकर त्यावेळी उपस्थित होते.