पेठवडगावात निकालानंतर मारामारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2015 01:34 AM2015-04-24T01:34:43+5:302015-04-24T01:34:43+5:30
शहरात तणाव : पोटनिवडणुकीत विजयादेवी यादव विजयी
पेठवडगाव : पालिका पोटनिवडणुकीच्या निकालानंतर यादव आघाडीचे कार्यकर्ते व विरोधी दोन्ही गटांतील कार्यकर्त्यांमध्ये शिवीगाळ झाली. त्यानंतर विरोधी गटाच्या अज्ञात कार्यकर्त्यांनी यादव गटाच्या चारजणांना, तर यादव गटाच्या कार्यकर्त्यांनी विरोधी गटातील एकास मारहाण केली. या घटनेमुळे शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. त्यामुळे काहीवेळ व्यवहार ठप्प झाले. मात्र, पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने पुढील अनर्थ टळला.
शहरातील तणावाच्या पार्श्वभूमीवर जादा पोलीस कुमक मागवली असून, संवेदनशील ठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात केला. शहरास पोलीस छावणीचे स्वरूप आले आहे. दरम्यान, या घटनेची नोंद पाच वाजेपर्यंत पोलिसांत झाली नव्हती.
विजयानंतर यादव गटाचे कार्यकर्ते यादववाडा येथे जल्लोष करीत होते. त्यानंतर नगराध्यक्षा विद्या पोळ, माजी पोलीस आयुक्त गुलाबराव पोळ हे कार्यकर्त्यांसह मतदारांचे आभार मानत बी. वाय. शाळेकडे येत होते. पालिका चौकात बॅरेकेटस लावल्यामुळे सर्वजण एस. टी. स्टँडमार्गे जात असताना येथे विरोधी गटाचे कार्यकर्ते थांबले होते. त्यांची व यादव गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये शाब्दिक शिवीगाळ झाले. त्यानंतर यादव गटाचे कार्यकर्ते वारणा बझारजवळ आले असता, तोंडाला रुमाल बांधलेल्या अज्ञात विरोधी गटाच्या काही कार्यकर्त्यांनी लाकडी बॅटने यादव गटाच्या ‘त्या’ कार्यकर्त्यास मारहाण केली.
अज्ञात हल्लेखोरांनी येथून पलायन केले. मात्र, एक कार्यकर्ता तावडीत सापडला. त्यास यादव गटाच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केली. पोलिसांनी हस्तक्षेप करत त्याची सुटका केली.
दरम्यान, या घटनेनंतर यादव गटाचे तीन कार्यकर्ते एस. टी. स्टँडजवळ आले असता पुन्हा विरोधी गटाच्या कार्यकर्त्यांनी त्यांना मारहाण केली. व्यापाऱ्यांनी काहीवेळ दुकाने बंद ठेवली. पोलिसांनी दोन्ही गटांच्या कार्यकर्त्यांना शांततेचे आवाहन केले.
दरम्यान, पोलिसांच्या जलद कृती, दंगल नियंत्रण पथक यांच्यासह पोलिसांच्या तैनातीने परिस्थिती नियंत्रणात आली. (प्रतिनिधी)