विनायक राऊतांवर गुन्हा दाखल करा, ई स्टोअर फसवणूक प्रकरणी गुंतवणूकदार एकवटले
By ऑनलाइन लोकमत | Published: May 8, 2023 01:27 PM2023-05-08T13:27:43+5:302023-05-08T13:29:03+5:30
स्वयंघोषित उद्योगपती विनायक राऊत यांनी ई स्टोअर कंपनीच्या माध्यमातून कोट्यवधी रुपये जमा केले.
गारगोटी: ई स्टोअर कंपनीच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करुन सर्व गुंतवणूकदारांचे पैसे परत मिळावेत अन्यथा पोलिस ठाण्याच्या हद्दीत लाक्षणिक उपोषण करणार, असा इशारा गुंतवणूकदारांनी निवेदनाद्वारे दिला आहे. या निवेदनावर दिगंबर कालेकर यांच्यासह शेकडो गुंतवणूकदार आणि नेटवर्कर यांच्या सह्या आहेत. रविवारी सकाळी मौनी विद्यापीठाच्या फुले सदन येथे ही एल्गार सभा झाली.
निवेदनात म्हटले आहे की, स्वयंघोषित उद्योगपती विनायक राऊत यांनी ई स्टोअर कंपनीच्या माध्यमातून कोट्यवधी रुपये जमा केले. ही कंपनी २०१९ साली सुरू झाली. या कंपनीचे कोणतेही कार्यालय नाही की थांगपत्ता नाही. या कंपनीकडून चांगला परतावा मिळतो आणि गुंतविलेल्या रक्कमेला मी जबाबदार आहे अशी खात्री दिली. अनेकांनी लाखो रुपयांची कर्जे काढून मॉलसाठी पैसे भरले. अनेकांना फसवून कोल्हापूर जिल्ह्यातून सुमारे शंभर कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम राऊत याने जमा केली आहे.
ही रक्कम कंपनीकडे पाठवली की आपल्याकडेच ठेवली याची ठोस माहिती आम्हाला नाही. परंतु ही रक्कम त्यांच्याकडेच असल्याचा आमचा संशय आहे. आमच्या एका टीमची सुमारे ३७ कोटी २२ लाख रुपयांची फसवणूक झाली आहे. फसवणुकीच्या प्रकारात त्याचा भाऊ अनिल कृष्णा राऊत, पत्नी पद्मावती विनायक राऊत हे देखील सामील आहेत.
याबाबत आम्ही पोलिसात तक्रार दाखल करण्यासाठी गेल्यानंतर त्यांनी ती दाखल करून घेण्याऐवजी वेगवेगळी कारणे सांगून बाहेरचा रस्ता दाखवला आहे. त्यामुळे या ठगांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल न केल्यास पोलिस ठाण्याच्या हद्दीत आम्ही सर्व गुंतवणूकदार लाक्षणिक उपोषण करणार आहोत.
या निवेदनावर दिगंबर कालेकर, विनायक भोसले, अनिल पाटील, राजेंद्र गोडसे, सज्जन पवार, प्रकाश कुंभार, डॉ.अभिजित पाटील, संदीप चौगले यांच्यासह शेकडो गुंतवणूकदार आणि नेटवर्कर यांच्या सह्या आहेत.