संजय गायकवाड यांच्यावर ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2021 04:17 AM2021-07-15T04:17:11+5:302021-07-15T04:17:11+5:30
कोल्हापूर : ॲट्रॉसिटी कायद्याबद्दल वादग्रस्त विधान करणारे बुलडाण्याचे आमदार संजय गायकवाड यांच्यावर निलंबनाची कारवाई करावी व ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल ...
कोल्हापूर : ॲट्रॉसिटी कायद्याबद्दल वादग्रस्त विधान करणारे बुलडाण्याचे आमदार संजय गायकवाड यांच्यावर निलंबनाची कारवाई करावी व ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल व्हावा, अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया(आ) ने बुधवारी केली. जिल्हा नेते सतीश माळगे यांच्या शिष्टमंडळाने जिल्हा प्रशासनाला याबाबतचे निवेदन दिले.
बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील चितोडा अंबिकापूर गावातील वाघ व हिवराळे कुटुंबांमध्ये वाद होऊन हाणामारी, घराची व वाहनांची तोडफाेड करण्यात आली. या प्रकरणानंतर संजय गायकवाड यांनी समर्थकांसह वाघ कुटुंबाची भेट घेतली व नंतर गावकऱ्यांशी बोलताना ॲट्रॉसिटी कायद्याबाबत वादग्रस्त विधान केले. तसेच जाती-जातींमध्ये तेढ निर्माण करण्याचे वक्तव्य केले. हे चिथावणीखोर वक्तव्य लोकशाहीला घातक असून त्यांना निलंबित करण्यात यावे व ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करावा. या वेळी उपाध्यक्ष दीपक भोसले, कुंडलिक कांबळे, प्रदीप ढाले, अमित शिंदे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
-------