फसवणूक करणाऱ्या ऊसतोड मुकादमांवर गुन्हा दाखल करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2021 04:32 AM2021-02-27T04:32:23+5:302021-02-27T04:32:23+5:30
कोल्हापूर : ऊसतोडणीसाठी मजुरांचा पुरवठा करतो, असे सांगून वाहतूकदारांची विदर्भ, मराठवाड्यातील मुकादमांकडून दरवर्षी लाखो रुपयांची फसवणूक केली जाते. अशी ...
कोल्हापूर : ऊसतोडणीसाठी मजुरांचा पुरवठा करतो, असे सांगून वाहतूकदारांची विदर्भ, मराठवाड्यातील मुकादमांकडून दरवर्षी लाखो रुपयांची फसवणूक केली जाते. अशी फसवणूक करणाऱ्या मुकादमांवर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी आमदार ऋतुराज पाटील यांच्या नेतृत्वाखालील ऊस वाहतूकदारांच्या शिष्टमंडळाने पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांच्याकडे केली.
पैसे घेऊनही ऊसतोडणीसाठी कामगार हे मुकादम पुरवत नाहीत. लाखो रुपये आगावू वाहतूकदारांकडून हे मुकादम उचलतात. त्यामुळे ग्रामीण भागातील ऊस वाहतूकदार आर्थिकदृष्ट्या अडचणीत आले आहेत. कोल्हापूर जिल्ह्/ातील ट्रक व ट्रॅक्टरमालक हे सुशिक्षत बेरोजगार तरुण असून, ऊस वाहतूक ठेका घेतात. त्यासाठी त्यांना विदर्भ व मराठवाडा या भागातील ऊसतोडणी मजुरांची गरज असते. ऊस वाहतूकदार शेतकरी व साखर कारखान्यांना मदत करणाऱ्याच्या हेतुने स्वत:च्या जोखमीवर ऊसतोडणी अगोदरच कामगारांसाठी लाखो रुपयांची उचल दरवर्षी देतात. मात्र, अलीकडे हे मुकादम ऊस वाहतूकदारांची फसवणूक करीत आहेत. अशा तक्रारी वाढू लागल्या आहेत. याबाबत शुक्रवारी सकाळी आमदार ऋतुराज पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांची भेट घेतली. यावेळी झालेल्या चर्चेत अशा मुकादमांवर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी शिष्टमंडळातर्फे आमदार पाटील यांनी केली.
शुक्रवारी सकाळी आमदार ऋतुराज पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांची भेट घेतली. फसवणूक करणाऱ्या मुकादमांवर गुन्हे दाखल करावेत, या मागणीचे निवेदन देण्यात आले. बलकवडे यांनी, फसवणूक केलेल्या मुकादम यांच्याविरोधात वाहतूकदारांनी तक्रारी द्याव्यात. पोलीस प्रशासन संबंधितांवर गुन्हे दाखल करून घेईल, अशी ग्वाही दिली. यावेळी एस. वाय. किल्लेदार, मारुती पाटील, अविनाश पाटील, दिगंबर पाटील, अनिल माने, युवराज पाटील, अमित पाटील, बाबासोा गोते, नितीन सूर्यवंशी उपस्थित होते.
फोटो : २६०२२०२१-कोल-ऋतुराज पाटील
ओळी : फसवणूक करणार्या ऊसतोड मुकादमांवर गुन्हे दाखल करावेत. या मागणीसाठी आमदार ऋतुराज पाटील यांच्या नेतृत्वाखाली ऊस वाहतूकदारांनी पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांची शुक्रवारी भेट घेतली.