राखेप्रश्नी वसंतदादा साखर कारखान्यावर फौजदारी दाखल करा
By admin | Published: December 23, 2016 11:33 PM2016-12-23T23:33:30+5:302016-12-23T23:33:30+5:30
अमित शिंदे : कारवाई न केल्यास प्रदूषण नियंत्रण मंडळ बरखास्तीची मागणी शासनाकडे करणार
सांगली : वसंतदादा साखर कारखान्याने राख नियंत्रण यंत्रणा बसवूनही, ती कार्यान्वित न करता बाहेर राख सोडली जात आहे. त्यामुळे आरोग्याचा प्रश्न गंभीर निर्माण झाला असल्यामुळे कारखान्याच्या अध्यक्षांसह संचालक मंडळावर सात दिवसात फौजदारी कारवाई करावी, अशी मागणी सांगली जिल्हा सुधार समितीचे अध्यक्ष अॅड्. अमित शिंदे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत केली.
कारवाई न केल्यास प्रदूषण नियंत्रण मंडळच बरखास्त करण्याची शासनाकडे मागणी करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
ते म्हणाले की, वसंतदादा कारखान्याच्या राखेमुळे होणाऱ्या प्रदूषणामुळे झाडांचे नुकसान झाले आहे. नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्नही गंभीर बनला आहे. याप्रश्नी जिल्हा सुधार समितीने मागील गळीत हंगामावेळी आंदोलन केले होते. आंदोलनानंतर कारखान्याने राख नियंत्रणाची यंत्रणा उभारली. परंतु, कारखाना ही यंत्रणा वापरत नसल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे पुन्हा कारखान्याच्या राखेचा त्रास परिसरातील नागरिकांना होत आहे. या प्रदूषणामुळे संजयनगर, चिंतामणीनगर, घन:शामनगर, शिवोदयनगर, शांतिनिकेतन परिसरातील झाडांंच्या वाढीवरही परिणाम झाला आहे. नागरिकांच्या डोळ्यात राख जात असल्यामुळे अपघात होत आहेत.
या प्रश्नावर जिल्हा सुधार समितीच्या माध्यमातून आंदोलन केल्यानंतर प्रदूषण नियंत्रण मंडळाला जाग आली. त्यांनी लगेच राख नियंत्रण यंत्रणा कार्यान्वित करण्याची सूचना वसंतदादा कारखाना प्रशासनाला दिली होती. कारखाना प्रशासनानेही राख नियंत्रण यंत्रणा कार्यान्वित केल्याचे जाहीर केले होते. परंतु, ही त्यांची घोषणा फसवी असल्याचे चौकशीत स्पष्ट झाले आहे. कारखाना रात्री मोठ्याप्रमाणात राख सोडत असल्याची तक्रार नागरिकांनी केली. त्यानुसार कारखाना परिसरातील काही उपनगरांना भेट दिली.
यावेळी कारखाना रात्रीची राख सोडत असल्याचे दिसून आले आहे. झाडांवर, घरांच्या परिसरातही राखेचा थर साचला आहे. कारखान्याचे अध्यक्ष विशाल पाटील आणि त्यांचे संचालक मंडळ प्रदूषण नियंत्रण मंडळाची फसवणूक करीत असल्यामुळे त्यांच्यावर सात दिवसात फौजदारी कारवाई करावी. या कालावधित कारवाई न झाल्यास प्रदूषण नियंत्रण मंडळ बरखास्त करावे, अशी आम्ही शासनाकडे मागणी करणार आहोत. यासाठी तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही शिंदे यांनी दिला.
यावेळी प्रा. आर. बी. शिंदे, हर्षवर्धन आलासे, अॅड. राजाराम यमगर, जयंत जाधव, सतीश भंडारे, शंकर माने आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
दादांच्या विचारांचे आम्ही वारसदार
वसंतदादांच्या नावाचा कारखाना जिल्हा सुधार समिती बंद पाडत असल्याचा भावनिक अपप्रचार केला जात आहे. पण, आम्ही वसंतदादांच्या विचारांचे खरे वारसदार आहोत. दादा नेहमीच जनतेचा त्रास कमी करण्यासाठी लढले. दादांचे तेच काम आम्ही पुढे चालवत आहोत, असे अॅड्. शिंदे म्हणाले. तसेच वसंतदादांच्या वारसांनी एकही संस्था व्यवस्थित चालविली नाही. दादांच्या नावाची ही एकमेव संस्था वसंतदादा कारखाना चालू आहे. तो तरी त्यांच्या वारसांनी व्यवस्थित चालवावा, असे आवाहनही त्यांनी केले.