‘कोल्हापूर ब्रँड’खाली कर्नाटकी गूळ विकणाऱ्यांवर थेट गुन्हे दाखल करा, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2022 12:21 PM2022-11-26T12:21:35+5:302022-11-26T12:22:26+5:30
शेतकऱ्याला गुळाच्या गुणवत्तेनुसारच पैसे मिळतील
कोल्हापूर : कर्नाटकातील गूळ येथे आणून तो ‘कोल्हापूर ब्रँड’खाली विकणाऱ्यांवर थेट फसवणुकीचे गुन्हे दाखल करा. त्यासाठी भरारी पथकाची नियुक्ती करण्याचे आदेश जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीला दिले. गुळाची गुणवत्ता तपासणारी यंत्रणा तातडीने उभा करा, म्हणजे प्रत्येक शेतकऱ्याला गुळाच्या गुणवत्तेनुसारच पैसे मिळतील. कर्नाटकातील गुळाला आत प्रवेशच द्यायचा नाही, असेही त्यांनी सांगितले.
गुळाला किमान प्रति क्विंटल ३७०० रुपये भाव मिळाला पाहिजे, यासाठी मंगळवारपासून शेतकऱ्यांनी सौदेच काढू दिलेले नाहीत. गेली चार दिवस हा पेच निर्माण झाला होता, या पार्श्वभूमीवर शुक्रवारी जिल्हाधिकारी रेखावार यांनी शेतकरी व समिती प्रशासनाशी चर्चा केली. कर्नाटकातील समितीत येणारी आवक थांबवली तर गुळाच्या दरात वाढ होईल, यावर शेतकरी ठाम होते.
व्यापाऱ्यांची बिले तपासली तरी गेल्या दोन महिन्यांत कर्नाटकातील गूळ येथे किती आला, हे उघड होईल. असे शेतकऱ्यांनी सांगितले. ही बाब गंभीर असून, बाहेरील गूळ कोल्हापुरी म्हणून कोणी विकत असेल तर त्यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करा. त्याचबरोबर सोमवार (दि. २८) पासून भरारी पथकासह प्रवेशद्वारावरूनच बाहेरील गुळाला प्रवेश देऊ नका, अशी सूचना त्यांनी समिती प्रशासनाला दिली. यावेळी समितीचे प्रशासक मंडळाचे अध्यक्ष प्रकाश जगताप, सचिव जयवंत पाटील, उपसचिव के. बी. पाटील व शेतकरी उपस्थित होते.
प्रयोगशाळेवरही मर्यादा....
गुळाची गुणवत्ता निश्चित करण्यासाठी समितीने प्रयोगशाळा तयार करावी, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सुचवले. याबाबत त्यांनी गूळ संशोधन केंद्रातील अधिकाऱ्यांशी चर्चा केली. प्रयोगशाळा तयार केली तर त्याचा अहवाल तातडीने मिळत नसल्याने जागेवर दर निश्चित होणार नाही.
व्यापाऱ्यांच्या ‘जीभेवर’च विश्वास
व्यापारी गुळाच्या रव्यावर चाकू मारून तो जीभेवर ठेवतात, मग दर जाहीर करतात. या पारंपरिक पद्धतीवर जिल्हाधिकाऱ्यांनी विचारले असता आमचा व्यापाऱ्यांवर विश्वास असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.
जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली शेतकऱ्यांची फिरकी
कर्नाटकातून सध्या व्यापारीच गूळ आणत आहेत. मात्र, पुढे शेतकऱ्यांनीच गूळ आणून तो येथे विकू लागले तर तुम्ही रोखणार कसे? अशी फिरकी जिल्हाधिकारी रेखावार यांनी शेतकऱ्यांची घेतली.
भरारी पथकाची सूत्रे सूर्यवंशींच्या हाती द्या
समितीचे उपसचिव राहुल सूर्यवंशी हे आक्रमक असून, त्यांनी यापूर्वी अशा प्रकारांना चाप लावला होता. भरारी पथकाची सूत्रे त्यांच्यात हातात द्या, अशी मागणी शेतकऱ्यांनीच जिल्हाधिकाऱ्यांकडे केली.