इडियट, गेट आऊट... यांच्यावर एफआरआय दाखल करा -: सीईओंचा रुद्रावतार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2019 01:42 AM2019-07-30T01:42:09+5:302019-07-30T01:44:38+5:30
इडियट..., गेट आऊट... यांच्यावर एफआयआर दाखल करा, असे म्हणणाऱ्या मित्तल यांच्यासमोर पालकांसमवेत आलेले जिल्हा परिषद सदस्यही हतबल झाले. दुपारी चारच्या दरम्यान मित्तल यांच्या दालनासमोरच हा प्रकार घडला.
कोल्हापूर : शाळेत शिक्षक नाहीत. त्यामुळे लवकर शिक्षक द्या, या मागणीसाठी विद्यार्थ्यांसह आलेल्या पालकांना पाहून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांनी सोमवारी दुपारी रुद्रावतार धारण केला. इडियट..., गेट आऊट... यांच्यावर एफआयआर दाखल करा, असे म्हणणाऱ्या मित्तल यांच्यासमोर पालकांसमवेत आलेले जिल्हा परिषद सदस्यही हतबल झाले. दुपारी चारच्या दरम्यान मित्तल यांच्या दालनासमोरच हा प्रकार घडला.
शाहूवाडी तालुक्यातील गेळवडे येथील ग्रामपंचायत सदस्य, पालक शिक्षकांच्या मागणीसाठी कासारी खोरा शिक्षण बचाव समितीच्या माध्यमातून दुपारी तीननंतर जिल्हा परिषदेत आले. या शाळेत चारही वर्गांचे ५0 विद्यार्थी असून, चार शिक्षकांची पदे मंजूर असताना एकही शिक्षक हजर नसल्याने पालक आणि कार्यकर्ते जिल्हा परिषदेत घेऊन आले होते. येताना त्यांनी युनिफॉर्मवरील विद्यार्थ्यंानाही बरोबर आणले होते. यावेळी मित्तल हे विभागप्रमुखांची बैठक घेत होते. त्यांना दालनासमोर आंदोलन सुरू असल्याचे समजले.
ते तातडीने खाली आले. त्यांना पाहताच ‘आमच्या मागण्या मान्य करा, नाही तर खुर्च्या खाली करा’ अशा घोषणा सुरू झाल्या. यावेळी संतापलेल्या मित्तल यांनी यातील एका ग्रामस्थाकडे तुमची मुले या शाळेत आहेत का, अशी विचारणा केली. तेव्हा त्याने नाही म्हणून सांगितले. ‘मग इथे का आलात, राजकारण करता का’ असे विचारत मित्तल यांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. मित्तल यांनी त्यांचाच पंचनामा केला. पंचायत समितीचे सदस्य दिलीप पाटील यावेळी अशोक पाटील, संदीप धनवडे, बाजीराव गुरव, आनंदा लाड आदी उपस्थित होते.
३ आॅगस्टनंतर तुम्हाला शिक्षक देतो
या खडाजंगीनंतर मित्तल यांच्या दालनामध्ये सदस्य बसले. यावेळी मित्तल म्हणाले, एकीकडे उच्च न्यायालयाच्या आदेशाचा अवमान केल्यामुळे मला नोटीस दिली आहे तरीही मी दिलेले शिक्षक माघारी बोलावले नाहीत. ३१ जुलैला विभागीय आयुक्तांकडे शिक्षकांची सुनावणी आहे. त्यामध्ये जो निर्णय होईल त्यानुसार ३ आॅगस्टनंतर तुम्हाला मी शिक्षक देतो. वाटल्यास मी शाहूवाडीत येतो. हे आधी सांगूनही आंदोलन का केले? हा त्यांचा प्रश्न होता.
एफआयआर दाखल करण्यामुळे प्रश्न सुटणार नाही, असे हंबीरराव पाटील सांगत होते. त्यावेळी मी तुम्हाला लास्ट वॉर्निंग देतो. तुमची विभागीय आयुक्तांकडे तक्रार करेन, असा इशारा मित्तल यांनी दिला. ग्रामपंचायत सदस्याला तुमचे सदस्यत्व आजपासून रद्द, असेही मित्तल सुनावले.
अमन मित्तल यांचे वागणे अतिशय चुकीचे होते. त्यांचा काय गैरसमज झाला आहे, हे माहीत नाही. मात्र, सर्वसामान्य पालक त्यांच्या मुलांचे शिक्षकांअभावी नुकसान होऊ नये म्हणून शिक्षक मागणीसाठी आले असताना त्यांच्याशी जबाबदार पदावरील अधिकाºयाने असे वागणे शोभत नाही.
- हंबीरराव पाटील, जिल्हा परिषद सदस्य, शाहूवाडी.