भाजपची जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2021 06:46 PM2021-07-05T18:46:09+5:302021-07-05T18:47:10+5:30
Bjp Kolhapur : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण होऊनही नोकरी न मिळाल्यानं स्वप्निल लोणकर या तरुणाने गळफास घेत आत्महत्या केली. या घटनेचा निषेध करत सोमवारी भारतीय जनात पक्षाच्यावतीने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली.
कोल्हापूर : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण होऊनही नोकरी न मिळाल्यानं स्वप्निल लोणकर या तरुणाने गळफास घेत आत्महत्या केली. या घटनेचा निषेध करत सोमवारी भारतीय जनात पक्षाच्यावतीने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली.
यावेळी मंत्र्यांचा सुरू आहे मनमानी कारभार राज्यातील सुशिक्षीत विद्यार्थी मात्र बेरोजगार, एमपीएससीला राजकीय कट्टा बनवू नका, या मागणीचे फलक घेऊन कार्यकर्ते उपस्थित होते. याप्रकरणी आयोगावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, मृताच्या कुटुंबीयांना ५० लाख नुकसान भरपाई द्यावी तसेच आयोगाची कार्यपद्धती बदलावी, अशी मागणी करण्यात आली.
याबाबत निवासी उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे यांना निवेदन देण्यात आले. मोठा अधिकारी होण्याचे स्वप्न बाळगून ग्रामीण भागातील अनेक तरुण-तरुणी लोकसेवा आयोगाच्या परीक्षेसाठी अहोरात्र मेहनत घेतात. ग्रामीण भागातील सुविधांअभावी मोठ्या शहरामध्ये जाऊन या परीक्षांची तयारी करावी लागते, त्यासाठी क्लास, राहणे, जेवण, पुस्तकांचा खर्च मोठा असतो. त्यासाठी कर्ज काढावे लागते. पण गेल्या दोन वर्षांपासून महाविकास आघाडी सरकारकडून कोरोनाचे कारण देत राजकीय अनास्थेपोटी चालढकल करण्याचे काम सुरू आहे.
आयोगाने अनेक परीक्षांचे निकाल जाहीर केले नाहीत तर अनेक परीक्षा प्रलंबित आहेत. यामुळे राज्यातील लाखो विद्यार्थ्यांची कुचंबना होत आहे. गेल्या तीन वर्षांपासून आयोगामध्ये फक्त दोनच सदस्य असून इतर सदस्यांची नियुक्ती प्रलंबित आहे.
महाविकास आघाडीचे सरकार अशा गंभीर विषयांत संवेदनशील नसल्याचे दिसत आहे, अशी टीका निवेदनात करण्यात आली आहे. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष राहुल चिक्कोडे, प्रदेश कार्यकारिणी सदस्य महेश जाधव, संघटन सरचिटणीस अशोक देसाई, विजय जाधव, हेमंत आराध्ये, दिलीप म्हेत्राणी, विजय खाडे, विद्या बनसोडे, सीमा बारामते यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.