किमान वेतनासाठी दावे दाखल करणार
By admin | Published: August 11, 2015 01:07 AM2015-08-11T01:07:54+5:302015-08-11T01:07:54+5:30
ए. बी. पाटील : 'सायझिंग' कामगारांचा एकविसाव्या दिवशीही संप
इचलकरंजी : शहरातील सायझिंग कारखान्यांकडून किमान वेतनाच्या फरकाची रक्कम कामगारांना मिळावी, यासाठी सलग चार दिवस सहायक कामगार आयुक्तांकडे क्लेम अॅप्लिकेशनचे दावे दाखल करण्यात येतील. हे दावे गतीने निकालात काढून कामगारांना त्यांच्या हक्काच्या वेतनाची रक्कम मिळवून द्यावी, अशी मागणी कामगार नेते ए. बी. पाटील यांनी केली.
यंत्रमाग उद्योगातील कामगारांसाठी शासनाने जाहीर केलेल्या सुधारित किमान वेतनाची अंमलबजावणी ताबडतोब करावी, या मागणीसाठी सायझिंग-वार्पिंग कामगारांचा सोमवारी एकविसाव्या दिवशीही संप चालूच राहिला. येथील राजाराम स्टेडियममध्ये असलेल्या सहायक कामगार आयुक्त कार्यालयावर आयोजित मोर्चावेळी पाटील बोलत होते. सहायक कामगार आयुक्त अनिल गुरव यांना कामगार संघटनेचे एक शिष्टमंडळ भेटले.
यावेळी कामगारांच्या प्रतिनिधींचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर सहायक कामगार आयुक्त गुरव म्हणाले, कामगारांकडून क्लेम अॅप्लिकेशन दाखल केल्यानंतर संबंधित कारखानदारांना समन्स बजावली जाईल. दोन्ही बाजूंची सुनावणी झाली की, मग त्यावर निकाल दिले जातील.
त्यानंतर ए. बी.पाटील यांनी शहर व परिसरातील १३० सायझिंग कारखान्यांवर तीन-चार दिवसांत टप्प्याटप्प्याने क्लेम अॅप्लिकेशन दाखल होतील. ज्यामुळे किमान वेतनाच्या अंमलबजावणीचा विश्वास कामगारांमध्ये निर्माण होईल, असे सांगितले. यावेळी कामगार संघटनेचे आनंदराव चव्हाण, सुभाष निकम, कृष्णात कुलकर्णी, आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
दहा सायझिंगवर क्लेम अॅप्लिकेशन
थोरात चौकातून निघालेला कामगारांचा मोर्चा आवळे मैदान, जनता चौक मार्गे राजाराम स्टेडियममध्ये आला. तेथे कामगारांना क्लेम अॅप्लिकेशनचे नमुने वाटप करून कारखानानिहाय अर्ज एकत्रित केले. त्यातील जय महादबा (कोरोची), बालाजी सायझर्स दोन युनिट (गणेशनगर), लोटस पार्क तीन युनिट (कोरोची), जैनको (पार्वती इस्टेट), जठार टेक्स्टाईल (गणेशनगर), महालक्ष्मी (जयश्री) सायझर्स, गणेश (राजराजेश्वरीनगर) या दहा कारखान्यांवर क्लेम अॅप्लिकेशन सादर केल्याचे कामगार संघटनेने सांगितले.