फिनो पेमेंट बँक प्रशासनावर फसवणूकीचे गुन्हे दाखल करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2019 05:15 PM2019-02-08T17:15:45+5:302019-02-08T17:17:40+5:30
कोल्हापूर : बँक मित्र या योजनेच्या माध्यमातून फिनो पेमेंट बँकेने शासनाची फसवणूक केली आहे. या बँकेच्या प्रशासनासह त्यांना मदत ...
कोल्हापूर: बँक मित्र या योजनेच्या माध्यमातून फिनो पेमेंट बँकेने शासनाची फसवणूक केली आहे. या बँकेच्या प्रशासनासह त्यांना मदत करणाऱ्या युनियन बँकेच्या अधिकाऱ्यांची आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागातंर्गत चौकशी करावी या मागणीसाठी शुक्रवारी बँक मित्रांनी लक्ष्मीपुरीतील युनियन बँकेंच्या कार्यालयासमोर जोरदार निदर्शने केली.
ज्या ठिकाणी एटीएम किंंवा बँकाची व्यवस्था नाही अशा ठिकाणी बँकाचे खाते उघडणे, पैसे काढणे, भरणे, कर्ज, विमा अशाबद्दल नागरीकांना मदत करण्यासाठी प्रधानमंत्री जनधन योजनेंतर्गत बँक मित्र नियुक्त करण्यात आले आहेत. तथापि युनियन बँक आॅफ इंडीयााठी काम करत असलेल्या फिनो पेमेंट बँक या खासगी कंपनीकडून बँक मित्रांच्या नावावरच बोगस व्यवहार सुरु आहेत.
खोट्या कामाच्या आधारावर लाखो रुपये कंपनी कमावत आहे. या विरोधात आवाज उठवलेल्या बँक मित्रांना कंपनीकडून काढले टाकले जात आहे. या कंपनीवर कारवाई करावी आणि बँक अधिकाऱ्यांची चौकशी व्हावी या मागणीसाठी शुक्रवारी भारतीय कम्यूनिस्ट पक्षाच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या बँक मित्र अन्याय निवारण कृती समितीने रस्त्यावर उतरत आंदोलन केले.
आंदोलनात अनिल चव्हाण, सतीश नांगरे, रमेश सहस्त्रबुध्दे, जयंत पाटील, वैशाली पाटील, राजेंद्र कांबळे, भिमराव कदम, प्रशांत आंबी,हरिश कांबळे, आरती रेडेकर, बी.एल.बरगे, शुभम शिरहट्टी,अनिता शिंदे,संजय कांबळे, नेहा कोठारे, इर्षाद पठाण, दाउद ताजेखान, आनंद सातपुते, शुभांगी पाटील, दिलदार मुजावर यांनी सहभाग घेतला.
मागण्या
- फिनो पेमेंट बँक प्रशासन व युनियन बँक अधिकाऱ्यांची चौकशी करा
- लेखी सुचना न देता बँक मित्रांना काढून टाकल्याची चौकशी व्हावी
- २२५0 रुपयांचा पगार ठरला असताना ११५0 रुपये कपात करुन नुकसान केल्याबद्दल परतावा द्यावा
- फिनो कंपनीशी करार रद्द करुन बँक मित्र युनियन बँकेमार्फतच नेमावेत