पर्ल्स कंपनीच्या ठेवीदारांची गाळण
By admin | Published: November 6, 2014 12:32 AM2014-11-06T00:32:10+5:302014-11-06T00:39:09+5:30
कार्यालयात धाव : कर्मचारी आणि ठेवीदारांमध्ये जुंपली
कोल्हापूर : सहा वर्षांत दुप्पट पैसे देण्याचे आमिष दाखवीत गुंतवणूकदारांची करोडो रुपयांची फसवणूक करणाऱ्या पर्ल्स कंपनीच्या स्टेशन रोड येथील कार्यालयात गुंतवणूकदार व ठेवीदारांनी आज, बुधवारी धाव घेतली़ एका वृत्तवाहिनीने दिलेल्या बातमीनंतर पर्ल्समधील आपले पैसे बुडणार, या भीतीने अनेक गुंतवणूकदारांनी आज सुटीच्या दिवशीही थेट कार्यालय गाठले़ पैसे परत दिल्याशिवाय जाणार नाही, असा पवित्रा गुंतवणूकदारांनी घेतल्यामुळे एजंट, सेवा केंद्राचे कर्मचारी आणि गुंतवणूकदार यांच्यात चांगलीच जुंपली़; पण कार्यालयास सुटी असल्याचे सांगून याबाबत उद्या, गुरुवारी सविस्तर माहिती देण्याचे आश्वासन प्रसारमाध्यमे आणि गुंतवणूकदारांना दिल्यानंतर वातावरण निवळले़
पर्ल्सने कलेक्टिव्ह इन्व्हेस्टमेंट योजनेंतर्गत गुंतवणूकदारांना सहा वर्षांत दुप्पट पैसे देण्याचे आमिष दाखवून देशभरातून सुमारे पाच कोटी गुंतवणूकदारांकडून पैसे घेतले होते़ जिल्ह्यातील हजारो गुंतवणूकदारांनी दामदुप्पट गुंतवणूक योजनेत पैसे गुंतविले आहेत़ मुदतीचा कालावधी संपल्यानंतर तीन महिने उलटूनही पैसे न मिळाल्यामुळे गुंतवणूकदार चिंताग्रस्त होते़ त्यातच वृत्तवाहिनीने दिलेल्या बातमीनंतर गुंतवणूकदारांनी पर्ल्सच्या ग्राहक सेवा केंद्रात गर्दी केली़ बेळगाव, पन्हाळा, शाहूवाडी, हातकणंगले तालुक्यांतील गुंतवणूकदारांचा यात समावेश आहे़ यातील काहीजणांच्या गुंतवणुकीची मुदत पूर्ण व्हायला अद्याप अवघे काही महिने राहिले आहेत, तर काही जणांच्या गुंतवणुकीची मुदत संपून सहा महिने झाले तरी त्यांना अद्याप पैसे मिळालेले नाहीत़
केवळ एजंटाच्या आमिषाला बळी पडलो
केवळ एजंटाच्या बोलबच्चनगिरीला आणि जास्त व्याजदराला भाळून आम्ही पर्ल्समध्ये पैसे गुंतवले; पण आता पश्चात्ताप करायची वेळ झाली आहे़ आम्ही आपला पैसा जमिनीमध्ये गुंतवतो़ गुंतवणुकीची मुदत संपल्यानंतर कंपनी तुम्हाला भूखंड देणार आहे. गुंतवणुकीसाठी आम्हाला प्रवृत्त करणारे एजंटही आता ‘नॉट रिचेबल’ आहेत, अशी माहिती नरसगोंडा खोत, आशिष शहा, लक्ष्मी कांबळे या गुंतवणूकदारांनी दिली़
गुंतवणूकदारांच्या पैशांतून जमिनी खरेदीचा सपाटा
पर्ल्स अॅग्रोटेक कॉर्पोरेशन लिमिटेड या नावाने ही कंपनी गुंतवणूकदारांकडून पैसे गोळा करते़ गुंतवणुकीतून मिळालेल्या पैशांतून जमीन खरेदी करण्याचा सपाटाच या कंपनीने लावला आहे़ कंपनीविरोधात सीबीआयने सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार फेब्रुवारी, २०१४ मध्ये ४५ हजार कोटींच्या फ सवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे़ कंपनी रजिस्ट्रारमधील माहितीनुसार गुंतवणूकदारांकडून घेतलेल्या पैशातून पर्ल्सने देशभरात जमिनी १़८५ लाख हेक्टर जमीन खरेदी केली आहे़ गुंतवणूकदारांचा हा पैसा कंपनीने पंजाबमधील मोहाली, भटिंडा तसेच अन्य शहरांतील प्रकल्पांमध्ये तसेच जमीनखरेदीसाठी गुंतविला आहे़