राधानगरी पंचायत समितीमध्ये उपसभापतिपदासाठी ‘फिल्ंिडग’
By admin | Published: March 13, 2017 11:33 PM2017-03-13T23:33:58+5:302017-03-13T23:33:58+5:30
निवडीबाबत उत्सुकता : राष्ट्रवादीकडे सभापतिपदाचा एकमेव सदस्य
राधानगरी : दहा सदस्यसंख्या असलेल्या राधानगरी पंचायत समितीच्या सभागृहात सर्वाधिक पाच सदस्य निवडल्याने राष्ट्रवादी काँग्रेस मोठा पक्ष ठरला असला तरी स्पष्ट बहुमत नसल्याने पुढील वाटचाल कशी राहणार याबाबत उत्सुकता आहे. अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या सभापतिपदाचा एकमेव सदस्य या पक्षाकडेच असल्याने ही निवड बिनविरोध होणार आहे. मात्र उपसभापतिपदासाठी समझोता की चिठ्ठी याकडे लक्ष लागून राहिले आहे. विरोधात कॉंग्रसचे चार व शिवसेनेचा एक असे बलाबल आहे. गेल्या साडेसात वर्षांत येथे दोन्ही काँग्रेसमध्ये समझोता एक्स्प्रेस धावत आहे.
दहा वषार्पूर्वी झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसने बहुमताने सत्ता हस्तगत करत कॉंग्रेसला बाजूला ठेवले होते.
मात्र २००९ च्या विधानसभेच्या निवडणुकीच्या बेरजेच्या राजकारणामुळे कॉंग्रेसच्या गजानन बिल्ले यांना उपसभापतिपद देवून सत्तेत सामावून घेतले होते. २०१२ मध्ये पुन्हा हे दोन्ही पक्ष विरोधात लढले. त्यावेळी मित्रपक्षासह दोघांना प्रत्येकी पाच अशा समान जागा मिळाल्या. त्यामुळे एकत्र येण्याशिवाय पर्याय न राहिल्याने येथून पुन्हा समझोता एक्स्प्रेस धावली.
गेल्या पाच वर्षांत चार पक्षांनी सत्तेचा उपभोग घेतला. या काळात अन्यत्र राजकीय वादविवाद झाले तरीही येथील सत्तेवर त्याचा काही परिणाम झाला नाही त्यामुळे दहापैकी सहाजणांना सभापती व चारजणांना उपसभापती म्हणून संधी मिळाली. (प्रतिनिधी)
काँग्रेस-राष्ट्रवादीत कितीही टोकाचा वाद असला तरी जिल्हा परिषदेत त्यांची आघाडी होणार असल्याने येथेही हे दोन पक्ष आघाडी करतील व गेल्या पाच वर्षाप्रमाणे पदांची वाटणी करतील अशी शक्यता आहे. दोन्ही पक्षाच्या काही प्रमुख नेत्यांनी विकासाच्या मुद्यावर अशी आघाडी होईल, असे संकेत दिले आहेत.
तालुक्यात दोन्ही कॉग्रेस आमने-सामने
नुकत्याच झालेल्या निवडणुकीत जिल्हा परिषद व पंचायत समितीची लढत दोन्ही काँग्रेसमध्येच झाली. जिल्ह्यात इतरत्र भाजप व मित्र पक्षांनी बाजी मारली असली तरी येथे मात्र त्यांना संधी मिळाली नाही.
काँग्रेसचा मित्रपक्ष स्वाभिमानी संघटना व राष्ट्रवादीचा मित्र जनता दल यांनी त्यांची साथ सोडली पण त्यांनाच याचा फटका बसला. राष्ट्रवादीला पाच जागा मिळाल्या. काँग्रेसला चार व अनपेक्षितपणे शिवसेनेला एक जागा मिळाली.
शिवसेनेला मिळालेली जागा जाधव गुरुजी यांच्या गटाची आहे. ते मुळचे काँग्रेसचेच आहेत. शिवाय त्यांचे राष्ट्रवादीच्या नेत्यांशी जमत नाही. ते थेट राष्ट्रवादीला पाठिंबा देण्याची शक्यता कमी आहे.