उमेदवारांचा फेसबुक, व्हॉट्स अॅपवर भर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2019 12:43 AM2019-04-19T00:43:07+5:302019-04-19T00:43:12+5:30
संतोष मिठारी । लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : लोकसभा निवडणुकीत यावर्षी सोशल मीडियावरील प्रचाराचे महत्त्व वाढले आहे. कोल्हापूर आणि ...
संतोष मिठारी ।
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : लोकसभा निवडणुकीत यावर्षी सोशल मीडियावरील प्रचाराचे महत्त्व वाढले आहे. कोल्हापूर आणि हातकणंगले मतदारसंघांतील उमेदवारांचा ‘सोशल’ प्रचारात फेसबुक, व्हॉट्स अॅपवर भर असल्याचे दिसत आहे. मात्र, सहा उमेदवार हे प्रचाराच्या या पद्धतीपासून दूर आहेत.
या उमेदवारांनी निवडणूक विभागाला सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रातील माहितीतून हे चित्र समोर आले आहे. दोन्ही मतदारसंघांत ३२ उमेदवार रिंगणात आहेत. जाहीर सभा, मेळावे, प्रचारफेरी, पदयात्रांबरोबर सोशल मीडियावर प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे. अपेक्षित व्यक्ती, गटापर्यंत भूमिका थेटपणे पोहोचविण्यासाठी उमेदवारांनी प्रचारयंत्रणेत सोशल मीडियाचा समावेश केला आहे. ही यंत्रणा सांभाळण्यासाठी काहींनी स्वतंत्र पथक (टीम) नेमले आहे. प्रचारात फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, यूट्यूब यांचा वापर केला जात आहे. या मीडियाच्या माध्यमातून कोल्हापूर मतदारसंघातील १५ पैकी १३, तर हातकणंगलेतील १७ पैकी १३ उमेदवारांचा प्रचार सुरू आहे. त्यातील काहींनी गेल्या २० दिवसांपूर्वी अकौंट सुरू केली आहेत. हातकणंगलेमधील तीन उमेदवारांचे केवळ ई-मेल आयडी आहेत. सहा उमेदवार सोशल मीडियावर नाहीत.
सोशल मीडिया कक्षाची नजर
निवडणूक विभागाच्या जिल्हास्तरीय मीडिया, संपर्क व्यवस्थापन व सोशल मीडिया कक्षाला दोन्ही मतदारसंघांतील एकूण १३ उमेदवारांच्या सोशल अकौंट आणि व्हॉट्स अॅप क्रमांकांची माहिती मिळाली आहे. अधिकृतपणे माहिती मिळालेल्या या अकौंटवर सोशल मीडिया कक्षाची नजर आहे. निवडणूक विभागातर्फे प्रमाणित करून घेतला नसलेला मजकूर या सोशल मीडियावर प्रसारित केल्याप्रकरणी आतापर्यंत १५ जणांना नोटीस पाठविली आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे यांनी दिली.
‘डीपी’, प्रोफाईलद्वारे प्रचार
व्हॉट्स अॅपचा ‘डीपी’ आणि फेसबुक अकौंटच्या प्रोफाईलद्वारे अनेकांकडून प्रचार सुरू आहे. राजकीय पक्षांचे चिन्ह, उमेदवारांचे छायाचित्र, त्यांचे निवडणुकीतील चिन्हांचे छायाचित्र, घोषणा या वैयक्तिक आणि ग्रुपच्या डीपी, प्रोफाईलवर झळकत आहेत.