साखर, कांदा-बटाट्याच्या गाड्या भरा पोलीस संरक्षण देऊ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2021 04:30 AM2021-08-25T04:30:23+5:302021-08-25T04:30:23+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : साखर, कांदा-बटाट्यासह सर्वच शेतीमालाच्या गाड्या भरा, आपण पोलीस संरक्षण देतो, अशी सूचना विशेष पोलीस ...
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : साखर, कांदा-बटाट्यासह सर्वच शेतीमालाच्या गाड्या भरा, आपण पोलीस संरक्षण देतो, अशी सूचना विशेष पोलीस महानिरीक्षक मनोज लोहिया यांनी व्यापाऱ्यांना मंगळवारी दिली. ‘वारणी’वरून व्यापारी व माल वाहतूकदार यांच्यात गेली पंधरा दिवस संघर्ष सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर मनोज लोहिया यांनी संबधित घटकांची बैठक घेऊन तोडगा काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यात यश आले नाही.
हमालांच्या ‘वारणी’च्या प्रश्नांवरून साखर, धान्य, गूळ व कांदा-बटाटा वाहतूक ठप्प आहे. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री सतेज पाटील यांनी वाहतूकदार व व्यापाऱ्यांची बैठक घेतली. त्यातही फारसे यश आले नाही. त्यामुळे मंगळवारी विशेष पोलीस महानिरीक्षक मनोज लोहिया यांनी जिल्ह्यातील व्यापारी, वाहतूकदार, बाजार समितीच्या प्रतिनिधींची बैठक घेतली. सहायक कामगार आयुक्त आयरे यांनी कायद्यातील तरतूद विशद केल्या. बाजार समितीचे सचिव जयवंत पाटील यांनी उपविधीची माहिती दिली, तर व्यापारी व वाहतूकदारांनी आपली बाजू मांडली. सर्वच घटक आपल्या भूमिकेवर ठाम राहिल्याने पेच कायम राहिला. अखेर तुम्ही गाड्या भरा पोलीस संरक्षण देतो, असे मनोज लोहिया यांनी सांगितले. बैठकीला पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांच्यासह व्यापारी, वाहतूकदार उपस्थित होते.