भराव संबंधितांना काढायला लावणार

By admin | Published: June 26, 2016 01:27 AM2016-06-26T01:27:15+5:302016-06-26T01:27:15+5:30

मोती तलाव प्रकरण : नायब तहसीलदारांचे आश्वासन; देसार्इंचे आत्मक्लेश आंदोलन; तणाव

To fill out the fillers | भराव संबंधितांना काढायला लावणार

भराव संबंधितांना काढायला लावणार

Next

कोल्हापूर : केर्ली (ता. करवीर) येथील शाहूकालीन मोती तलावात मुरूम, दगड टाकून तो बुजविण्याचा प्रकार घडला आहे. त्याबाबत संबंधितांवर फौजदारी कारवाई करावी व हा भराव काढून टाकावा, या मागणीसाठी प्रजासत्ताक सामाजिक संस्थेचे दिलीप देसाई यांनी कार्यकर्त्यांसह शनिवारी या तलावात तासभर आत्मक्लेश आंदोलन केले. यावेळी हा भराव येत्या १५ दिवसांत संबंधितांना काढायला लावू, असे आश्वासन करवीरचे नायब तहसीलदार अविनाश निंंबाळकर यांनी दिल्याने हे आंदोलन मागे घेतले. या ठिकाणी बांधकाम व्यावसायिक पारस ओसवाल व समर्थक आल्याने आंदोलक व ग्रामस्थ आक्रमक झाले. यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले.
शाहूकालीन तलावात मुरूम, दगड टाकून तो मुजविण्याचा घाट घातला जात आहे. याच्या निषेधार्थ दिलीप देसाई यांच्यासह सचिन तोडकर, विश्वनाथ पोवार, कुमार कांबळे, दिलीप बोरगावकर, सोमाजी गायकवाड, आदींनी सकाळी अकराच्या सुमारास तलावातील पाण्यात बसून आत्मक्लेश आंदोलन सुरू केले. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी विविध पक्ष, संघटनांचे पदाधिकारी, त्याचबरोबर ग्रामस्थही मोठ्या संख्येने या ठिकाणी आले. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून करवीरचे पोलिस निरीक्षक दिलीप जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवला होता. सुमारे तासभर हे आंदोलन सुरू होते. काही वेळातच करवीरचे नायब तहसीलदार अविनाश निंबाळकर यांनी आंदोलनस्थळी भेट दिली. यावेळी आंदोलकांनी त्यांना तलावात भराव टाकल्याचे निदर्शनास आणून दिले. यावर प्रशासनाकडून पारस ओसवाल यांना यापूर्वी अवैध गौण खनिज उत्खननप्रकरणी २० लाखांचा दंड केला असल्याचे सांगून हा भरावही संबंधितांना १५ दिवसांत काढून घेण्यास सांगितला जाईल, असे आश्वासन निंबाळकर यांनी दिले. त्यानंतर देसाई यांच्यासह आंदोलकांनी हे आंदोलन मागे घेतले. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर बांधकाम व्यावसायिक ओसवाल हे कोल्हापूर कॉलिंगच्या कार्यकर्त्यंाना घेऊन तलावाच्या पश्चिम बाजूला थांबून होते. आंदोलन संपल्यावर ते आत तलावातून आंदोलकांच्या दिशेने येऊ लागले. यामुळे आंदोलक व ग्रामस्थ चांगलेच संतापले. हातात दगड घेऊन तीनशेहून अधिक जणांचा जमाव ओसवाल समर्थकांच्या दिशेने निघाला. यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून पोलिस निरीक्षक जाधव यांनी आंदोलक व ग्रामस्थांना येथेच थांबण्याची विनंती केली; परंतु हा जमाव ऐकायला तयार नव्हता. आधी त्यांना येथून घालवा मगच आम्ही थांबतो, अशी भूमिका त्यांनी घेतली. अखेर पोलिसांनी ओसवाल समर्थकांना तेथून हाकलल्यानंतरच हा जमाव शांत झाला.
यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार, मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष वसंतराव मुळीक, मुस्लिम बोर्डिंगचे गणी आजरेकर, इतिहास संशोधक इंद्रजित सावंत, क्षत्रिय मराठा चेंबर्सचे दिलीपराव पाटील, निवासराव साळोखे, अशोक पोवार, बाळासाहेब मुधोळकर, बुरहान नायकवडी, अवधूत पाटील, आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. (प्रतिनिधी)

Web Title: To fill out the fillers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.