मारेकऱ्यांना पकडण्यासाठी जेल भरो; जिल्हाधिकाऱ्यांंच्या दालनात घुसण्याचा प्रयत्न
By Admin | Published: March 3, 2015 12:40 AM2015-03-03T00:40:28+5:302015-03-03T00:42:49+5:30
गोविंद पानसरे हत्या प्रकरण :
कोल्हापूर : ज्येष्ठ कामगार नेते गोविंद पानसरे यांच्या मारेकऱ्यांना तत्काळ अटक करा, या मागणीसाठी सोमवारी भाकपच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर निषेध मोर्चा काढून जेल भरो आंदोलन केले. घोषणाबाजी करत कार्यकर्त्यांनी थेट कार्यालयात घुसण्याचा प्रयत्न केला. बंदोबस्ताला असलेल्या पोलिसांकडून त्यांना अडविताना चांगलीच पुरेवाट झाली. जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात घुसणाऱ्या कार्यकर्त्यांबरोबर पोलिसांची झटापट झाल्याने तणाव निर्माण झाला. अखेर सर्व कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन काही काळानंतर सुटका केली.
पानसरे यांच्या हत्येला पंधरा दिवस उलटून गेले तरी मारेकऱ्यांचा थांगपत्ता पोलिसांना लागत नाही. त्याच्या निषेधार्थ भाकपतर्फे जेल भरो आंदोलन करण्यात आले. आंदोलनाची सुरुवात सकाळी अकराच्या सुमारास बिंदू चौक येथून निषेध मोर्चाने झाली. दिलीप पवार, नामदेव गावडे, रघुनाथ कांबळे, सतीशचंद्र कांबळे, मिलिंद यादव, गिरीष फोंडे यांच्या नेतृत्वाखालील कार्यकर्त्यांनी ‘पानसरेंच्या मारेकऱ्यांना तत्काळ अटक करा’, ‘पोलीस प्रशासनाच्या कार्यपद्धतीचा धिक्कार असो’, ‘आम्ही सारे पानसरे’,‘जो हिटलर की चाल चलेगा, वो हिटलर की मौत मरेगा’ अशा घोषणा देत मोर्चा मार्ग दणाणून सोडला. आईसाहेब महाराज पुतळा, फोर्ड कॉर्नर, व्हीनस कॉर्नर, बसंत-बहार टॉकीजमार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर नेण्यात आला. या ठिकाणी घोषणाबाजी करत तीव्र निदर्शने करण्यात आली. यावेळी रघु कांबळे, सतिश कांबळे, मिलिंद यादव, गिरिश फोंडे,शिवाजी माळी आदींनी फाटकावर चढून आत घुसण्याचा प्रयत्न केला. काही कार्यकर्त्यांनी व महिलांनी गनिमी कावा करत थेट जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनाकडे धाव घेत आत जाण्याचा प्रयत्न केला. मिलिंद यादव यांना पोलिसांनी यावेळी फरपटत नेले. यावेळी झटापट होऊन तणाव निर्माण झाला.