अजरामर कलाकृतीने प्रेक्षक भारावले..!

By admin | Published: July 23, 2016 12:44 AM2016-07-23T00:44:06+5:302016-07-23T00:53:19+5:30

जयराम शिलेदार जन्मशताब्दी : लोकशाहीर राम जोशी चित्रपटाचे सादरीकरण

Filled the audience with non-existent art ..! | अजरामर कलाकृतीने प्रेक्षक भारावले..!

अजरामर कलाकृतीने प्रेक्षक भारावले..!

Next

कोल्हापूर : प्रतिभावंत शाहिराचा भरभराटीचा काळ आणि नंतरची परवड यावर आधारित व्ही. शांताराम आणि बाबूराव पेंटर यांनी ७० वर्षांपूर्वी दिग्दर्शित केलेल्या ‘लोकशाहीर राम जोशी’ या अजरामर कलाकृतीच्या रसास्वादाने प्रेक्षक भारावले.
गंधर्वभूषण जयराम शिलेदार जन्मशताब्दीनिमित्त कलामहर्षी बाबूराव पेंटर फिल्म सोसायटी व गायन समाज देवल क्लबतर्फे शुक्रवारी राजर्षी शाहू स्मारक भवन येथे या चित्रपटाचे सादरीकरण झाले.
‘लोकरंजनाशिवाय लोकशिक्षण होणे नाही’ अशा धारणेतून काव्याला रूढीपरंपरांच्या जोखडातून मुक्त करू पाहणाऱ्या राम जोशी या परखड बाण्याच्या कवीची भूमिका जयराम शिलेदार यांनी उत्तमरीत्या साकारली. १९४७ साली प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने प्रेक्षकांना कृष्णधवल दुनियेची सफर घडविली. ‘सुंदरा मनामध्ये भरली... हवेलीत शिरली’ या प्रसिद्ध लावणीसह संगीत, संवाद, कथा या सर्व आघाड्यांवरील कामगिरीने प्रेक्षक खिळून राहिले.
चित्रपटाचे दिग्दर्शन व्ही. शांताराम व बाबूराव पेंटर यांनी केले होते, तर कथा व संवाद ग. दि. माडगूळकर यांचे होते. राम जोशी यांच्या पदांना वसंत देसाई यांनी संगीत दिले होते. जयराम शिलेदार यांच्यासह हंसा वाडकर, शकुंतला, परशुराम, सुधा आपटे यांच्या या चित्रपटात प्रमुख भूमिका आहेत.
सुरुवातीला चंद्रकांत जोशी यांनी ‘लोकशाहीर राम जोशी’ या चित्रपटाच्या निर्मिती प्रक्रियेसंदर्भातील माहिती सांगितली. (प्रतिनिधी)


चित्रपटाच्या सादरीकरणापूर्वी कीर्ती शिलेदार यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या जयराम शिलेदार यांच्या नाट्य व चित्रपट क्षेत्रांतील जीवनप्रवासावर आधारित ‘आनंदयात्री’ हा २० मिनिटे कालावधीचा माहितीपट दाखविण्यात आला. निवेदक म्हणून अभिनेते राहुल सोलापूरकर यांचा आवाज लाभला आहे.

छायाचित्र प्रदर्शनाचा आज शेवटचा दिवस
जयराम शिलेदार यांचा नाट्य, चित्रपटसृष्टीतील कार्यकर्तृत्वाचा आलेख मांडणाऱ्या कृष्णधवल, रंगीत छायाचित्रांचे प्रदर्शन राजर्षी शाहू स्मारक येथील कलादालनात भरविण्यात आले आहे.
रामराज्यवियोग, सूत्रधार नट, स्वयंवर, बाजीराव मस्तानी, मृच्छकटिक, महाकवी कालिदास, विद्याहरण, अमरकीर्ती, भावबंधन, आदी संगीत नाटकांतील छायाचित्रांचा प्रदर्शनात समावेश करण्यात आला आहे.
हे प्रदर्शन आज, शनिवार सकाळी नऊ ते रात्री आठ या कालावधीत रसिकांना पाहण्यासाठी विनामूल्य खुले आहे. तरी कलारसिकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.

Web Title: Filled the audience with non-existent art ..!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.