कोल्हापूरच्या चित्रनगरीचा कायापालट करणार

By admin | Published: July 20, 2016 11:30 PM2016-07-20T23:30:22+5:302016-07-21T01:02:55+5:30

संजय पाटील : भालजी, अनंत मानेंचे स्वप्न पूर्ण होणार

The film city of Kolhapur will be transformed | कोल्हापूरच्या चित्रनगरीचा कायापालट करणार

कोल्हापूरच्या चित्रनगरीचा कायापालट करणार

Next

भालजी पेंढारकर, अनंत माने, सूर्यकांत मांडरे, सुलोचनादीदी यांच्यासारख्या दिग्गजांनी पाहिलेले कोल्हापूर चित्रनगरीचे स्वप्न आता दृष्टिपथास येत आहे. प्रदीर्घ काळ प्रतीक्षेत असलेल्या कोल्हापूरच्या या चित्रनगरीच्या कामाला आता प्रत्यक्ष सुरुवात झाली आहे. कोल्हापूर चित्रनगरीचे व्यवस्थापकीय संचालक संजय पाटील यांनी कार्यभार स्वीकारताच बराच काळ पेंडिंग राहिलेल्या कामांना वेग देण्यासाठी त्यांनी प्रयत्न सरूकेले आहेत. त्यांनी कोल्हापूर चित्रनगरीला भेट दिली, त्यावेळी यासंदर्भात सविस्तर चर्चा केली. कोल्हापूर चित्रनगरीचे स्वप्न पूर्ण होईल, असे ते ठामपणे सांगतात. हिंदी मालिका, गेम शो, डेलीसोप येथे आणून त्या बळावर मराठीसाठी सवलत देण्याचा विचार आहे, असेही त्यांनी सांगितले.


प्रश्न : प्रदीर्घ काळानंतर कोल्हापूरच्या चित्रनगरीच्या कामाला सुरुवात झाली आहे. हे काम कधीपर्यंत पूर्ण होणार?
उत्तर : कोल्हापूरला चित्रनगरी व्हावी, ही अनेक कलाकारांची इच्छा आहे. चित्रतपस्वी भालजी पेंढारकर, ज्येष्ठ दिग्दर्शक अनंत माने, अभिनेते सूर्यकांत मांडरे, सुलोचना दीदी यांच्यासारख्या अनेक कलावंतांनी हे स्वप्न पाहिले आहे. अनेक कारणांमुळे हे काम अपूर्ण अवस्थेत राहिले. तेव्हा ते का राहिले, याकडे मी जात नाही; परंतु कोल्हापूरच्या चित्रनगरीच्या प्रत्यक्ष कामाला आता सुरुवात झाली आहे. त्यामुळे या सर्व दिग्गजांचे स्वप्न पूर्ण होत आहे, आणि याची मी साक्षीदार आहे, याचा मला अभिमान आहे. कोल्हापूरच्या चित्रनगरीचा विस्तार ७७ एकर माळावर पसरलेला आहे. अनेकांनी या जमिनीच्या बाजूने अतिक्रमण केले होते. जनावरांसाठी तर हा माळ मोकळाच होता; परंतु आता या गोष्टीला आळा घालण्यात यश मिळविलेले आहे. येत्या सहा महिन्यांत कोल्हापूरच्या चित्रनगरीचे स्वरूप पालटलेले दिसेल, असा प्रयत्न मी करीत आहे.
प्रश्न : चित्रनगरीच्या कामासाठी किती टप्पे निश्चित करण्यात आले आहेत?
उत्तर : अपूर्ण राहिलेली कामे पूर्णत्वास नेण्यासाठी मी प्रयत्न सरू केले आहे. यामध्ये दोन टप्प्यांत सुरुवातीला काम सुरू करण्यात येत आहे. पहिल्या टप्प्यात या विस्तीर्ण पठारावरील दहा ते पंधरा लोकेशन तयार करण्यात येतील. ते चित्रपट निर्मात्यांना कसे आकृष्ठ करतील, याकडे लक्ष पुरविण्यात येईल. त्यासाठी वृक्षारोपण, पाणथळ जागा, शुटिंगसाठीचे आकर्षित करणारे लोकेशन्स, सध्याचे कार्यालय असलेला पाटलाचा वाडा, चित्रनगरीत फिरण्यासाठी अंतर्गत रस्ते, या कामांचा समावेश आहे. चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघनाथ राजेभोसले, आर्किटेक्ट इंद्रजित नागेशकर यांनी सुंदर मास्टर प्लॅन केला आहे. याशिवाय एमआयडीसीचे कार्यकारी अभियंता सुहास व्हराळे व इतर सहकारी यांचे चांगले सहकार्य मिळत आहे.
प्रश्न : या कामासाठी सरकारने किती निधी दिला आहे, त्याचे वाटप कशा पद्धतीने होणार आहे ?
उत्तर : खरेतर, चित्रनगरीच्या कामासाठी यापूर्वीच सात कोटींचा निधी आलेला आहे; परंतु बराच काळ तो कुठे खर्च करायचा, याबाबत निर्णय होत नव्हता. सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांच्याशी कोल्हापूरच्या चित्रनगरीबाबत सविस्तर चर्चा करून त्यांच्याकडे एकूण सहा प्रस्ताव ठेवले. त्यांनीही तातडीने या विषयांचा अभ्यास करून हे सहाही प्रस्ताव मंजूर केल्यामुळे या कामाला वेग आला आहे. पहिल्या टप्प्यात साडेसात कोटी आणि दुसऱ्या टप्प्यात आणखी रक्कम मिळणार आहे. पहिल्या टप्प्यातील कामासाठी निधी जमा झाला आहे. ते काम पूर्ण होताच दुसऱ्या टप्प्यातील निधीही येईल. वृक्षारोपण, अंतर्गत रस्ते, पाटलाचा वाडा, कार्यालय, स्टुडिओ यांसाठी निविदा काढण्यात आल्या आणि त्या कामांना प्रत्यक्ष सुरुवातही झाली आहे.
प्रश्न : स्थानिक कलाकारांना या चित्रनगरीचा फायदा मिळणार काय?
उत्तर : गोरेगाव येथील चित्रनगरीमधून शासनाला ५५ लाख रुपयांचा फायदा झाला आहे. हैदराबाद येथील रामोजीराव सिटीसारखा प्रयोग कोल्हापूर चित्रनगरीत करण्याचा मानस आहे. यातून महसूलही मिळेल आणि स्थानिक कलाकारही जगेल, अशी योजना आहे; परंतु त्यासाठी या जागेचा कायापालट करावा लागेल.
प्रश्न : महसूल मिळविण्यासाठी काय योजना आखल्या आहेत?
उत्तर : हिंदीतील एक दोन मालिका, गेम शो आणण्याबाबत चर्चा सुरू आहे. एक-दोन वर्षे त्यांच्या माध्यमातून मिळालेल्या महसुलातून मराठी चित्रपट, मालिकांसाठी सवलतीत चित्रनगरी उपलब्ध करून देण्याचा मानस आहे. यातून स्वार्थासोबत परमार्थही साधणार आहे.
- संदीप आडनाईक

Web Title: The film city of Kolhapur will be transformed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.