चित्रपट महामंडळ तीन वर्षांनी फायद्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2019 12:50 AM2019-04-23T00:50:23+5:302019-04-23T00:50:28+5:30
इंदुमती गणेश । लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : मराठी चित्रपटसृष्टीची शिखरसंस्था असलेल्या अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या गंगाजळीत गेल्या ...
इंदुमती गणेश ।
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : मराठी चित्रपटसृष्टीची शिखरसंस्था असलेल्या अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या गंगाजळीत गेल्या तीन वर्षांत कोटींची उड्डाणे झाली आहेत. नवी कार्यकारिणी निवडून आल्यापासून महामंडळाच्या ठेवी नऊ कोटींवर गेल्या असून, कोल्हापूर व पुणे
येथील कार्यालयांसाठी जागांच्या खरेदीतून महामंडळाची स्वत:ची स्थावर मालमत्ता तयार केली
आहे.
तीन वर्षांपूर्वी महामंडळावर आलेल्या कार्यकारिणीच्या काळात महामंडळ आंदोलने, भ्रष्टाचाराचे आरोप-प्रत्यारोप आणि वादंगाने ढवळून निघाले. त्यातच महामंडळाच्या पैशांचा अनावश्यक वापर आणि मानाचा मुजरा कार्यक्रमामुळे महामंडळाची तिजोरी रिकामी झाली. त्यामुळे तीन वर्षांपूर्वी निवडून आलेल्या कार्यकारिणीसमोर आव्हान होते ते महामंडळाचे कारभार सुधारण्याचे आणि खडखडाट झालेल्या तिजोरीत पुन्हा गंगाजळी तयार करण्याचे.
या काळात राज्यातील गावोगावी मेळावे आणि बैठका घेऊन महामंडळाच्या कारभाराची माहिती आणि महत्त्व पटवून देण्यात आले. स्थानिक कलाकार, संस्था, संघटनांपेक्षा महामंडळ ही अधिकृत संघटना असून, तिचेच मत शासनदरबारी ग्राह्य धरले जाते हे पटवून देण्यात आले. मागील कार्यकारिणीच्या पाच वर्षांत तीन अध्यक्ष झाले होते; पण गेल्या तीन वर्षांपासून कोल्हापूरच्या पातळीवरील वाद वगळता महामंडळाचे संचालक व कार्यकारिणीत स्थिरता आल्याचा फायदा झाला आहे.
यापूर्वी कोल्हापूर, मुंबई, पुणे आणि नाशिक या ठिकाणीच महामंडळाची कार्यालये होती. त्यानंतर नागपूर, औरंगाबाद, बीड, सांगली आणि सावंतवाडी या पाच शहरांमध्ये नव्या शाखा सुरू करण्यात आल्या. आता त्यात लघुपट निर्मिती, दूरचित्रवाणी या क्षेत्रांचाही समावेश करण्यात आला आहे.
महामंडळाच्या पैशांचा कमीत कमी वापर, कार्यक्रमांसाठी प्रायोजकत्व, उत्पन्नवाढीचे प्रयत्न यामुळे तीन वर्षांत महामंडळाच्या तिजोरीत नऊ कोटींची भर पडली आहे.
यातून कोल्हापूरच्या कॉर्पोरेट कार्यालयासाठी, पुणे कार्यालयासाठी जागा खरेदी करण्यात आली.
तीन वर्षांत सभासद संख्या दुप्पट
सभासद नोंदणी, प्रवेशशुल्क, नवीन चित्रपटाची नोंदणी, तक्रार निवारण, वार्षिक सभासद नोंदणी हे महामंडळाच्या उत्पन्नाचे प्रमुख स्रोत आहे. गेल्या तीन वर्षांत महामंडळाच्या सभासदांची संख्या १८-१९ हजारांवरून ३६ हजारांवर गेली आहे. नव्या मराठी चित्रपटाची नोंदणी, सेन्सॉरसाठी महामंडळाची एनओसी, शासकीय अनुदान व सरकारी योजनांचा लाभ या सगळ्यांसाठी चित्रपट महामंडळाचे शिफारस पत्र लागत असल्याने महामंडळाचे सभासद होण्याचे प्रमाण वाढले आहे.
महत्त्वाचे उत्पन्नाचे स्रोत
ओळखपत्र : २० लाख १३ हजार ४००
प्रवेश शुल्क : १ कोटी २ लाख ८५ हजार १००
नूतन चित्रारंभ शुल्क : ८२ लाख ४२ हजार ०५०
तक्रार निवारण शुल्क : १७ लाख ७ हजार ३९५
चित्र शीर्षक नोंदणी : २० लाख १५ हजार ३०४
वार्षिक सभासद नोंदणी : ७२ लाख १२ हजार २९९
सभासद आगाऊ नोंदणी : २४ लाख १७ हजार ०५०
प्रायोजकत्व : १४ लाख २५ हजार ५५०