कोल्हापूरच्या 'देशकरी' लघुपटाला फिल्मफेअर, अंतिम फेरीतील १० पैकी २ लघुपट कोल्हापूरचे
By संदीप आडनाईक | Published: December 2, 2024 11:49 AM2024-12-02T11:49:12+5:302024-12-02T11:50:08+5:30
कोल्हापूर : कोल्हापुरातील 'देशकरी' या लघुपटाला रविवारी मुंबईत झालेल्या सोहळ्यात सामाजिक विषयासाठी प्रतिष्ठेचा फिल्मफेअर ओटीटी पुरस्कार मिळाला. छोट्या शेतकऱ्यांचे ...
कोल्हापूर : कोल्हापुरातील 'देशकरी' या लघुपटाला रविवारी मुंबईत झालेल्या सोहळ्यात सामाजिक विषयासाठी प्रतिष्ठेचा फिल्मफेअर ओटीटी पुरस्कार मिळाला. छोट्या शेतकऱ्यांचे महत्व सांगणाऱ्या या लघुपटाने विशेष ज्युरी पुरस्कारही मिळवला आहे.
कोल्हापुरातील संजय देव प्रॉडक्शनने हा लघुपट बनवलेला आहे. यातील अनेक कलाकार आणि तंत्रज्ञ कोल्हापुरातील आहेत. यापूर्वी या लघुपटाने ११ आंतरराष्ट्रीय पुरस्कार पटकावले असून आणखीन १५ ठिकाणी नामांकन मिळालेले आहे.
या लघुपटाची कथा, दिग्दर्शन आणि निर्माते संजय देव आहेत. वैभव कुलकर्णी यांनी पटकथा लिहिली असून विक्रम पाटील यांचे छायांकन आहे. ऐश्वर्य मालगावे यांचे संगीत आहे. यात मारुती माळी, श्रध्दा पवार, अनिकेत लाड, अमृता खांडेकर, प्रमोद कुलकर्णी, साधना माळी, आसावरी नागवेकर, ऐश्वर्य मालगावे, सुरेश पाटील, शिवाजी वडिंगेकर, राजू कुलकर्णी, बाळासाहेब बर्गे, दत्तात्रय बुटके, डी. के. पाटील यांच्यासह बालकलाकारांच्या भूमिका आहेत. या लघुपटाचे चित्रीकरण राधानगरी तालुक्यातील पुंगाव येथे झाले आहे. या लघुपटासाठी स्वतंत्र संकेतस्थळ तयार केले आहे.
दहा पैकी कोल्हापूरच्या दोघांना नामांकन
कोल्हापूरच्याच स्वप्नील पाटील यांचा मधुबाला हा लघुपटही या स्पर्धेत होता. अंतिम फेरीत पोहोचलेल्या एकूण दहा लघुपटांपैकी दोन कोल्हापुरातील होते हे विशेष.
पाचव्यांदा फिल्मफेअरची मोहोर
फिल्म फेअर पुरस्कारात सलग पाचव्यांदा कोल्हापूरच्या कलावंतांनी बाजी मारली आहे. २०१८ साली उमेश बगाडे यांच्या ‘अनाहत’, २०१९ साली सचिन सूर्यवंशी यांचा ‘सॉकरसिटी’ आणि २०२० मध्ये रोहित कांबळे यांचा ‘देशी’, २०२२ मध्ये पुन्हा सचिन सुर्यवंशी यांचा 'वारसा' या माहितीपटाला आणि पुन्हा आता २०२४ मध्ये 'देशकरी' या पाचव्या लघुपटाला हा फिल्मफेअरचा प्रतिष्ठेचा पुरस्कार मिळाला आहे.