चित्रीकरण गोवा, हैदराबाद, गुजरातला हलविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2021 04:24 AM2021-04-22T04:24:34+5:302021-04-22T04:24:34+5:30
राज्यात कोरोनाची दुसरी लाट सुरू असल्याने शासनाने १५ तारखेपासून संचारबंदी लागू केली आहे. त्यात आता पुन्हा वेगाने संसर्ग होत ...
राज्यात कोरोनाची दुसरी लाट सुरू असल्याने शासनाने १५ तारखेपासून संचारबंदी लागू केली आहे. त्यात आता पुन्हा वेगाने संसर्ग होत असल्याने लॉकडाऊन होण्याची शक्यता आहे. हे आणखी किती दिवस चालेल याची कल्पना नसल्याने निर्मिती संस्थांनी चित्रीकरण अन्य राज्यांमध्ये हलविले आहे. कोल्हापुरातील चित्रनगरीत दोन मालिकांचे चित्रीकरण सुरू होते. त्यापैकी हिंदी मालिकेचे चित्रीकरण हैदराबादमध्ये हलविले आहे. मराठी मालिकेचाही स्थलांतराचा विचार सुरू आहे. राजाराणीची गं जोडी या मालिकेचे गोव्यात, तर या फुलाला सुगंध मातीचा मालिकेचे चित्रीकरण गुजरातमध्ये होत आहे. या संचारबंदीमुळे विविध वाहिन्यांवरील दोन मालिका बंद करण्यात आल्या आहेत. हे असेच सुरू राहिले तर महाराष्ट्रातील मनोरंजन क्षेत्राला कायमचा मोठा आर्थिक फटका सहन करावा लागणार आहे. त्यामुळे निर्बंध घालून चित्रीकरण सुरू ठेवण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी मराठी चित्रपट-मालिका व्यवसायाने केली आहे.
---
गोव्याचे रेड कार्पेट
महाराष्ट्रात चित्रीकरण बंद असल्याने अन्य राज्यांकडून मात्र निर्मिती संस्थांसाठी रेड कार्पेट घातले आहे. गोवा सरकारने देशभरात लॉकडाऊन झाले तरी आम्ही चित्रीकरणाची परवानगी घेऊन देऊ इथपर्यंतचा प्रस्ताव दिला आहे. गुजरातमध्येही कोरोना आहे, हैदराबादमध्ये नाईट कर्फ्यू असतानाही निर्बंध पाळून चित्रीकरण केले जात आहे.
--
अन्य उद्योगांप्रमाणे परवानगी द्या : चित्रपट महामंडळ
कामगारांच्या राहण्याची सोय असलेले उद्योग सुरू ठेवण्यास शासनाची परवानगी आहे. चित्रीकरणाच्या ठिकाणी सेटवरील मोजके कलाकार व स्पॉटबॉय, तंत्रज्ञ असतात. त्यामुळे अन्य उद्योगांप्रमाणे कमी माणसांच्या उपस्थितीत, कोविड चाचणी बंधनकारक, सेटवर डॉक्टरांची उपलब्धता, राहण्या-जेवणाची सोय, रोज सगळ्यांची आरोग्य तपासणी व कोणी पॉझिटिव्ह आल्यास घ्यावयाची काळजी, अशा अटी, शर्ती घालून चित्रीकरणाला परवानगी द्या, अशी मागणी अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.
--
सेव्ह मराठी फिल्म इंडस्ट्री मोहीम
चित्रीकरण बंदीविरोधात मराठी चित्रपट व मालिका व्यावसायिकांनी सेव्ह मराठी फिल्म इंडस्ट्री ही मोहीम सुरू केली आहे. अन्य उद्योगांना परवानगी, निवडणुका, आयपीएल सगळं सुरू असताना लाखो लोकांचे पोट भरणाऱ्या मराठी चित्रपटसृष्टीवरच अन्याय का, हिंदी मालिकांकडे पैसा असल्याने त्यांना स्थलांतर शक्य आहे; पण मराठी मालिकांचे काय, असा प्रश्न उपस्थित केलेला मेसेज व्हायरल करून सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे.