वैभववाडी राष्ट्रीय महामार्गाला अंतिम मंजुरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2017 05:50 AM2017-12-05T05:50:08+5:302017-12-05T05:50:08+5:30
कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातून जाणा-या नव्या दोन राष्ट्रीय महामार्गांना राष्ट्रीय रस्ते विकास महामंडळाने सोमवारी अंतिम मंजुरी दिली.
तानाजी पोवार
कोल्हापूर : कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातून जाणा-या नव्या दोन राष्ट्रीय महामार्गांना राष्ट्रीय रस्ते विकास महामंडळाने सोमवारी अंतिम मंजुरी दिली. कोल्हापूर, गगनबावडा, वैभववाडीमार्गे तळेरे (जि. सिंधुदुर्ग) तसेच सांगली ते पेठ नाका (इस्लामपूर) असे हे दोन नवे राष्ट्रीय महामार्ग होत आहेत. हे दोन्हीही मार्ग संपूर्ण सिमेंट काँक्रिटचे असतील. यामुळे मुंबई ते गोवा आणि रत्नागिरी ते नागपूर हे दोन्हीही राष्ट्रीय महामार्ग पुणे ते बंगलोर (एनएच ४) या राष्ट्रीय महामार्गाला जोडले जाणार आहेत.
सध्या कोल्हापूर, गगनबावडा, वैभववाडी ते तळेरे (जि. सिंधुदुर्ग) हा रस्ता राज्य महामार्ग असून त्यावरून मोठ्या प्रमाणात वाहतूक होते. कोकणला जोडणारा हा प्रमुख महामार्ग गणला जातो, पण त्याची रुंदी खूपच कमी आहे. हा महामार्ग मुंबई ते गोवा (एनएच ६६) राष्ट्रीय महामार्गाला जोडला जातो, पण याच रस्त्याला राष्ट्रीय महामार्ग म्हणून अंतिम मान्यता देण्यात आली असून तो चौपदरीकरण करण्यात येणार आहे. तळेरे येथून सुरू होणारा हा रस्ता कोल्हापुरात तावडे हॉटेलनजीक पुणे ते बंगलोर या राष्ट्रीय महामार्गाला जोडणार आहे. या नव्या रस्त्याचा नंबर ‘१६६ जी’ असा असेल.
याशिवाय दुसरा नवा मार्ग सांगली ते पेठ नाका (इस्लामपूर) असा असून त्याचा नंबर ‘१६६ एच’असेल. तळेरे ते गगनबावडा मार्गे कोल्हापूर आणि सांगली ते पेठ नाका (इस्लामपूर) या दोन्हीही राज्य महामार्गांना राष्टÑीय महामार्ग म्हणून अंतिम मंजुरी मिळाली आहे. लवकरच निविदा प्रक्रिया राबविण्यात येईल. -व्ही. आर. कांडगावे, मुख्य कार्यकारी अभियंता, राष्ट्रीय रस्ते महामार्ग, कोल्हापूर